दिल्लीला विषारी धुक्याचा विळखा; १०० हून अधिक विमाने रद्द, तर ५० गाड्यांचा खोळंबा

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 3 h ago
दिल्लीत विषारी धुक्याचा विळखा
दिल्लीत विषारी धुक्याचा विळखा

 

नवी दिल्ली

देशाची राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात शनिवारी सकाळी विषारी धुक्याचा दाट थर पाहायला मिळाला. हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक (AQI) सरासरी ३८० वर पोहोचला असून तो 'अतिशय खराब' या श्रेणीत मोडतो. अनेक भागांत तर हा निर्देशांक ४३३ पर्यंत पोहोचला आहे, ज्यामुळे दृश्यमानता (Visibility) अत्यंत कमी झाली असून रस्ते, हवाई आणि रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झाला आहे.

हवाई आणि रेल्वे वाहतूक विस्कळीत

कमी दृश्यमानतेमुळे दिल्ली विमानतळावर 'लो व्हिजिबिलिटी' प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सकाळी १० वाजेपर्यंत दिल्लीहून सुटणारी ६३ आणि दिल्लीत येणारी ६६ विमाने रद्द करण्यात आली आहेत. एअर इंडियाने प्रवाशांना इशारा दिला असून दिल्लीसह अमृतसर, चंदीगड, लखनऊ आणि वाराणसी येथील विमान वाहतुकीवर धुक्याचा परिणाम होऊ शकतो, असे सांगितले आहे.

रेल्वे वाहतुकीची स्थितीही बिकट आहे. सुमारे ५० हून अधिक रेल्वे गाड्या ३ ते ४ तास उशिराने धावत आहेत. भुवनेश्वर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस ८ तास, तर बिहारहून येणारी चंपारण हमसफर एक्स्प्रेस ६ तास उशिराने धावत असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रदूषणाची पातळी गंभीर

दिल्लीतील ४० पैकी १६ मॉनिटरिंग स्टेशन्सवर प्रदूषणाची पातळी 'गंभीर' नोंदवली गेली आहे. आनंद विहार येथे ४२८, तर जहांगीरपुरी येथे ४२५ एक्युआय नोंदवण्यात आला आहे. प्रगती मैदानाजवळील भैरव मार्ग परिसरात तर सकाळी ७ वाजता ४३३ निर्देशांक होता, तिथे दृश्यमानता इतकी कमी होती की वाहनचालकांना दिवसाही हेडलाईट लावून प्रवास करावा लागला.

पुढील दोन दिवस महत्त्वाचे

भारतीय हवामान विभागाने (IMD) दिल्लीसह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांत दाट धुक्याचा इशारा दिला आहे. हवेची गुणवत्ता रविवारी आणि सोमवारी अधिक खालावून ती 'गंभीर' श्रेणीत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने 'ऑरेंज अलर्ट' जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.