आमना फारुख
भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी २०२५ हे वर्ष अत्यंत स्मरणीय ठरले. विशेषतः सांघिक खेळांमध्ये भारताने मिळवलेल्या यशाने क्रीडा जगतात एक नवी लाट निर्माण केली. वर्षभरातील चढाओढ, वाद आणि आव्हानांच्या मधूनही भारताने अशी काही कामगिरी केली ज्याने देशाला अभिमानाने भरून आले.
क्रिकेट, ॲथलेटिक्स, बुद्धीबळ, कबड्डी आणि हॉकीसोबतच या वर्षी स्क्वॉशमध्येही भारताने आपली छाप पाडली. खेळाडूंनी जुन्या मर्यादा तोडून अशा सन्मानांवर नाव कोरले ज्याची प्रतीक्षा कित्येक वर्षांपासून होती. जागतिक स्तरावरील ऐतिहासिक विजयांपासून ते वैयक्तिक विक्रमांपर्यंत हे वर्ष देशाच्या प्रगतीचे पुरावे देणारे ठरले.
प्रशासकीय पातळीवरही भारताची प्रतिष्ठा ओळखून '२०३० कॉमनवेल्थ गेम्स'चे यजमानपद अधिकृतपणे भारताला देण्यात आले. थोडक्यात सांगायचे तर, सरणारे वर्ष क्रीडा प्रेमींसाठी अजिबात निराशाजनक नव्हते.
क्रिकेटच्या मैदानात तिरंगा दिमाखात
.jpg)
क्रिकेटमध्ये पुरुष असो किंवा महिला, प्रत्येक खेळाडूने आपापल्या क्षेत्रात झेंडा फडकवला. इतकेच काय तर अंधांच्या क्रिकेटमध्येही भारताचेच वर्चस्व पाहायला मिळाले.
टीम इंडियाची आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी
फेब्रुवारी आणि मार्चमध्ये पाकिस्तान आणि यूएईमध्ये झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीय पुरुष संघाने तिसऱ्यांदा विजेतेपद मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने साखळी सामन्यांत अजेय राहत आपले स्थान पक्के केले.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा चार गड्यांनी पराभव केला. या प्रवासात भारताने बांगलादेश आणि कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध दिमाखदार विजय मिळवले. याआधी भारताने २००२ आणि २०१३ मध्ये हे जेतेपद मिळवले होते.
याच स्पर्धेत विराटने सर्वात जलद १४,००० वन-डे धावा पूर्ण केल्या, मोहम्मद शमीने २०० बळींचा टप्पा गाठला आणि रोहित शर्माने आयसीसी वन-डे स्पर्धांमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम केला.
आशिया चषक विजय
२०२५ मधील दुसरा मोठा विजय म्हणजे आशिया चषक. ९ ते २८ सप्टेंबर दरम्यान यूएईमध्ये झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला पाच गड्यांनी हरवून नवव्यांदा विजेतेपदावर नाव कोरले.
महिला विश्वचषकावर मुलींची मोहोर

भारतीय महिला क्रिकेट संघाने २०२५ मध्ये पहिल्यांदाच आयसीसी महिला विश्वचषक जिंकून इतिहास रचला. हा विजय एका रात्रीत मिळालेला नसून महिला क्रिकेटमधील कित्येक वर्षांच्या संघर्षाचे आणि कष्टाचे फळ होते. ३० सप्टेंबर ते २ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या या स्पर्धेचा अंतिम सामना नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आला. हरमनप्रीत कौरच्या संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला.
साखळी फेरीत भारत चौथ्या स्थानी होता, मात्र बाद फेरीत संघाने जबरदस्त खेळ करत अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियालाही धूळ चारली. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयने संघाला ५१ कोटी रुपयांचे मोठे बक्षीस जाहीर केले, तर आयसीसीकडून सुमारे ३९.७८ कोटी रुपये मिळाले. यामुळे भारतीय महिला संघाला एकूण १२३ कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले.
अंधांच्या क्रिकेटमध्येही भारत चॅम्पियन
दृष्टीबाधित महिलांच्या पहिल्या 'टी-२० विश्वचषकात' भारतीय संघाने अजिंक्यपद मिळवले. भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांसारखे देश या स्पर्धेत सहभागी झाले होते. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न हरता भारताने अंतिम सामन्यात नेपाळचा पराभव करून जेतेपद पटकावले.
आशियाई हॉकीचा राजा भारत
.jpeg)
हॉकी चाहत्यांनाही या वर्षी जल्लोष करण्याची संधी मिळाली. सप्टेंबर २०२५ मध्ये भारतीय हॉकी संघाने दक्षिण कोरियाचा ४-१ असा पराभव करत आशिया चषक जिंकला. तब्बल ८ वर्षांनंतर हा किताब भारताकडे परत आला असून यामुळे पुढील विश्वचषकासाठी भारताचे स्थानही पक्के झाले आहे.
बिहारमधील राजगीर येथे झालेल्या या स्पर्धेत कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली संघाने उत्कृष्ट कामगिरी केली. जुन्या चुका सुधारून रचलेली ही नवी रणनीती आणि भक्कम बचाव या विजयाचे मुख्य कारण ठरले.
पॅरालिम्पिकमध्ये तिरंग्याचा मान
नवी दिल्लीत २७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर दरम्यान झालेल्या १२ व्या 'जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप'मध्ये यजमान भारताने १० व्या स्थानावर मजल मारत इतिहास रचला. भारताने एकूण २२ पदके जिंकली, ज्यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे.
२०१४ मध्ये जपानमध्ये झालेल्या स्पर्धेत भारताने १७ पदके जिंकली होती. ७३ खेळाडूंच्या भारतीय पथकाने या स्पर्धेत ३ 'चॅम्पियनशिप रेकॉर्ड' आणि ७ 'आशियाई रेकॉर्ड' नोंदवून आपली ताकद दाखवून दिली.
वैयक्तिक यशाची मोठी यादी
सांघिक यशासोबतच वैयक्तिक कामगिरीतही भारत मागे नव्हता. 'भालाफेक' मध्ये नीरज चोप्राने ९० मीटर पेक्षा जास्त लांब भाला फेकून नवा इतिहास रचला. बुद्धीबळात डी. गुकेश जागतिक विजेता बनला. नेमबाजीत मनू भाकरला राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळाला, तर सम्राट राणा १० मीटर एअर पिस्तूलमध्ये जागतिक विजेता ठरला.
तिरंदाजीमध्ये ज्योती सुरेखा वेन्नम ही विश्वचषक फायनलमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली. तिने कंपाऊंड तिरंदाजीमध्ये कांस्य पदक जिंकले.
एकूणच, २०२५ हे वर्ष भारतीय खेळाडूंसाठी सीमा ओलांडणारे, जिद्द वाढवणारे आणि सामूहिक आनंदाचे ठरले. या वर्षात रचलेला पाया २०२६ मध्ये अधिक उंच शिखरे गाठण्यासाठी नक्कीच उपयोगी ठरेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -