बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेवरून भारत-बांगलादेशात खडाजंगी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल

 

बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेचा प्रश्न आणि भारतीय उच्चायुक्तालयाच्या आवारातील घुसखोरीवरून भारत आणि बांगलादेश यांच्यात पुन्हा एकदा वाकयुद्ध रंगले आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी बांगलादेश प्रशासनाचे दावे खोडून काढले. सिल्हेत येथील भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयात घुसखोरी झाली नसल्याचा आणि एका हिंदू व्यक्तीची जमावाकडून हत्या झाली नसल्याचा बांगलादेशचा दावा भारताने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या विषयावर भारताची भूमिका स्पष्ट केली. बांगलादेशातील स्थानिक पोलीस आणि प्रशासनाने या घटनांबाबत केलेली विधाने अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. बांगलादेश सरकारने वस्तुस्थिती स्वीकारून योग्य ती कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी सत्य परिस्थिती नाकारण्याचा आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आहे.

सिल्हेत येथील घटनेबाबत माहिती देताना जयस्वाल यांनी सांगितले की, बांगलादेशच्या दाव्यात कोणतेही तथ्य नाही. भारतीय सहाय्यक उच्चायुक्तालयाचे मुख्य प्रवेशद्वार तोडून जमाव आत शिरला होता. त्यानंतर जमावाने तेथे तोडफोड केली. ही घुसखोरी नाही, असे म्हणणे चुकीचे ठरेल. तसेच, एका वेगळ्या घटनेत एका हिंदू व्यक्तीचा मृत्यू झाला. ही हत्या नसून अपघाती मृत्यू किंवा इतर कारणांमुळे मृत्यू झाल्याचे बांगलादेश पोलिसांचे म्हणणे आहे. भारताने हा दावाही अमान्य केला आहे. जमावाने केलेल्या अमानुष मारहाणीतच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, ही वस्तुस्थिती भारताने मांडली आहे.

अल्पसंख्याक समुदायाच्या सुरक्षेबाबत भारताने सातत्याने चिंता व्यक्त केली आहे. बांगलादेशात हिंदूंवर होणारे हल्ले आणि त्यांच्या मालमत्तेचे नुकसान यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. भारताने याआधीच बांगलादेशच्या उच्चायुक्तांना बोलावून आपला तीव्र निषेध नोंदवला आहे. राजनैतिक कार्यालयांची सुरक्षा आणि अल्पसंख्याकांचे रक्षण करणे ही बांगलादेश सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यांनी ती पार पाडावी, असा स्पष्ट संदेश भारताने दिला आहे. भारताच्या या कडक भूमिकेमुळे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र आहे.