ख्रिश्चन परंपरेनुसार येशू ख्रिस्तांच्या जन्माचा आनंद व्यक्त करण्यासाठी गोड पदार्थ तयार करून वाटण्याची परंपरा आहे. त्यातूनच प्लम केक कापला जाऊ लागला, या केकमध्ये वापरण्यात येणारे ड्रायफ्रूट्स आणि मसाले समृद्धी, भरभराट आणि शुभत्वाचे प्रतीक मानले जातात. विविध घटक एकत्र करून तयार होणारा हा केक नातेवाईक, शेजारी, मित्र तसेच गरजू लोकांना प्रेम, आपुलकी आणि दानशीलतेचा संदेश देत वाटला जातो. यामुळे समाजात एकोप्याची भावना निर्माण होते. प्लम केक केवळ ख्रिश्चन समाजापुरता मर्यादित नसून सर्व जाती-धर्म आणि संस्कृतीतील लोक त्याचा आस्वाद घेतात. यातून सामाजिक सलोखा आणि सांस्कृतिक समन्वयाचे दिसून येते.
संस्कृती व एकोप्याची गोड अनुभूती देणारा प्लम केक
सुकामेव्याच्या सुगंधाने दरवळणारा प्लम केक, रंगीबेरंगी सजावटीचे चॉकलेट आणि रेड व्हेलव्हेट केक... ख्रिसमसच्या पार्श्वभूमीवर बेकऱ्या आणि होम बेकर्समध्ये लगबग सुरू आहे. केक कापण्याची परंपरा केवळ गोड पदार्थापुरती मर्यादित न राहता आनंद, प्रेम आणि एकतेचे प्रतीक ठरत असून, शंभर रुपयांपासून ते वीस हजार रुपयांपर्यंतचे केक बुकिंगसाठी ग्राहकांची गदाँ होत आहे.
ख्रिसमसच्या केकमध्ये प्रामुख्याने प्लम केक किंवा फ्रूट केक तयार केला जातो. या केकची खासियत म्हणजे त्यामध्ये वापरण्यात येणारा सुकामेवा, ड्रायफ्रूट्स आणि सुगंधी मसाले. मनुका, काजू, बदाम, अंजीर, खजूर, यांसारखा सुकामेवा आधी रसात किंवा पारंपरिक पद्धतीने वाइन अथवा रममध्ये भिजवून केक तयार करतात. प्लम केक, फ्रूट केक, चॉकलेट केक, ब्लॅक फॉरेस्ट केक, व्हॅनिला केक, स्टूबिरी केक, बटरस्कॉच, रेड व्हेलव्हेट केक, नट केक, शुगर फ्री केक असे विविध प्रकारचे केक ख्रिसमसनिमित्त कापण्याची परंपरा आहे.
असा बनवतात प्लम केक
मनुका, काजू, बदाम, अंजऔर, खजूर यांसारखा सुकामेवा आधी रसात किंवा पारंपरिक पद्धतीने वाइन अथवा रममध्ये भिजवून ठेवला जातो. त्यानंतर ओव्हन प्री-हीट करून केक टिनला बटर व मैदा लावला जातो. साखरेचा कॅरामेल तयार करून तो केकच्या मिश्रणात मिसळला जातो. बटर आणि साखर नीट फेटून त्यात अंडी (किंवा एगलेस पर्याय) चालण्यात येतात.
वेगळ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि मसाले चाळून घेतले जातात. हे कोरडे साहित्य हळूहळू बटरच्या मिश्रणात मिसळून त्यात भिजवलेला सुकामेवा आणि व्हॅनिला इसेन्स घालून मिश्रण तयार केले जाते. हे मिश्रण केक टिनमध्ये ओतून साधारण ४५ ते ६० मिनिटे बेक केले जाते. केक शिजल्यानंतर पूर्ण थंड करून कापला जातो. काही ठिकाणी केक एक-दोन दिवस ठेवून मग कापण्याची पद्धत आहे, कारण त्यामुळे केकची चव अधिक खुलते.
बेकर्स काय सांगतात ?
केक बेकर पूजा चौधरी म्हणतात, "ख्रिसमस व नववर्षाच्या काळात केकची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. नियमित ग्राहकांसह नव्या ऑर्डर्सही मोठ्या संख्येने येतात. पारंपरिक फ्लेव्हर्ड्ससोबतच आरोग्याबाबत जागरूक ग्राहक विगन आणि विशेष घटकांपासून तयार केलेल्या केकना पसंती देत आहेत. केक विक्रीबरोबरच बेकिंग शिकण्याकडेही तरुणांचा कल वाढत असून या कालावधीत वर्गांसाठी चौकशी लक्षणीयरीत्या वाढते."
व्यावसायिक श्रुती पाटील यांनी सांगितले की, "सणासुदीच्या दिवसांत प्लम केकसह विविध प्रकारच्या ख्रिसमस स्पेशल केकची मागणी कायम असते. त्यामुळे या काळात प्रशिक्षण वर्गांमध्येही उत्साह दिसून येतो. विद्यार्थ्यांना पारंपरिक चवींबरोबरच नव्या डिझाइन आणि आधुनिक तंत्रांचा वापर कसा करायचा, यावर भर दिला जातो. सणांच्या निमित्ताने अनेकांना बेकिंग व्यवसायाकडे वळण्याची प्रेरणा मिळते."