पंजाब पोलीस दलातील निवृत्त आयपीएस अधिकारी आणि माजी उपमहानिरीक्षक (डीआयजी) अमर सिंग चहल यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंदीगड येथील सेक्टर ३९ मधील त्यांच्या राहत्या घरी त्यांनी स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्यांनी एका मोठ्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा उल्लेख केला आहे. सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकल्यामुळे आलेल्या नैराश्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
चहल हे ७५ वर्षांचे होते. मंगळवारी रात्री त्यांनी त्यांच्या परवानाधारक .३२ बोअरच्या रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली. घरातील केअरटेकरला गोळीचा आवाज आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर तातडीने पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांना सेक्टर १६ मधील रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये काही व्यक्तींची नावे आणि मोबाईल क्रमांकांचा उल्लेख आहे. या लोकांनी आपली फसवणूक केल्यामुळे आपण हे कृत्य करत असल्याचे चहल यांनी त्यात लिहिले आहे. सायबर भामट्यांनी त्यांना गुंतवणुकीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडवले असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून नमुने गोळा केले आहेत. एका वरिष्ठ आणि अनुभवी पोलीस अधिकाऱ्याचाच सायबर फसवणुकीमुळे बळी गेल्याने पोलीस दलात आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.