सौदी अरेबियाच्या वाळवंटात निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार पाहायला मिळाला आहे. नेहमी उष्ण हवामान आणि वाळूसाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशात दशकांनंतर पहिल्यांदाच बर्फवृष्टी झाली आहे. सौदी अरेबियातील अल-जौफ प्रांतात आलेल्या अचानक शीत लहरीमुळे हा बदल घडला. या बर्फवृष्टीमुळे संपूर्ण वाळवंट पांढऱ्याशुभ्र बर्फाच्या चादरीखाली झाकले गेले असून हे दृश्य अत्यंत विलोभनीय दिसत आहे.
अल-जौफ भागातील ही घटना ऐतिहासिक मानली जात आहे. या भागात यापूर्वी कधीही अशा प्रकारची बर्फवृष्टी झाल्याची नोंद नाही. गेल्या काही दिवसांपासून या परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार गारपीट झाली होती. त्यानंतर वातावरणात अचानक बदल होऊन त्याचे रूपांतर हिमवर्षावात झाले. यामुळे तेथील ओसाड डोंगर आणि वाळूच्या टेकड्या बर्फाने आच्छादल्या गेल्या आहेत.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रातून आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. या प्रणालीमुळे बाष्पयुक्त वारे सौदी अरेबियाच्या दिशेने आले आणि त्यामुळे अल-जौफ तसेच आसपासच्या भागात गडगडाटासह पाऊस आणि त्यानंतर बर्फवृष्टी झाली. निसर्गाच्या या लहरीपणामुळे स्थानिक नागरिकही आश्चर्यचकित झाले आहेत.
सोशल मीडियावर या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहेत. वाळवंटातील उंटांचे कळप बर्फावरून चालतानाचे दृश्य नेटकाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. अनेक पर्यटक आणि स्थानिक लोक या दुर्मिळ हवामानाचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले आहेत. वाळवंटाचे हे पांढरे रूप पाहून जगभरातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हवामान बदलाचा हा परिणाम असल्याची चर्चा आता जागतिक स्तरावर सुरू झाली आहे.