आवाज द व्हॉईस, पुणे
"जगात भारतासह अनेक संस्कृती प्राचीन आहेत, मात्र त्यातील केवळ भारतीय संस्कृतीच निरंतर आहे. याचे कारण भारतीय संस्कृतीचा आधार भौतिकता नसून ज्ञान आहे. याचा अर्थ आपण विज्ञानाकडे किंवा भौतिकतेकडे दुर्लक्ष करावे असा होत नाही. उलट, जितका ज्ञानाचा प्रसार होईल, तितका देश प्रगती करतो. भारतीय ज्ञान परंपरेचा मुख्य बिंदू एकात्मता आहे," असे प्रतिपादन बिहारचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे (National Book Trust) आयोजित 'पुणे लिट फेस्ट'चे उद्घाटन राज्यपाल खान यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ॲम्फी थिएटरमध्ये झाले. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रीय पुस्तक न्यासचे अध्यक्ष प्रा. मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आणि लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकूर उपस्थित होते.
खान यांनी आपल्या भाषणात भारतीय संस्कृती, साहित्य आणि वैश्विक शांतीवर सखोल भाष्य केले.
'जगाचे रूप वेगळे असते'
जागतिक हिंसाचारावर भाष्य करताना खान म्हणाले, "जगात होणाऱ्या युद्धाला आणि हिंसेला आपण जबाबदार आहोत. दुनियातील सर्व संस्कृती रंग, आस्था आणि भाषेच्या आधारावर परिभाषित होतात. जगात केवळ भारतीय संस्कृती अशी आहे, जी 'आत्म्यावर' आधारित आहे. स्वामी विवेकानंद सातत्याने सांगत होते की 'भारताकडे जगाला देण्यासारखा संदेश आहे'. 'तुम्ही ज्याला मारत आहात, तो तुम्हीच आहात' (अद्वैत तत्त्वज्ञान), असा आपल्या संस्कृतीमधील संदेश जगाला दिला असता, तर जगाचे सध्याचे रूप काही वेगळे असते; पण आपण यात अयशस्वी झालो."
साहित्य आणि ब्रह्मज्ञान
साहित्याचे महत्त्व सांगताना त्यांनी संतवचनांचा दाखला दिला. ते म्हणाले, "ब्रह्मज्ञानाच्या जवळ नेते ती कला आणि साहित्य असते. साहित्याचा आस्वाद आणि सज्जनांचे सान्निध्य हा 'अमृतानुभव' असतो, हे आपल्या परंपरेत मानले जाते."
पुस्तकांशी असलेले नाते आणि आजीचा ओरडा
आपल्या वाचनाच्या आवडीविषयी बोलताना त्यांनी एक आठवण सांगितली. "पुस्तके ही माझे पहिले प्रेम आहे. मला लहानपणापासूनच पुस्तकांची आवड होती. सतत पुस्तक वाचनामुळे मला आजीचा ओरडा आणि फटकाही खावा लागायचा. पण पुस्तकाने ज्ञान संपादन करणे सुलभ केले आहे," असे त्यांनी सांगितले.
तंत्रज्ञानाची भीती नको
ज्ञानाच्या प्रसाराबाबत बोलताना ते म्हणाले, "एकेकाळी लेखनाला जगात विरोध झाला होता, पण भारतात मात्र ज्ञानाची संस्कृती होती. आता संगणकासारख्या तंत्रज्ञानाला घाबरण्याचे कारण नाही, उलट त्याने ज्ञानाचा प्रसार होण्यास मदत होते. जितका ज्ञानाचा प्रसार होईल, तितका देश प्रगती करेल."
अरबी भाषेत 'हिंद' म्हणजे सुंदर
भारतीय ज्ञानाचा जागतिक प्रभाव सांगताना खान म्हणाले, "अरबांनी भारतीय साहित्याचा पहिल्यांदा अनुवाद केला. युरोपच्या अवकाश अभ्यासाचा आधार 'सूर्य सिद्धांत' हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ अरबीतून युरोपात गेला. अरबीमध्ये 'हिंद' या शब्दाचा अर्थ 'सुंदर' असा होतो आणि ही सुंदरता ज्ञानाची आहे. ऋग्वेदाला युनेस्कोने सर्वांत प्राचीन मानले आहे, यापेक्षा भारताच्या प्राचीन संस्कृतीच्या अन्य पुराव्याची गरज नाही. मात्र, आपलेच ज्ञान आपल्या प्रगतीचा आधार ठरत नाही, ही बाब चिंताजनक आहे."
पुणे: सांस्कृतिक चेतनेचे केंद्र
पुण्याविषयी गौरवोद्गार काढताना राज्यपाल म्हणाले, "पुणे हे सांस्कृतिक आणि साहित्यिक चेतनेचे महत्त्वाचे केंद्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि त्यांचा गीतारहस्य ग्रंथ, गोपाळ कृष्ण गोखले, महात्मा फुले यांची आठवण या शहरामुळे जपली गेली आहे."
या कार्यक्रमात प्रा. मिलिंद मराठे यांनी वाचन संस्कृतीवर भर दिला, तर राजेश पांडे यांनी तरुणाईच्या वाढत्या वाचनप्रेमाचे कौतुक केले.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -