बांगलादेशातील हिंदू व्यक्तीच्या हत्येची संयुक्त राष्ट्रांकडून गंभीर दखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस
संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस

 

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराच्या घटना आणि विशेषतः एका हिंदू व्यक्तीची जमावाकडून झालेली हत्या याबद्दल संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे. तेथील परिस्थितीवर संयुक्त राष्ट्र बारीक लक्ष ठेवून आहे. हिंसाचाराच्या या घटनांचा गुटेरेस यांनी कडक शब्दांत निषेध केला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत ही भूमिका मांडली. बांगलादेशात घडलेल्या या विशिष्ट घटनेबाबत विचारले असता त्यांनी सरचिटणीसांचे मत व्यक्त केले. कोणत्याही प्रकारचा हिंसाचार आणि जमावाकडून होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत. अशा घटनांचा आम्ही निषेध करतो, असे दुजारिक यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच या हिंसाचाराला जबाबदार असणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

बांगलादेशातील अंतरिम सरकारने कायद्याचे राज्य अबाधित राखावे. देशातील सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करणे ही सरकारची जबाबदारी आहे. यात अल्पसंख्याक समुदायाच्या संरक्षणाला विशेष प्राधान्य दिले पाहिजे. मानवाधिकारांचा सन्मान राखला गेला पाहिजे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही. तेथील सरकारने शांतता प्रस्थापित करण्यासाठी आणि दोषींना शिक्षा देण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले आहे.