आसाममधील होजाई जिल्ह्यात शनिवारी पहाटे सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसला भीषण अपघात झाला. रेल्वे रुळावरून जात असलेल्या हत्तींच्या एका कळपाला ही वेगवान ट्रेन धडकली, ज्यामध्ये आठ हत्तींचा जागीच मृत्यू झाला असून एक हत्ती गंभीर जखमी झाला आहे. या धडकेमुळे रेल्वेचे पाच डबे रुळावरून घसरले असले तरी, सुदैवाने कोणत्याही प्रवाशाची जीवितहानी झालेली नाही.
पहाटेच्या सुमारास घडली घटना
ईशान्य सीमा रेल्वेने (NF Railway) दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शनिवारी पहाटे २:१५ च्या सुमारास घडली. राजधानी एक्सप्रेस वेगाने जात असताना हत्तींचा कळप अचानक रुळावर आला. लोको पायलटने (चालक) प्रसंगावधान राखून इमर्जन्सी ब्रेक लावला, मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने ती हत्तींना धडकलीच. यामुळे इंजिनला लागून असलेले पाच डबे रुळावरून खाली उतरले.
रेल्वे अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
अपघाताची माहिती मिळताच ईशान्य सीमा रेल्वेचे महाव्यवस्थापक आणि लुमडिंग विभागाचे रेल्वे व्यवस्थापक तातडीने घटनास्थळी पोहोचले. ज्या डब्यांचे नुकसान झाले होते, त्यातील प्रवाशांना रेल्वेच्या इतर रिकाम्या डब्यांमध्ये तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले. पहाटे ६:१५ वाजता ही ट्रेन गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाली. गुवाहाटीला पोहोचल्यानंतर गाडीला अतिरिक्त डबे जोडण्यात येतील आणि त्यानंतर ती दिल्लीकडे रवाना होईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
वाहतूक विस्कळीत आणि बचाव कार्य
या अपघातामुळे जमुनामुख-कामपूर विभागातील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. नागाव विभागाचे वन अधिकारी सुभाष कदम यांनी सांगितले की, वन विभागाने घटनास्थळी पोहोचून मृत हत्तींना हलवण्याचे आणि जखमी हत्तीवर उपचार करण्याचे काम सुरू केले आहे.
सैरांग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस मिझोरममधील सैरांगला (ऐझवाल जवळ) दिल्लीतील आनंद विहार टर्मिनसशी जोडते. जंगलातून जाणाऱ्या रेल्वे मार्गावर अशा प्रकारे हत्तींचा बळी जाण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने वनप्रेमींकडून चिंता व्यक्त केली जात आहे.