धुरंधर : हेरगिरीचा थरार आणि राष्ट्रवादाचा नवा अध्याय

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
धुरंधर चित्रपटातील कलाकार
धुरंधर चित्रपटातील कलाकार

 

आशा खोसा

बहारिनी रॅपर फ्लिप्राचीच्या 'Fa9la' गाण्याने तुम्हाला वेड लावले असेल आणि अक्षय खन्नाचा डान्स तुम्हाला थिरकायला लावत असेल, तर तुम्ही एकटे नाही आहात. पण हा चित्रपट वर्षातील सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरणार आहे आणि हा सीन चित्रपटातील सर्वात भारी गोष्ट आहे असे तुम्हाला वाटत असेल, तर ते चुकीचे आहे. आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला हा साडेतीन तासांचा संपूर्ण चित्रपट म्हणजे उत्कृष्ट चित्रपटनिर्मितीचा नमुना आहे.

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणाऱ्या 'धुरंधर'ने भारतीय चित्रपटसृष्टीची व्याख्याच बदलून टाकली आहे. भारताने आपली 'मवाळ राष्ट्र' ही प्रतिमा मागे सारली आहे. दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला भारत चोख प्रत्युत्तर देत आहे. अशा काळात हा चित्रपट सीमापार दहशतवादाचे वास्तव आणि भारताची रणनीती प्रभावीपणे मांडतो.

रणवीर सिंगने भारतीय गुप्तहेराची भूमिका उत्कृष्टपणे साकारली आहे. कराचीच्या अंडरवर्ल्डमध्ये घुसखोरी करणाऱ्या या गुप्तहेराभोवती चित्रपटाची कथा फिरते. तो तिथे शांतपणे सर्व पाहतो. त्याला तिथे आयएसआयची माणसे भारतात हल्ल्यांचे कट रचताना दिसतात. तसेच भारतात जाणाऱ्या दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉनचाही त्याला सामना करावा लागतो.

'उरी: द सर्जिकल स्ट्राइक', 'आर्टिकल ३७०' आणि 'बारामुल्ला' या आधीच्या चित्रपटांप्रमाणेच धर यांचा हा चित्रपटही भारताच्या सुरक्षेशी संबंधित सत्य घटनांवर आधारित आहे. मात्र 'धुरंधर' हा केवळ वास्तवावर आधारित चित्रपट नाही. यात प्रेक्षकांना उत्तम दर्जाचा सिनेमा अनुभवायला मिळतो. तगडी स्टारकास्ट, अनेक पदर असलेली कथा, खरी वाटणारी तरीही काही उणिवा असलेली प्रभावी पात्रे आणि हेरगिरीचा थरार यात पाहायला मिळतो.

नेहमीचेच मसाले वापरून बनवलेला एखादा पदार्थ खाताना तोंडात वेगळ्याच चवीचा स्फोट व्हावा, तसा हा चित्रपट आहे. यात रणवीर सिंगने हमजा अली मजारी या बलुच जमातीतील व्यक्तीची भूमिका साकारली आहे. तो कराचीतील लारी (Layari) भागात स्वतःचे स्थान निर्माण करू पाहणारा भारतीय गुप्तहेर आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानी प्रेक्षकही धर यांचे कौतुक करत आहेत. लारी परिसराचे चित्रण आणि बलुच नावांचे उच्चार त्यांनी अगदी अचूक केले आहेत. खुद्द पाकिस्तानी लोकही त्यांची नावे इतक्या स्पष्टपणे उच्चारत नाहीत, असे त्यांचे म्हणणे आहे.

यावरून 'धुरंधर'च्या निर्मितीसाठी घेतलेली मेहनत दिसून येते. प्रेक्षक या चित्रपटावर मनापासून प्रेम करत आहेत, यात नवल ते काय!

अक्षय खन्नाने रेहमान डकैत या बलुच टोळीच्या प्रमुखाची भूमिका साकारली आहे. लारी भागात त्याचेच वर्चस्व असते. हमजा त्याच्या टोळीत सामील होतो. भारतात दहशतवाद पसरवण्यासाठी आयएसआय आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांचे लागेबांधे असल्याचे त्याला समजते. पाकिस्तानमधील एक मोठा व्यावसायिक भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बनावट भारतीय नोटा छापत असल्याचेही त्याला कळते.

इथे प्रेक्षकांना २०१६ मध्ये केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामागचे कारण अचानक समजते. चलनातून नोटा बाद करून सरकारने अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी तत्काळ पावले उचलली होती. यासाठी सामान्य जनतेचा रोष ओढवून घेण्याची आणि लोकांना दोन महिने त्रास सहन करावा लागण्याची शक्यता असतानाही सरकारने हा धाडसी निर्णय घेतला होता.

२६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी रेहमान डकैत, त्याचे आयएसआयचे साथीदार आणि बनावट नोटा बनवणारे जल्लोष करत असतात. हे दृश्य हमजाला हादरवून सोडते. हल्ल्याच्या वेळी दहशतवादी आणि पाकिस्तानातील त्यांचे हँडलर्स यांच्यात सॅटेलाइट फोनवरून झालेले संभाषण चित्रपटात काही क्षणांसाठी ऐकवले जाते.

या प्रसंगात हमजाच्या चेहऱ्यावरील वेदना, दुःख, अपमान, नैराश्य आणि हतबलता पाहून प्रेक्षकही भावूक होतात. कमी शब्दांत मोठा आशय पोहोचवणे यालाच संवाद म्हणतात आणि धर यांनी ते इथे अचूक साधले आहे. कोणताही अतिरेकी देशभक्तीचा आव न आणता, लाल स्क्रीनवर फक्त एक छोटा मजकूर आणि ऑडिओ दाखवून त्यांनी मोठा परिणाम साधला आहे. हा चित्रपट का बनवला आणि प्रेक्षकांनी तो का पाहावा, याचे उत्तर यात मिळते.

इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक अजय सान्याल यांची भूमिका माधवन यांनी साकारली आहे. त्यांची भूमिका छोटी असली तरी, भारताने पाकिस्तानशी दोन हात करण्याची जी भूमिका घेतली, त्यामागे त्यांचीच दृष्टी असल्याचे स्पष्ट होते. काश्मीरमध्ये आणि भारतभर प्रॉक्सी वॉर आणि जिहादद्वारे भारताला हजारो जखमा करून मारण्याचे पाकिस्तानचे मनसुबे यात स्पष्ट होतात.

हे पात्र आजचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांच्यावर आधारित आहे. मी चित्रपट पाहत असताना, भारताच्या सुरक्षेची दिशा ठरवण्यात एनएसएची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावर लोक चर्चा करताना ऐकले.

हा चित्रपट म्हणजे डोवाल यांना वाहिलेली एक मूक आदरांजलीच आहे. पाकिस्तानला दहशतवादाचा वापर करण्यापासून रोखण्यासाठी कठोर कारवाईची गरज असल्याचे सांगणारे ते एकेकाळी एकमेव अधिकारी होते. संसदेवरील हल्ला आणि लष्कर-ए-तोयबाने इंडियन एअरलाइन्सचे विमान कंदहारला हायजॅक केले, तेव्हा डोवाल आयबीचे संचालक होते. कंदहार प्रकरणात भारतीय प्रवाशांच्या बदल्यात चार खतरनाक दहशतवाद्यांची सुटका करावी लागली होती. तसेच सरकारने दहशतवाद्यांना १० दशलक्ष डॉलर्सही दिले होते.

आयबी प्रमुखपदावरून निवृत्त झाल्यानंतर डोवाल यांनी आपल्या अनेक भाषणांमध्ये हे स्पष्ट केले होते. जोपर्यंत पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागत नाही, तोपर्यंत ते भारताविरुद्ध छुपे युद्ध थांबवणार नाहीत, असे त्यांचे मत होते. पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी युद्धाची किंमत वाढवणे गरजेचे होते. मात्र तत्कालीन सरकारचा त्यांच्या या धाडसी योजनेवर विश्वास नव्हता. बचावात्मक धोरण आणि नियमांचे पालन करण्यावर त्यांचा भर होता.

हमजा अली बलुचला गुप्तहेर म्हणून पाकिस्तानमध्ये पाठवणे ही एनएसए म्हणून नियुक्ती झाल्यानंतर डोवाल यांचीच रणनीती होती. धर यांनी चित्रपटात वास्तवाचे लहान डोस दिले आहेत, पण त्याचा प्रेक्षकांच्या मनावर मोठा परिणाम होतो. सान्याल आपल्या कनिष्ट सहकाऱ्याला म्हणतात, "जोपर्यंत देशाचा विचार करणारे सरकार सत्तेत येत नाही, तोपर्यंत आपल्याला वाट पाहावी लागेल." आजच्या संदर्भात हा संवाद खूप अर्थपूर्ण आहे.

सर्व प्रमुख कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. डॉनच्या भूमिकेत अक्षय खन्ना अप्रतिम आहे. फ्लिप्राचीच्या अरेबिक रॅपवरील त्याचे डान्स मूव्हज जगभरात ट्रेंड होत आहेत. रणवीर सिंग, माधवन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, राकेश बेदी यांच्यासह सारा अर्जुन आणि सौम्या टंडन या अभिनेत्रींनीही उत्कृष्ट काम केले आहे.

'धुरंधर'ने बॉलीवूडमधील घराणेशाही, टोळ्या आणि पैसे देऊन प्रसिद्धी मिळवण्याची पद्धत मोडीत काढली आहे. धर उघडपणे देशाच्या बाजूने उभे राहतात आणि त्यांना स्वतःच्या राष्ट्रवादी असण्याबद्दल कोणताही संकोच वाटत नाही. धर आणि त्यांची पत्नी अभिनेत्री यामी गौतम यांनी चित्रपटाच्या सकारात्मक पुनरावलोकनासाठी (Reviews) पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळेच आज मोठे चित्रपट निर्माते बॉलीवूडला कायमचे बदलल्याबद्दल 'धुरंधर'चे कौतुक करत आहेत.

'धुरंधर' मुस्लिमविरोधी आहे का? चित्रपटात तसे सूतोवाच करणारे एकही दृश्य नाही. काश्मीरमधील ९९.९ टक्के मुस्लिम समाजातही हा चित्रपट लोकप्रिय ठरत आहे. पाकिस्तानात तर या चित्रपटाच्या १८ लाख पायरेटेड प्रती डाऊनलोड होऊन एक विक्रमच झाला आहे.

मी तर ठामपणे सांगेन की, हा चित्रपट तुमच्या मनात पाकिस्तानी जनतेबद्दल द्वेष निर्माण करत नाही. कथा कराचीतील लारी भागातील काही विशिष्ट ठिकाणे आणि पात्रांभोवतीच फिरते. यात उर्वरित देशही दाखवलेला नाही.

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter