महाराष्ट्रातील नगरपरिषद–नगरपंचायतीत महायुतीचा दबदबा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निकालांची पुनरावृत्ती रविवारी जाहीर झालेल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणूक निकालात पाहायला मिळाली. महायुतीच्या बाजूने एकतर्फी लागलेल्या या निकालात महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडाला. या निवडणुकीत २८८ पैकी ११७नगराध्यक्षपदे मिळवत भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीतील पक्षांनाही चांगले यश मिळाले. आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांपूर्वीच्या या चाचणी परीक्षेत मिळालेल्या यशाने भाजपचा आत्मविश्वास ओसंडून वाहतो आहे.

नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्ये आलेल्या कायदेशीर अडचणींचे अडथळे पार करत आज अखेर दोन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकांचे निकाल लागले. महायुतीतील नेत्यांची वादग्रस्त आणि परस्परविरोधी वक्तव्ये, बोगस मतदानांच्या तक्रारी, पैसे वाटपाचे आरोप, मतदानयंत्रांमध्ये खराबी अशा अनेक खळबळजनक घटनांनी ही निवडणूक गाजली होती. त्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. मात्र, या निवडणुकीत प्रचारापासून ते निकालापर्यंत भाजप आणि मित्रपक्षांचाच वरचष्मा राहिला. २८८ नगरपालिका आणि २८५ नगराध्यक्षपदासाठी झालेल्या या निवडणुकीत महायुतीने तब्बल २०७, तर महाविकास आघाडीने ४४ आणि इतरांनी ३७ जागा पटकावल्या.

यामध्ये भाजपच्या ११७, शिवसेनेच्या ५३ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३७ जागा निवडून आल्या आहेत. तर नगरसेवकांच्या ६०४२ नागापैकी भाजपच्या ३३२५, शिवसेनेच्या ६९५, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ३११ नगरसेवक निवडून आल्याचे समजते. नगराध्यक्षपदाच्या तीन जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या.
भाजप हा राज्यातील सर्व गावांपासून शहरांपर्यंत पोहोचला पक्ष असून सर्व जातींचा, सर्व समाजाचा आणि सर्व भागांचा भौगोलिक पक्ष झाला आहे. २०१७ पेक्षाही हे यश मोठे असल्याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निकालानंतर पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

'कुस्ती' नंतरही युती भक्कम
महायुतीत 'दोस्तीत कुस्ती' खेळत सुरुवातीपासून महायुतीअंतर्गतच परस्पर प्रमुख लढती लढल्या गेल्याचे चित्र होते. परिणामी महायुती अधिक भक्कम झाल्याचे निकालानंतर पहायला मिळाले. या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात नेत्यांच्या नातलगांना तिकिटे देण्यात आली होती. विशेषकरून, महायुतीचे नेते, मंत्री आणि आमदारांनी त्यांच्या कुटुंबीयांसाठी उमेदवारी मिळवली होती. त्याचा महायुतीला काही प्रमाणात फायदा झाला आहे. बहुतांश ठिकाणी महायुतीकडून तिकीट मिळवलेले नातलग विजयी झाल्याने 'नातलग फॉर्म्युला' यशस्वी झाला आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः मैदानात उतरले होते. 

फडणवीसांनी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३, दुसऱ्या टप्प्यात पाच अशा एकूण ४८ सभा घेतल्या. फडणवीसांनी अनेक ठिकाणी व्हिडिओवरून देखील सभांना संबोधित करत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि निवडणूक प्रभारी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या निवडणुकीत पायाला भिंगरी बांधून फिरल्याचे फळ भाजपला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही या निवडणुकीसाठी जोर लावला होता. महायुतीमध्ये असलेल्या क्रमवारीनुसार उतरत्या क्रमाने या तिन्ही पक्षांना जागा मिळाल्या असून भाजपचा या दोन्ही पक्षांवर दबाव कायम राहील एवढी त्यांची ताकद वाढली आहे.

मविआ चितपट
या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांचा पार धुव्वा उडाला. एकाबाजूला फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे महायुतीचे नेते राज्यभर प्रचारदौरे करत असताना 'मविआ'च्या नेत्यांमध्ये अनुत्साह दिसत होता. त्याचा निकालावर मोठा परिणाम झाल्याचे मानले जात आहे. काँग्रेसच्या काही नेत्यांनी प्रचार केला असला तरी त्यात समन्वयाचा अभाव असल्याची नाराजीही कार्यकत्यांनी व्यक्त केली. या परिणाम निकालावर दिसून येत तिन्ही पक्षांना मिळून पन्नासही नगराध्यक्षपदे मिळवता आली नाहीत.

'शेजारी देशांतून शस्त्रे आणून प्रशिक्षणाचा कट'
नवी दिल्ली, ता. २१: "शेजारी देशांतून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणत सदस्यांना त्यांचे प्रशिक्षण देण्याचा पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संघटनेचा प्रयत्न होता," अशी माहिती राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) विशेष न्यायालयाला दिली आहे. 'पीएफआय'च्या २० नेत्यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्याच्या अनुषंगाने सुनावणी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनआयएने ही माहिती दिली. "इसिस संघटनेने ज्याप्रमाणे सिरियामध्ये धुमाकूळ घातला होता. त्याप्रमाणे भारतात दहशतवाद व हिंसाचार पसरावा, यासाठी पीएफआयच्या म्होरक्यांनी त्यांच्या सदस्यांना सिरियात पाठवले होते," अशी माहिती एनआयएने दिली.

या निकालानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, "राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतीसाठी झालेल्या निवडणुकांच्या निकालातील 'मविआ'चा एकंदरीत आकडाही शिवसेनेपेक्षा कमी आहे. एवढे मोठे यश शिवसेनेला मिळाले आहे, त्याबद्दल मतदारांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो. खरी शिवसेना कोणती हे मतदारांनी या निवडणुकीत दाखवून दिले आहे."

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की,  "मतदारराजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि आमच्या कार्यक्षम, विकासाभिमुख उमेदवारांवर जो ठाम विश्वास दाखवला आहे. हा आमच्यासाठी अभिमानाचा आणि जबाबदारीचा क्षण आहे. ही निवडणूक केवळ विजयाची नाही, तर विकासाच्या राजकारणाला मिळालेली पावती आहे."

हा विजय 'टीम'चा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नगरपालिका आणि नगर परिषद निवडणुकीच्या निकालामध्ये मिळालेले यश हा विजय टीम भाजप-महायुतीचा असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज देत विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. महायुतीचे ७५ टक्के नगराध्यक्ष निवडून येतील, असे भाकीत निवडणुकीपूर्वीच केले होते आणि जनतेने तसाच कौल दिला आहे, असेही फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राच्या जनतेने भाजप आणि महायुतीला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल फडणवीस यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना जनतेचे आभार मानले. ते म्हणाले, "महायुतीकडे एकूण ७५ टक्के नगराध्यक्ष आहेत. नगरसेवकांच्या बाबतीत भाजपने विक्रम केला असून सुमारे ३,३०० पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आले आहेत. यावरून भाजपला मिळालेला व्यापक जनाधार स्पष्ट होतो." या विजयासाठी फडणवीस यांनी महायुतीतील सहयोगी नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेही अभिनंदन केले. त्यांच्या पक्षांनीही उत्कृष्ट कामगिरी केली असून हा निकाल विधानसभेतील कामगिरीसारखाच असल्याचे ते म्हणाले, फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचेही आभार मानले.

विकासाच्या मुद्द्यांवर मते
यंदाचा विजय २०१७ पेक्षा अधिक मोठा असल्याचा दावा करत फडणवीस म्हणाले की, गेल्या ३०-३५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या राजकारणात असा विजय कोणालाही मिळाला नाही. प्रचारादरम्यान पूर्णपणे सकारात्मक भूमिका घेतल्याचे त्यांनी अधोरेखित केले. एकाही सभेत कुणावरही टीका केली नाही. केवळ विकासाच्या मुद्द्यांवर मते मागितली. आम्ही काय केले आणि पुढे काय करणार याचा ब्लू प्रिंट जनतेसमोर मांडली, असे त्यांनी सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील यशाचा उल्लेख करताना फडणवीस म्हणाले की, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली चांगले निकाल मिळाले. कामठी नगरपालिकेत ३५ वर्षांनंतर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्याचे त्यांनी विशेषत्वाने सांगितले. "महानगरपालिकांच्या आगामी निवडणुकांबाबत फडणवीस म्हणाले की, नगरपालिकांपेक्षा महानगरपालिकांमध्ये महायुतीला आणखी चांगले निकाल मिळतील, असा विश्वास आहे. ज्या ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही, त्या ठिकाणी कारणांचा अभ्यास करून उणिवा दूर केल्या जातील," असेही त्यांनी स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीत शिवसेनेबरोबर युतीबाबत बोलताना फडणवीस यांनी लवकरच अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगितले. 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter