सुरक्षेसाठी नाही, तर 'या' भन्नाट कारणासाठी रशीद खान वापरतो बुलेटप्रूफ कार

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशीद खान याच्यासमवेत इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन
अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू रशीद खान याच्यासमवेत इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन

 

अफगाणिस्तानचा स्टार फिरकीपटू रशीद खान सध्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये (बीबीएल) आपली जादू दाखवत आहे. या स्पर्धेदरम्यान त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार केविन पीटरसन याच्याशी गप्पा मारल्या. यावेळी रशीदने एक अतिशय रंजक माहिती दिली. अफगाणिस्तानमध्ये असताना आपण बुलेटप्रूफ गाडी वापरत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, ही गाडी वापरण्यामागे स्वतःची सुरक्षा हे कारण नसून एक वेगळेच आणि मजेशीर कारण असल्याचे त्याने स्पष्ट केले.

अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सकडून खेळताना रशीदने हा खुलासा केला. पीटरसनने त्याला विचारले की, इतका मोठा खेळाडू असल्याने मायदेशी तुझे आयुष्य कसे असते? यावर रशीदने सांगितले की, तो अफगाणिस्तानमध्ये असताना 'बुलेटप्रूफ लँड क्रूझर' वापरतो. पीटरसनला वाटले की सुरक्षेच्या कारणास्तव तो असे करत असावा. रशीदने मात्र हे कारण फेटाळून लावले. तिथले लोक आणि चाहते खूप प्रेमळ आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी आणि त्यांना पाहण्यासाठी खूप गर्दी होते, असे रशीदने सांगितले.

रशीदने यामागचे मूळ कारण समजावून सांगितले. तो म्हणाला की, चाहते गाडी पाहताच जवळ येतात. ते प्रेमाने खिडक्यांवर थापा मारतात. अनेकदा ते गाडीवर चढण्याचा प्रयत्न करतात किंवा उड्या मारतात. साध्या गाडीचे पत्रा आणि दरवाजे यामुळे दबले जातात किंवा खराब होतात. बुलेटप्रूफ गाडीचे दरवाजे आणि काचा अतिशय मजबूत असतात. त्यावर चाहत्यांच्या अशा वागण्याने काहीही फरक पडत नाही. गाडीचे नुकसान होऊ नये, केवळ यासाठीच आपण बुलेटप्रूफ गाडी वापरतो, असे रशीदने हसत हसत सांगितले.

रशीद खान हा जागतिक क्रिकेटमधील एक मोठे नाव आहे. अफगाणिस्तानमध्ये तर त्याची लोकप्रियता अफाट आहे. टी-२० क्रिकेटमधील तो सर्वोत्तम गोलंदाज मानला जातो. त्यामुळेच मायदेशात त्याला पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडणे साहजिक आहे. त्याच्या या खुलाशानंतर समालोचन कक्षेतही एकच हंशा पिकला.