बांगलादेशातील माध्यमांसाठी 'काळी रात्र'; 'प्रथम आलो' आणि 'डेली स्टार'ची कार्यालये पेटवली

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
बांगलादेशातील 'प्रथम आलो' आणि 'डेली स्टार'ची कार्यालये पेटवली
बांगलादेशातील 'प्रथम आलो' आणि 'डेली स्टार'ची कार्यालये पेटवली

 

ढाका

बांगलादेशातील तरुण विद्यार्थी नेता शरीफ ओसमान हादी याच्या हत्येनंतर ढाकामध्ये उसळलेल्या हिंसाचाराने रौद्र रूप धारण केले आहे. या संतापलेल्या जमावाने बांगलादेशातील नामांकित वृत्तपत्र 'प्रथम आलो' (Prothom Alo) आणि 'डेली स्टार' (The Daily Star) च्या कार्यालयांना लक्ष्य करत आग लावून दिली. या हल्ल्यामुळे १९९८ मध्ये स्थापन झाल्यापासूनच्या २७ वर्षांच्या इतिहासात 'प्रथम आलो' हे वृत्तपत्र पहिल्यांदाच प्रकाशित होऊ शकले नाही.

पत्रकार जीव मुठीत धरून पळाले

'प्रथम आलो'चे कार्यकारी संपादक सज्जाद शरीफ यांनी या घटनेचे वर्णन 'माध्यम क्षेत्रातील सर्वात काळी रात्र' असे केले आहे. ते म्हणाले की, "काल रात्री जेव्हा आमचे पत्रकार बातमीदारीचे आणि छपाईचे काम करत होते, तेव्हा अचानक जमावाने हल्ला केला. तोडफोड आणि जाळपोळ सुरू झाल्यावर पत्रकारांना आपला जीव वाचवण्यासाठी कार्यालयातून पळ काढावा लागला. आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. हल्ल्यामुळे आमचे संकेतस्थळ (Online site) बंद आहे आणि छपाई करणे शक्य झाले नाही."

हिंसाचाराचे मूळ: शरीफ हादीची हत्या

३२ वर्षांचा शरीफ ओसमान हादी हा गेल्या वर्षीच्या उठावातील महत्त्वाचा चेहरा होता. १२ डिसेंबर रोजी ढाका येथे निवडणूक प्रचारादरम्यान बुरखाधारी हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात गोळी झाडली होती. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या हादीला सिंगापूरमध्ये हलवण्यात आले होते, जिथे गुरुवारी त्याचे निधन झाले. हादी हा प्रस्थापित राजकीय व्यवस्थेचा कट्टर टीकाकार होता आणि नव्या पिढीचा बुलंद आवाज मानला जात होता.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला

सज्जाद शरीफ यांनी या घटनेचा निषेध करत म्हटले की, "हा केवळ एका इमारतीवरचा हल्ला नाही, तर हा आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला आहे. समाजात असलेला राग समाजकंटकांनी वृत्तपत्रांवर काढला आहे." त्यांनी सरकारकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

बांगलादेशातील निवडणुकांच्या तोंडावर एका तरुण नेत्याचा खून आणि त्यानंतर माध्यमांना लक्ष्य करणे, यामुळे देशात लोकशाही आणि सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अंतरिम सल्लागार मोहम्मद युनूस यांनी या घटनेचा निषेध केला असला तरी ढाकामधील तणाव अद्याप कायम आहे.