भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आतापर्यंतचा सर्वात जड पेलोड उपग्रह अवकाशात प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज झाली आहे. चेन्नईजवळील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून २४ डिसेंबर रोजी हा अमेरिकन उपग्रह सोडण्यात येईल. याचे वजन सुमारे ६,१०० किलो आहे. इस्रोच्या या मोहिमेमुळे अंतराळ संशोधनात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल.
इस्रोचे 'लाँच व्हेईकल मार्क-३' (एलव्हीएम-३) हे रॉकेट अमेरिकन कंपनी 'एएसटी स्पेसमोबाईल'ने तयार केलेला 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करेल. हा उपग्रह ५२० किलोमीटर उंचीवरील लो अर्थ ऑर्बिटमध्ये (एलईओ) सोडण्यात येईल. हे उड्डाण एलव्हीएम-३ रॉकेटचे नववे उड्डाण असून सहावी प्रत्यक्ष मोहीम ठरेल. इस्रोचे हे आतापर्यंतचे सर्वात शक्तिशाली रॉकेट असून यापूर्वी चंद्रयान-२ आणि चंद्रयान-३ यांसारख्या महत्त्वाच्या मोहिमांसाठी याचा वापर करण्यात आला होता.
यापूर्वी इस्रोने अंतराळात नेलेला सर्वात जड पेलोड ५,८०५ किलोचा होता. मार्च २०२३ मध्ये युनायटेड किंगडमचे ३६ वनवेब जेन-१ उपग्रह एकत्रितपणे अवकाशात सोडले होते. एलव्हीएम-३ च्या तिसऱ्या व्यावसायिक मोहिमेद्वारे हे प्रक्षेपण पार पडले होते. आता ६,१०० किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपित करून इस्रो स्वतःचाच विक्रम मोडणार आहे.
'ब्लूबर्ड ब्लॉक-२' हा उपग्रह थेट मोबाइलला कनेक्टिव्हिटी देणाऱ्या जागतिक एलईओ समूहाचा एक भाग आहे. यामुळे दुर्गम भागांसह कोठेही आणि कधीही मोबाईलवर ४जी आणि ५जी व्हॉइस आणि व्हिडिओ कॉल, टेक्स्ट मेसेज, स्ट्रीमिंग आणि डेटा कनेक्टिव्हिटी मिळवणे शक्य होईल. यात २२३ चौरस मीटरचा फेझ ॲरे अँटेना बसवला आहे. त्यामुळे लो अर्थ ऑर्बिटमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा व्यावसायिक संचार उपग्रह ठरेल. सध्याच्या अनेक उपग्रहांच्या तुलनेत याची बँडविड्थ क्षमता १० पट अधिक आहे.
उपलब्ध माहितीनुसार, इस्रोने आतापर्यंत अमेरिकेचे सुमारे ३५० उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. याआधी इस्रोने अमेरिकेसाठी प्रक्षेपित केलेला पेलोड म्हणजे 'निसार' (NISAR) हा होता. इस्रो आणि नासा यांनी संयुक्तपणे विकसित केलेला हा एक मोठा आणि अत्यंत प्रगत अर्थ इमेजिंग उपग्रह होता.