जम्मूमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आणि चिंताजनक घटना समोर आली आहे. कचऱ्याच्या ढिगाऱ्यात खेळत असताना एका ६ वर्षांच्या मुलाला शस्त्रावर बसवता येणारी दुर्बीण (वेपन माउंटेबल टेलिस्कोप) सापडली आहे. ही दुर्बीण चीनमध्ये तयार केलेली असून ती सापडल्याने सुरक्षा यंत्रणा तातडीने सतर्क झाल्या आहेत. जम्मूमध्ये सध्या हाय अलर्ट असतानाच ही घटना घडल्याने प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.
ही घटना पीर खो परिसरातील एका मंदिराच्या मागे असलेल्या कचरा डेपोमध्ये घडली. तिथे कचरा वेचणाऱ्या एका कुटुंबातील ६ वर्षांचा मुलगा खेळत होता. त्यावेळी त्याला ही संशयास्पद वस्तू दिसली. त्याने ती वस्तू उचलून आपल्या पालकांना दाखवली. पालकांनीही वेळ न दवडता याबद्दलची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि ती दुर्बीण ताब्यात घेतली.
तपासादरम्यान ही साधी दुर्बीण नसून शस्त्रांवर लावून लांबचे लक्ष्यभेद करण्यासाठी वापरली जाणारी दुर्बीण असल्याचे स्पष्ट झाले. त्यावर 'मेड इन चायना' असा उल्लेख आहे. ही दुर्बीण तिथे कोणी आणि का आणली होती, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. दहशतवादी किंवा ड्रोनद्वारे शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्यांनी भीतीपोटी किंवा लपवण्यासाठी ही दुर्बीण तिथे फेकून दिली असण्याची दाट शक्यता आहे.
सुरक्षा दलांनी या परिसराची कसून तपासणी सुरू केली आहे. आगामी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये आधीच कडेकोट बंदोबस्त तैनात आहे. अशा परिस्थितीत ही चिनी बनावटीची आणि शस्त्रावर वापरली जाणारी दुर्बीण सापडल्यामुळे गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस अधिक सावध झाले आहेत. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.