महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात लवकरच मोठे फेरबदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) विद्यमान प्रमुख सदानंद दाते हे राज्याचे नवे पोलीस महासंचालक (डीजीपी) होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या महत्त्वाच्या पदासाठी सदानंद दाते यांचे नाव आघाडीवर असून राज्य सरकार लवकरच त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा करू शकते.
सध्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याकडे संपूर्ण प्रशासनाचे आणि राज्याचे लक्ष लागले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) उच्चस्तरीय समितीने या पदासाठी पात्र असलेल्या तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निश्चित केली आहेत. या पॅनेलमध्ये सदानंद दाते यांच्या नावाचा समावेश असून सेवाज्येष्ठता आणि अनुभवाच्या जोरावर त्यांचे पारडे जड मानले जात आहे.
सदानंद दाते हे १९९० च्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अत्यंत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान त्यांनी दाखवलेले असीम धाडस आजही सर्वांच्या स्मरणात आहे. कामा हॉस्पिटलमध्ये अतिरेक्यांशी लढा देताना त्यांनी प्राणांची बाजी लावली होती आणि त्यात ते जखमीही झाले होते. त्यांच्या या शौर्यासाठी त्यांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित करण्यात आले आहे.
दाते यांनी यापूर्वी महाराष्ट्रात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पहिले पोलीस आयुक्त होण्याचा मान त्यांना मिळाला होता. तसेच राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख म्हणूनही त्यांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे. सध्या ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर असून 'एनआयए'चे महासंचालक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. आता पुन्हा एकदा ते आपल्या गृहराज्यात पोलीस दलाचे नेतृत्व करण्यासाठी सज्ज झाले आहेत.