समीर दि. शेख
२०२५ हे वर्ष काही दिवसांतच आता इतिहासजमा होणार आहे. उद्याची पिढी जेव्हा २०२५चा आढावा घेईल, तेव्हा कदाचित त्यांना टीव्हीवरील राजकीय हमरीतुमरी आणि जगभरात पेटलेल्या युद्धांच्याच बातम्या दिसतील. पण या गदारोळापासून दूर, भारतातील गल्लोगल्ली मात्र वेगळाच आवाज निनादत होता. सर्वसामान्य भारतीयांनी या कोलाहालातील तिरस्काराला लाथाडत प्रेमाची निवड केली. आणि सौहार्दाचा क्षीण होऊ पाहणारा आवाज बुलंद केला
‘आवाज द व्हॉईस’ने वर्षभर एका मोहिमेप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यातून अशा सौहार्दाच्या कहाण्या शोधून काढल्या आणि त्या प्रसिद्ध केल्या. आपली ही गुण्यागोविंदाने राहण्याची प्रवृत्ती आजही लोकांच्या श्वासात सामावलेली आहे, तोच आपला आपला आत्मा आहे, हेच पुन्हा सिद्ध झाले. चला तर मग, २०२५च्या या डायरीची पानं उलटूया आणि आढावा घेऊयात हिंदू-मुस्लीम सौहार्दाच्या अशाच काही घटनांचा…

श्रद्धेच्या अंगणात सलोख्याचा दरवळ
भारताचे खरे प्रतिबिंब दिसते ते अजमेरच्या गल्ल्यांमध्ये किंवा ओडिसाच्या दर्ग्यांमध्ये. यावर्षी डिसेंबरच्या कडाक्याच्या थंडीत अजमेर शरीफ दर्ग्यातील मोठ्या देग (वाढपाची भांडी) मधून जगाला एक मोलाचा संदेश मिळाला. तिथे शिजणारे अन्न पोट भरण्याचे साधन तर होतेच, पण ते समतेचे जिवंत उदाहरणही होते. तिथे रांगेत बसून जेवणारे आणि वाढणारे हिंदू, मुस्लिम, शीख सारेच एक होते. तिथे कोणाची जात-पात विचारली गेली नाही, फक्त भूक आणि माणुसकी पाहिली गेली. शेकडो वर्षांपासून ही परंपरा तिथे अव्याहतपणे सुरु आहे.
ओडिसाच्या कटक मध्ये तर ४०० वर्षांपासून चालत आलेली परंपरा यावर्षीही तितक्याच उत्साहात पाहायला मिळाली. बुखारी बाबांच्या उर्समध्ये हिंदू बांधवांनी ज्या हिरीरीने सहभाग घेतला, ते पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. एक हिंदू कुटुंब दर्ग्याची चादर मनापासून जपते आणि एखादा मुस्लिम फकीर मंदिराच्या पायऱ्यांवर शांतपणे विसावतो, हीच आपल्या देशाची ताकद आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले.
सणांनी पुसल्या धर्माच्या भिंती
लोक म्हणतात प्रत्येक धर्मियांचे सण वेगवेगळे असतात, पण २०२५मध्ये या समजालाही पूर्णविराम मिळाला. ३० मार्चचा तो दिवस कोण विसरू शकेल, जेव्हा ईदच्या नमाजासाठी मस्जिद मधून बाहेर पडणाऱ्या मुस्लिम बांधवांवर तिथल्या हिंदू भाविकांनी गुलाबाच्या पाकळ्या उधळल्या.

यावर्षी प्रयागराजच्या महाकुंभ मध्येही माणुसकीचा कुंभ भरला होता. तिथल्या स्थानिक मुस्लिम तरुणांनी हिंदू भाविकांसाठी तंबू ठोकण्यापासून ते त्यांना रस्ता दाखवण्यापर्यंत सर्व जबाबदारी उचलली. महाराष्ट्राने तर यावर्षी जगासमोर आदर्शच ठेवला. गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी आल्यावर मुस्लिम समाजाने आणि उलेमांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले. "आधी आमच्या हिंदू बांधवांना बाप्पाचे विसर्जन थाटामाटात करू द्या, आमची मिरवणूक आम्ही नंतर काढू" हा निर्णय घेऊन त्यांनी सामाजिक सलोख्याचा नवा इतिहास लिहिला.
संकटात जागला शेजारधर्म
खरी नाती रक्ताच्या नात्यापेक्षाही भावनेने घट्ट विणलेली असतात, याची प्रचिती संकटात येते. महाराष्ट्रात जेव्हा पावसाने धुमाकूळ घातला आणि कराड मध्ये पुराचे पाणी घरात शिरले, तेव्हा मुस्लिम तरुणांनी आपला जीव धोक्यात घालून बाप्पाची मूर्ती सुरक्षित बाहेर काढली. एकमेकांच्या श्रद्धेला दिलेले ते अभय होते. याच महाराष्ट्रात मुस्लिम मुलांनी एका हिंदू पुजाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला मृत्यूच्या जबड्यातून बाहेर काढले.
जम्मूमध्ये तर एका हिंदू शेजाऱ्याने माणुसकीचे नवे उदाहरण जगासमोर ठेवले. प्रशासनाने एका मुस्लिम पत्रकाराचे घर पाडल्यानंतर तो उघड्यावर पडला होता, तेव्हा त्याच्या हिंदू शेजाऱ्याने आपल्या जमिनीचा तुकडा त्याला भेट दिला. "आम्ही तुला बेघर होऊ देणार नाही," हे त्यांचे शब्द कोणत्याही भाषणापेक्षा जास्त मोलाचे होते.

नात्यांच्या पलीकडची माणुसकी
बिहारच्या बक्सर मध्ये जनार्दन सिंह या हिंदू पित्याने आपल्या तरुण मुलाच्या स्मृती प्रित्यर्थ मुस्लिम समाजाला कब्रस्तानसाठी आपली जमीन दान दिली. "अखेर मातीत मिसळल्यावर आपण सर्व एकच होतो," हा त्यांचा विचार मनाला चटका लावून गेला. राजस्थानच्या भिलवाडा मध्येही एका मुस्लिम तरुणाने ज्या आईने त्याला लहानाचे मोठे केले, त्या हिंदू मातेवर स्वतः मुलाप्रमाणे पूर्ण विधीवत अंत्यसंस्कार केले.
वैचारिक बदलांची नवी पहाट
केवळ सामान्य माणसंच नाही, तर वैचारिक पातळीवरही यावर्षी मोठे बदल होताना दिसले. लखनऊमध्ये आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मुस्लिम विचारवंतांमध्ये झालेली चर्चा ही भविष्यासाठी आशेचा किरण ठरली. संवादाची ही मालिका खंडित होऊ नये, यावर दोन्ही बाजूंचे एकमत झाले.
अंबाजोगाईच्या इज्तेमा मध्ये लाखो मुस्लिम बांधवांनी शपथ घेतली की, दुसऱ्या धर्माचा आदर करणे हाच खरा धर्म आहे. मौलाना अरशद मदनी असोत वा मौलाना साद, सर्वांनीच मान्य केले की हिंदू-मुस्लिम एकतेशिवाय भारताचे पाऊल पुढे पडणार नाही. मक्का चार्टरमधील सह-अस्तित्वाचा विचार आणि भारतीय संविधानातील बंधुता हे एकमेकांना कसे पूरक आहेत, हे यावर्षी जगाला अधिक स्पष्टपणे उमजले.

२०२५चा निरोप घेताना...
२०२५ हे वर्ष आता संपत आले आहे. पण हे वर्ष जाताना ते आपल्याला एक मोठा धडा देऊन जात आहे. राजकारणाचे ढग कितीही दाट असले, तरी भारताचा आत्मा आजही एकमेकांवरील प्रेमात आणि विश्वासातच वसलेला आहे. जेव्हा लालबागच्या राजाचा पडदा एखादा मुस्लिम कारागीर शिवतो किंवा ईदच्या दिवशी हिंदू भाऊ गळाभेटी घेतात, तेव्हाच खऱ्या अर्थाने 'एक भारत, श्रेष्ठ भारत' साकारला जातो.
देश २०२६च्या उंबरठ्यावर उभा असताना देशातील हिंदू-मुस्लीम जणू हेच सांगताहेत की, आमचे धर्म वेगवेगळे असले तरी आम्ही भारतीय एकमेकांपासून वेगळे नाहीत.
(लेखक आवाज- द व्हॉइस मराठीचे संपादक आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -