दौलत रहमान
१९ सप्टेंबर २०२५ हा दिवस आसामच्या इतिहासातील सर्वात गडद आणि क्लेशदायक दिवसांपैकी एक म्हणून कायमचा लक्षात राहील. एका संपूर्ण पिढीचा काळीज बनलेला आवाज—झुबीन गर्ग—वयाच्या ५२ व्या वर्षी सिंगापूरमध्ये अचानक शांत झाला. त्यांच्या निधनाने केवळ आसामच नव्हे, तर भारतीय संगीताचा पायाच हादरला. झुबीन हे केवळ एक गायक नव्हते; ते एक सांस्कृतिक वादळ होते, उत्तम कथाकार होते आणि ज्यांचे आवाज मुख्य प्रवाहात कधी पोहोचले नाहीत, अशा लोकांसाठी ते एक हक्काची ओळख होते.
तीन दशकांच्या कारकिर्दीत झुबीन यांनी भाषा आणि प्रदेशांच्या सर्व सीमा पुसून टाकल्या. आसामी आणि हिंदीपासून बंगालीपर्यंत अनेक भाषांमध्ये त्यांनी गाणी गायली. 'गँगस्टर' चित्रपटातील 'या अली' सारख्या गाण्यांनी त्यांना देशभर ओळख मिळवून दिली, तरीही त्यांची नाळ नेहमी आसामच्या मातीशी घट्ट जोडलेली राहिली. झुबीन यांचे जाणे म्हणजे केवळ एका गायकाचे जाणे नव्हे, तर परंपरा आणि आधुनिकतेला जोडणारा दुवा निखळणे होय.
अथांग जनसागर आणि जागतिक विक्रम
सिंगापूरमधून त्यांच्या निधनाची बातमी आल्यापासून ते २३ सप्टेंबरला त्यांच्यावर अंत्यसंस्कार होईपर्यंत आसाममध्ये माणुसकीचा महासागर लोटला होता. रणरणते ऊन आणि मुसळधार पाऊस असतानाही लोक रात्रंदिवस आपल्या लाडक्या कलाकाराच्या अंतिम दर्शनासाठी उभे होते. त्यांच्या अंत्ययात्रेला झालेली गर्दी ही जगातील चौथी सर्वात मोठी सार्वजनिक गर्दी ठरली असून, 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स'मध्ये त्याची नोंद झाली आहे. धर्म, जात आणि भाषेच्या भिंती ओलांडून संपूर्ण राज्य या दुःखात एकवटले होते. आसामचे मुख्यमंत्री डॉ. हिमंता बिस्वा सरमा यांनी म्हटले की, "पुढील पन्नास वर्षांत दुसरा झुबीन जन्मणार नाही."
साधेपणात लोकप्रियतेचे रहस्य
झुबीन केवळ त्यांच्या टॅलेंटमुळेच नव्हे, तर त्यांच्या माणुसकीमुळे लोकांच्या मनात घर करून होते. ते कधीही 'सेलिब्रिटी' असल्याच्या थाटात वागले नाहीत. रिक्षाने फिरणे, गल्लीबोळात सायकल चालवणे, रस्त्यावरच्या टपरीवर चहा पिणे आणि साध्या मुलांसोबत क्रिकेट-फुटबॉल खेळणे ही त्यांची जीवनशैली होती. आसाममध्ये जेव्हा वांशिक संघर्ष आणि राजकीय तणावाचा काळ होता, तेव्हा त्यांच्या गाण्यांनी लोकांना आधार दिला. ज्यांना ते कधी भेटले नाहीत, अशा हजारो गरजूंची त्यांनी गुपचूप मदत केली. प्राण्यांवरचे प्रेम आणि निसर्गाबद्दलची त्यांची तळमळ ही त्यांच्या ओळखीचा अविभाज्य भाग होती.
निडर आणि तत्त्वनिष्ठ योद्धा
झुबीन अत्यंत स्पष्टवक्ते आणि निडर होते. प्रसंगी त्यांचे बोल अनेकांना झोंबायचे, पण त्यांनी कधीही आपली तत्त्वे सोडली नाहीत. त्यांनी उल्फा (ULFA) सारख्या प्रतिबंधित संघटनेची तमा न बाळगता बिहू उत्सवांमध्ये हिंदी गाणी गाण्यावरच्या बंदीला विरोध केला होता. पुढे याच संघटनेने त्यांच्या निधनानंतर दुःख व्यक्त करत मान्य केले की, झुबीन यांनी आसामचा आवाज सीमेपलीकडे नेला. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरुद्धच्या (CAA) आंदोलनातही ते आघाडीवर राहिले.
संगीतातील महामेरू
झुबीन यांचा प्रवास १९९२ मध्ये 'अनामिका' या कॅसेटपासून सुरू झाला आणि तो थक्क करणारा ठरला. त्यांनी ३८ हून अधिक भाषा आणि बोलीभाषांमध्ये ३८,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केली. त्यांना ढोलपासून गिटारपर्यंत तब्बल १२ वाद्ये वाजवता येत असत. आसामी चित्रपटसृष्टीचा कायापालट करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या निधनानंतर प्रदर्शित झालेल्या 'रोई रोई बिनाले' या चित्रपटाने ३३ कोटींहून अधिक कमाई करून आसामी सिनेमातील आजवरचे सर्व विक्रम मोडले.
बॉलीवूडमध्ये मोठे यश मिळाल्यावरही तिथल्या गोंधळाला कंटाळून ते आसाममध्ये परतले होते. त्यांनी एकदा म्हटले होते, "मला धावपळ आवडत नाही, मी माझ्या आसाममध्ये एका राजासारखा मरेन." त्यांचे हे शब्द अखेर खरे ठरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करताना म्हटले की, "झुबीन गर्ग त्यांच्या समृद्ध संगीत योगदानासाठी नेहमीच स्मरणात राहतील."
झुबीन यांचा आवाज आता जरी शांत झाला असला, तरी त्यांनी निर्माण केलेले एक सुवर्णयुग आसामी जनतेच्या मनात कायम निनादत राहील. आम्ही २०२६ च्या उंबरठ्यावर उभे असताना हीच भावना मनात आहे की, जरी झुबीन आज आपल्यात नसले तरी ते भारतीय म्हणून आपल्या संगीतातून कायम जिवंत राहतील.
(लेखक 'आवाझ द व्हॉईस -आसाम’चे संपादक आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -