ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेते विनोद कुमार शुक्ल यांचे निधन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेते विनोद कुमार शुक्ल
ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ विजेते विनोद कुमार शुक्ल

 

हिंदी साहित्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व आणि आपल्या विलक्षण लेखनशैलीने वाचकांवर मोहिनी घालणारे ज्येष्ठ साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन झाले आहे. मंगळवारी वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे भारतीय साहित्य विश्वावर शोककळा पसरली असून एका संवेदनशील युगाचा अंत झाला आहे. रायपूर येथील राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली.

विनोद कुमार शुक्ल हे केवळ हिंदी भाषेतीलच नव्हे, तर जागतिक पातळीवर दखल घेतली गेलेले महत्त्वाचे लेखक होते. त्यांचे साहित्य सामान्य माणसाचे जगणे, त्यांची स्वप्ने आणि संघर्ष अतिशय वेगळ्या पद्धतीने मांडते. त्यांच्या लेखनात एक प्रकारची जादू होती, तिला समीक्षक 'मॅजिकल रिअलिझम' असेही म्हणतात. कविता आणि गद्य या दोन्ही प्रकारांत त्यांनी अतिशय ताकदीने लेखन केले. त्यांच्या साहित्याचा प्रभाव अनेक पिढ्यांवर दिसून येतो.

त्यांची 'नौकर की कमीज' ही कादंबरी साहित्य विश्वात मैलाचा दगड मानली जाते. प्रसिद्ध दिग्दर्शक मणी कौल यांनी या कादंबरीवर आधारित याच नावाचा चित्रपटही तयार केला होता. याशिवाय 'दीवार में एक खिडकी रहती थी' आणि 'खिलेगा तो देखेंगे' या त्यांच्या कादंबऱ्याही प्रचंड गाजल्या. 'सब कुछ होना बचा रहेगा' हा त्यांचा कवितासंग्रह रसिकांच्या विशेष पसंतीस उतरला होता. त्यांचे साहित्य केवळ हिंदीपुरते मर्यादित राहिले नाही, तर अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत.

साहित्यातील या अमूल्य योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांना साहित्यातील सर्वोच्च अशा ज्ञानपीठ निवड समितीचा पुरस्कार मिळाला होता. तसेच साहित्य अकादमी पुरस्कारानेही त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला होता. विशेष म्हणजे, २०२३ मध्ये त्यांना साहित्यातील अत्यंत प्रतिष्ठित अशा आंतरराष्ट्रीय 'पेन/नाबोकोव्ह' (PEN/Nabokov) पुरस्काराने गौरवण्यात आले होते. हा सन्मान मिळवणारे ते आशियातील पहिलेच भारतीय वंशाचे लेखक ठरले होते. त्यांच्या जाण्याने साहित्याची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे.