शिक्षण आणि नैतिक धैर्य हाच मानवी एकतेचा पाया

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 4 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

सानिया अंजुम

२० डिसेंबर हा दिवस जगभरात 'आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन' म्हणून साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला एका अत्यंत महत्त्वाच्या मूल्याची आठवण करून देतो. माणुसकी ही सामायिक जबाबदारी, परस्पर आदर आणि नैतिक कर्तव्याने एकमेकांशी बांधलेली आहे, हाच तो मूळ विचार होय. 

आजच्या काळात जेव्हा वैचारिक मतभेद, सामाजिक दरी आणि असमानता वाढत चालली आहे, तेव्हा या एकतेची गरज पूर्वीपेक्षा जास्त भासत आहे. हा एकता दिन केवळ घोषणांपुरता मर्यादित न ठेवता, तो आपल्या जगण्याचा भाग कसा असावा, हे समजून घेण्यासाठी आपल्याला मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचारांकडे पाहावे लागेल. मौलाना आझाद हे केवळ स्वातंत्र्यसेनानी किंवा शिक्षणतज्ज्ञ नव्हते, तर त्यांनी माणुसकीची एकता प्रत्यक्ष आयुष्यात जगून दाखवली.

मानवी एकतेबद्दल बोलताना अनेकदा आंतरराष्ट्रीय संस्था किंवा विकास उद्दिष्टांची भाषा वापरली जाते. ही चौकट महत्त्वाची असली तरी एकतेची खरी सुरुवात माणसाच्या विवेकातून होते. अबुल कलाम आझाद यांना हे मर्म पूर्णपणे उमजले होते. त्यांच्यासाठी 'एकता' म्हणजे सगळ्यांनी सारखेच दिसणे किंवा वागणे असे नव्हते. 

तसेच 'सहअस्तित्व' म्हणजे केवळ एकमेकांना सहन करणे असेही त्यांना वाटत नसे. त्यांच्या मते, खऱ्या एकतेचा अर्थ न्याय, सन्मान आणि सर्वांचे सामायिक भवितव्य असा होता. त्यांच्या या दृष्टीकोनातून पाहिल्यास २० डिसेंबरचे महत्त्व अधिक स्पष्ट होते.

१८८८ मध्ये जन्मलेले आझाद भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात प्रभावशाली विचारवंतांपैकी एक होते. इंग्रजांची सत्ता जेव्हा 'फोडा आणि राज्य करा' या धोरणावर अवलंबून होती, तेव्हा आझाद नैतिक जबाबदारीतून येणाऱ्या एकतेसाठी ठामपणे उभे राहिले. लोक वेगळे आहेत म्हणून समाज तुटत नाही, तर आपण एकमेकांशी जोडलेले आहोत ही जाणीव जेव्हा संपते, तेव्हा समाजाचे तुकडे होतात, असा त्यांचा विश्वास होता. त्यांचा हाच विचार मानवी एकता दिनाशी तंतोतंत जुळतो. गरिबी, सामाजिक बहिष्कार आणि संघर्षासारख्या जागतिक समस्या सोडवण्यासाठी एकत्र येण्याचे महत्त्व हा दिवस अधोरेखित करतो.

आझाद यांनी एकतेच्या कल्पनेला दिलेले सर्वात मोठे योगदान म्हणजे विविधतेचा स्वीकार. कोणतीही ओळख ही दुसऱ्याचा तिरस्कार करण्यासाठी नसते, असे त्यांनी नेहमी ठामपणे सांगितले. धार्मिक आणि सांस्कृतिक विविधता ही कमजोरी नसून ती आपली नैतिक शक्ती आहे, असे ते म्हणत. 

त्यांच्या मते, एकता म्हणजे एकमेकांतील फरक विसरून सोबत राहणे नव्हे, तर ते फरक मान्य करून एकमेकांसोबत उभे राहणे होय. आजच्या काळात, जेव्हा ओळखीच्या नावावर जगात राजकारण आणि सामाजिक विभागणी होत आहे, तेव्हा आझाद यांचे हे विचार अधिक महत्त्वाचे ठरतात.

मौलाना आझाद यांनी एकतेचा संबंध शिक्षणाशी जोडला होता. स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षणमंत्री म्हणून त्यांनी नेहमी यावर भर दिला की, ज्ञानाचा उपयोग सामाजिक सलोखा आणि मानवी उत्थानासाठी झाला पाहिजे. शिक्षण हे केवळ स्वतःच्या प्रगतीचे साधन नसून, ते एक संवेदनशील समाज घडवण्याचे माध्यम आहे, असे ते मानत. 

ज्या समाजाला योग्य शिक्षण मिळाले आहे, तो समाज जगात कुठेही होणारा अन्याय स्वतःसाठी धोका समजतो. २० डिसेंबरला जेव्हा जागतिक स्तरावर सहकार्याचे आवाहन केले जाते, तेव्हा शिक्षणातून येणारी ही एकता आपल्याला नवी दिशा दाखवते.

नैतिक धैर्य हा आझाद यांच्या तत्त्वज्ञानाचा दुसरा महत्त्वाचा पैलू होता. त्यांच्यासाठी एकता म्हणजे केवळ वरवरची सहानुभूती नव्हती, तर ती एक कृतीशील जबाबदारी होती. अन्याय होत असेल तेव्हा त्याविरुद्ध बोलण्यासाठी धैर्याची गरज असते, मग ते बोलणे कोणाला आवडले नाही तरी चालेल. 

जातीय तणाव आणि राजकीय अस्थिरतेच्या काळात आझाद यांनी स्वार्थापेक्षा तत्त्वांना महत्त्व दिले. संकटाच्या काळात जेव्हा गप्प बसणे सोयीचे वाटते, तेव्हाच खऱ्या एकतेची परीक्षा होते, याची आठवण त्यांचे जीवन आपल्याला करून देते.

आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन आर्थिक असमानता आणि सामाजिक बहिष्कारावरही प्रकाश टाकतो. आझाद यांनी आपल्या विचारातून या प्रश्नांची उत्तरे आधीच दिली होती. सामाजिक न्यायाशिवाय मिळालेले स्वातंत्र्य अपूर्ण आहे आणि राजकीय स्वातंत्र्याचा अर्थ शेवटच्या माणसाला सन्मान मिळवून देणे असाच व्हायला हवा, असे ते मानत. त्यामुळे जबाबदारीशिवाय एकता शक्य नाही. ज्यांच्याकडे सत्ता आहे, त्यांनी आपली जबाबदारी ओळखून वंचितांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता.

आजच्या जागतिकीकरणाच्या युगात हवामान बदल, महामारी आणि विस्थापन यांसारखी संकटे कोणत्याही देशाच्या सीमा मानत नाहीत. अशा वेळी केवळ आपल्या समुदायाचा विचार करून चालणार नाही. आझाद यांचा दृष्टीकोन जागतिक होता. त्यांनी मानवजातीला एक नैतिक समुदाय मानले, जो संकुचित हितापेक्षा सामायिक मूल्यांनी जोडलेला आहे. २० डिसेंबरचा उद्देशही हाच आहे की, जगापुढील आव्हाने केवळ सामूहिक प्रयत्नांनीच सोडवता येतील.

मानवी एकता दिन साजरा करताना आपण स्वतःला काही आवश्यक प्रश्न विचारले पाहिजेत. एकतेचा आपला विचार आपल्या धोरणांत, संस्थांमध्ये आणि दैनंदिन निवडींमध्ये दिसून येतो का? संकटाच्या वेळीच आपण माणुसकी दाखवतो की ती आपल्या समाजाच्या रचनेचा भाग आहे? मौलाना अबुल कलाम आझाद यांचे जीवन सांगते की, एकता ही एखादी तात्पुरती कृती नसून ती सतत जपायची नैतिक सवय आहे.

२० डिसेंबर हा दिवस कॅलेंडरमधील फक्त एक तारीख राहू नये. ती आपल्याला आठवण करून देते की मानवी प्रगतीसाठी एकता हाच पाया आहे. मौलाना आझाद यांच्या तत्त्वांकडे पुन्हा एकदा वळल्यास आपल्याला समजते की खऱ्या एकतेसाठी धैर्य, सर्वसमावेशकता, शिक्षण आणि न्यायाची गरज असते. हा दिवस साजरा करताना आपण केवळ सामायिक माणुसकी मान्य करणे पुरेसे नाही, तर ती सक्रियपणे जपली पाहिजे आणि अधिक मजबूत केली पाहिजे.

मानवी एकतेचा अर्थ सांगताना मौलाना अबुल कलाम आझाद यांचे शब्द आजही आपल्याला दिशा दाखवतात. ते एकदा म्हणाले होते, "जग दोन छावण्यांमध्ये विभागलेले आहे: एक अन्याय करणारी आणि दुसरी त्या अन्यायाचा प्रतिकार करणारी." हा विचार आपल्याला आपण कुठे उभे आहोत, याची जाणीव करून देतो. 

आपण केवळ प्रेक्षक न राहता अधिक न्याय्य आणि प्रेमळ जग घडवण्यासाठी सहभागी व्हायला हवे. सोयीपेक्षा विवेकाला आणि विभागणीपेक्षा माणुसकीला महत्त्व देणे, हीच खरी एकता आहे.