ओडिशामध्ये नक्षलवादविरोधी मोहिमेला ऐतिहासिक यश; २२ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

ओडिशा पोलिसांना नक्षलवादविरोधी अभियानात एक ऐतिहासिक यश मिळाले आहे. तब्बल २ कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस डोक्यावर असलेल्या २२ नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात परतण्याचा मोठा निर्णय या नक्षलवाद्यांनी घेतला आहे. राज्याच्या नक्षलवादविरोधी लढ्यातील ही एक मोठी घडामोडी मानली जात आहे.

आत्मसमर्पण केलेले हे सर्व नक्षलवादी बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेशी संबंधित होते. त्यांनी पोलीस महासंचालक आणि सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शस्रे खाली टाकली. या समूहात अनेक कट्टर आणि जुन्या नक्षलवाद्यांचा समावेश आहे. या सर्वांवर शासनाने विविध गुन्ह्यांत मिळून २ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे बक्षीस जाहीर केले होते.

नक्षलवादी विचारसरणी आणि हिंसाचाराला कंटाळून त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे. संघटनेतील वरिष्ठ नेत्यांकडून होणारे शोषण आणि भेदभाव याला ते वैतागले होते. तसेच ओडिशामध्ये शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या विकासकामांचा सकारात्मक परिणाम त्यांच्यावर झाला. यामुळेच त्यांनी जंगलातील खडतर आयुष्य सोडून सन्मानाने जगण्यासाठी मुख्य प्रवाहात सामील होणे पसंत केले.

राज्य सरकारच्या आत्मसमर्पण आणि पुनर्वसन धोरणाअंतर्गत या सर्वांना मदत करण्यात येईल. त्यांना आर्थिक साहाय्य, घर आणि इतर सुविधा पुरवण्यात येतील, जेणेकरून ते सामान्य आयुष्य जगू शकतील. पोलिसांच्या वाढत्या दबावतंत्रामुळे आणि शासनाच्या विकासात्मक धोरणांमुळे नक्षलवादी चळवळीला हा मोठा धक्का बसला आहे.