परप्रांतिय हिंदू व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी सरसावले साताऱ्यातील मुस्लिम

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 4 Months ago
खिदमत-ए-खल्क संस्थेचे कार्यकर्ते विकास भारद्वाज यांच्यावर अंत्यसंस्कार करताना
खिदमत-ए-खल्क संस्थेचे कार्यकर्ते विकास भारद्वाज यांच्यावर अंत्यसंस्कार करताना

 

जात, धर्म आणि पंथ यापलीकडे जाऊन माणुसकी हाच खरा धर्म मानणाऱ्या साताऱ्यातील 'खिदमत-ए-खल्क' या संस्थेने पुन्हा एकदा मानवतेचे दर्शन घडवले आहे. संस्थेच्या नावाप्रमाणेच कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यातून मानवतेच्या सेवेचे उद्दिष्ट प्रतिबिंबित केले आहे. सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत पावलेल्या उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीवर संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अंत्यसंस्कार केले. 

त्यादिवशी काय घडले होते?

उत्तर प्रदेश रामपूर येथील ३९ वर्षीय विकास भारद्वाज हे कामाच्या शोधात सातारा येथे आले होते. मात्र आर्थिक चंचणीतून त्यांनी याठिकाणीच आत्महत्या केली. त्यांच्या निधनाची बातमी समजल्यावर दुसऱ्या दिवशीच त्यांचे कुटुंब साताऱ्यात दाखल झाले. परक्या शहरात अंत्यविधी कसा करायचा हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता. त्यांच्याकडे अंत्यविधीसाठी लागणारी साधने किंवा व्यवस्था नव्हती. अशा कठीण प्रसंगी प्रशासनाच्या माध्यमातून साताऱ्यातील 'खिदमत-ए-खल्क' या सामाजिक संस्थेशी संपर्क साधण्यात आला. 

'खिदमत-ए-खल्क' संस्थेचे अध्यक्ष सादिक दिलावर शेख आणि त्यांच्या टीमने तात्काळ मदतीचा हात पुढे केला. संस्थेचे स्वयंसेवक अब्दुल सुतार, आरिफ खान, हाफीज मुराद, आसिफ खान, शाहरुख शेख, मुस्तफा बागवान इतर स्वयंसेवकांनी पुढाकार घेतला. या सर्वांनी भारद्वाज कुटुंबाला धीर दिला. त्यानंतर माहुली येथील कैलास स्मशानभूमीत हिंदू रितीरिवाजानुसार विकास भारद्वाज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

 

‘माणुसकी आजही जिवंत आहे’

 

उत्तर भारतातील असूनही साताऱ्यात आपल्या माणसाचा अखेरचा प्रवास इतक्या सन्मानाने पार पडलेला पाहून विकास भारद्वाज यांचे कुटुंब भारावून गेले. तेथील एका नातेवाईकाने संस्थेच्या स्वयंसेवकांचे आभार मानताना म्हटले, “आज हमको इस बात का यकीन हुआ की इन्सानियत आज भी जिंदा है.”  

इस्लामची शिकवण 

संस्थेचे अध्यक्ष सादिक दिलावर शेख यांनी आवाज मराठीसोबत बोलताना म्हटले की, “मोहम्मद पैगंबरांची शिकवण आहे की, ‘तुम बेहतरीन उम्मत हो, तुम लोगों के नफा रसाणी के लिए बनायी गयी हो…’ याचा अर्थ मानवाच्या आणि मनुष्य प्राण्याच्या फायद्यासाठी तुमची निर्मिती झाली आहे.”

ते पुढे म्हणतात की, “आम्ही कोणत्याही एका समाजासाठी काम करत नाही. पैगंबरांनी केवळ मुस्लिमांच्या फायद्यासाठी काम करा असे कुठेही सांगितले नाही. समोरचा व्यक्ती कोणत्या जातीचा किंवा धर्माचा आहे हे पाहण्यापेक्षा त्याची सेवा करण्याची संधी अल्लाहने आम्हाला दिली आहे. यामुळे आम्हाला पुण्य मिळते या भावनेतून आम्ही काम करतो. आमच्यासाठी जात, धर्म, पंथ यापेक्षा माणुसकी सर्वश्रेष्ठ असल्याचे आम्ही मानतो.”

सर्वधर्मीय एकजूट 

साताऱ्याच्या 'खिदमत-ए-खल्क' संस्थेमध्ये सर्वधर्मीय स्वयंसेवक कार्यरत आहेत. या संस्थेचे अध्यक्ष सादिक दिलावर शेख आहेत, तर उपाध्यक्ष आरिफ खान आणि सचिव साजीद शेख आहेत. तसेच संस्थेसोबत २५ ते ३० सर्वधर्मीय स्वयंसेवक कार्यरत आहेत. संस्थेचे काम पाहून अनेक जातीधर्माचे लोक या चळवळीशी जोडले गेले आहेत.

कोविड काळातील अविरत सेवा 

कोविड काळापासून संस्थेचे हे काम अविरत सुरू आहे. कोरोनाच्या संकटकाळात लोकांनी भीतीपोटी आत्महत्या केल्या होत्या. त्यावेळी पोलीस प्रशासनाला सुद्धा असे मृतदेह हाताळणे कठीण जात होते. सातारा तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आसगाव येथे अशीच एक घटना घडली होती. एका व्यक्तीने फाशी घेतली होती. त्यावेळी कोणीही पुढे येत नसताना 'खिदमत-ए-खल्क'च्या स्वयंसेवकांनी जाऊन त्या व्यक्तीचा मृतदेह खाली उतरवला आणि हिंदू धर्माप्रमाणे अंत्यविधी केला. त्यानंतर पोलीस दलातील कर्मचारी अशा कामासाठी संस्थेशी संपर्क साधतात. 

मृत व्यक्ती कोणत्याही धर्माची असो, संस्था त्यांच्या धार्मिक प्रथेनुसार अंत्यविधी करते. आतापर्यंत २५ ते ३० बेवारस मृतदेहांवर संस्थेने अंत्यसंस्कार केले आहेत. मृतदेहाची ओळख पटल्यास त्यांच्या धर्माप्रमाणे अंत्यविधी होतो अन्यथा प्रशासनाच्या नियमाप्रमाणे दहन किंवा दफन केले जाते.

शिक्षण, रुग्णसेवा आणि सामाजिक बांधीलकी 

कोरोनाच्या कठीण प्रसंगी संस्थेने माणुसकीच्या नात्याने रुग्णांना दवाखान्यात दाखल केले. गरजेची औषधे आणि किट गरजूंच्या घरी पोहोचवले. 'सातारा कोविड डिफेंडर' या नावाने एक समांतर यंत्रणा उभी करून रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करण्यापासून ते बेड मिळवून देण्यापर्यंत काम केले. सध्या संस्था आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठे काम करत आहे.  शिक्षण क्षेत्रात गरीब विद्यार्थ्यांसाठी जुनी पुस्तके आणि दप्तरे गोळा करून ती गरजूंपर्यंत पोहोचवली जातात. गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले जाते.

सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असल्याने संस्थेचे कार्यकर्ते स्वतःला छत्रपतींचे मावळे समजतात. याच प्रेरणेतून त्यांनी उन्हाळ्यात सातारा शहरात गर्दीच्या ठिकाणी सहा ‘शिवजल पानपोई’ सुरू केल्या. सर्वधर्मीय लोकांनी या उपक्रमाला मोठी साथ दिली. असेच 'हरित सातारा' टीमसोबत मिळून वृक्षारोपण आणि संवर्धनाचे काम संस्था करते.

मोहरमच्या निमित्ताने रक्तदान शिबीर

या संस्थेतर्फे यंदा मोहरमच्या निमित्ताने सातारा जिल्ह्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश समाजात मानवतेचा संदेश पोहोचवणे हा होता. रक्ताचा तुटवडा जाणवत असताना आयोजित केलेल्या या उपक्रमाला सातारकरांनी भरभरून प्रतिसाद देखील दिला होता.

या उपक्रमाचे सर्वात मोठे यश म्हणजे यामध्ये सर्वधर्मीय आणि सर्व राजकीय पक्षांच्या लोकांचा असलेला सक्रिय सहभाग. नियोजनापासून ते प्रत्यक्ष रक्तदानापर्यंत सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र आले होते. भुईंज, वाई, खंडाळा, कराड आणि कोरेगाव या तालुक्यांसह जिल्हाभरात आयोजित शिबिरांमध्ये सुमारे १,४४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सातारा जिल्ह्यातील एका संस्थेमार्फत करण्यात आलेले हे रक्तदान आतापर्यंतचे उच्चांकी रक्तदान ठरले.

पूरग्रस्तांना आधार 

सातारा जिल्ह्यातील 'खिदमत-ए-खल्क' आणि  'जमियत उलमा-ए-हिंद' या संस्थांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला होता. याअंतर्गत कार्यकर्त्यांनी ४५० कुटुंबांना मदत केली. संकटात सापडलेल्या या कुटुंबांना आधार देण्यासाठी त्यांनी लाडू, शेव, फरसाण यांसारखे तयार खाद्यपदार्थ दिले. तसेच साखर आणि चहापत्ती पाठवली. यासोबतच ६० रेशन किट, १००० किलो तांदूळ, महिला-पुरुष आणि मुलांसाठी कपडे, शालेय साहित्य, औषधांचे किट आणि इतर संसारोपयोगी वस्तूंचा समावेश असलेली सुमारे सव्वा लाख रुपयांची मदत त्यांनी थेट पूरग्रस्तांपर्यंत पोहोचवली होती.

ते एवढ्यातच थांबले नव्हते, तर काही दुर्लक्षित गावांना देखील त्यांनी दत्तक घेतले.  त्यानंतर चिंचपूर बुद्रुक, शेळगाव आणि मुंगशी या गावांमध्ये मदत पोहोचवली. तिथेही तब्बल २०० कुटुंबांना रेशन किट आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले. सोलापूर जिल्ह्यातील आवटी येथील पूरग्रस्तांनाही त्यांची मदत मिळाली होती. 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter