बांगलादेशात सध्या धार्मिक उन्मादाने टोक गाठले आहे. क्रांतीकारी नेता शरीफ हादी याच्या हत्येनंतर देशात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान एक भीषण घटना समोर आली आहे. तिथे एका जमावाने एका हिंदू तरुणाला बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्याला एका झाडावर लटकवून जिवंत जाळून टाकले. या घटनेचे पडसाद भारतातही उमटले असून भारतीय मुस्लिम तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
भ्याड कृत्याचा तीव्र निषेध
राजधानी दिल्लीतील मुमताज शेख यांनी एक व्हिडिओ प्रसिद्ध करून बांगलादेशी मुस्लिमांवर कडक शब्दात टीका केली आहे. ते म्हणतात, "भावांनो, बांगलादेशात काय सुरू आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तिथे दिपू चंद्रदास नावाच्या एका तरुणाने काहीतरी चुकीचे शब्द उच्चारले म्हणून तिथल्या भ्याड लोकांनी एकत्र येऊन त्याच्यासोबत जे कृत्य केले, ते सांगतानाही मला लाज वाटते."
मुमताज पुढे म्हणतात की, "मी त्यांना भ्याड यासाठी म्हणतोय कारण कोणत्याच धर्मग्रंथात असे लिहिलेले नाही की, जर कोणी धर्माबद्दल काही बोलले तर त्याला अशी शिक्षा द्यावी. तिथल्या लोकांना जर माझा आवाज ऐकू जात असेल तर ऐकून घ्या, तुमच्या देशात कायदा नाही तर तिथे केवळ मेंढरांसारखा कारभार सुरू आहे."
"चुकीला चुकीचे म्हटलेच पाहिजे"
व्हिडिओमध्ये मुमताज शेख खूप संतापलेले दिसत आहेत. ते म्हणतात की, "जर चुकीच्या माणसाला चुकीचे म्हटले नाही, तर तुम्ही सुद्धा चुकीचे आहात. कोट्यवधी फॉलोअर्स असलेले इन्फ्लुएन्सर्स यावर गप्प का आहेत? पीडितांच्या सुरक्षेसाठी त्यांनी आवाज का उठवला नाही? गुन्हेगार माझ्या स्वतःच्या समाजाचा असला तरी मी त्याला चुकीचेच म्हणेन."
मुमताज यांनी हे देखील लक्षात आणून दिले की, बांगलादेशातील अनेक लोक भारतात येऊन कोट्यवधी रुपये कमावतात आणि आपल्या देशात घेऊन जातात. त्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचे आवाहन केले आहे जेणेकरून जगाला तिथल्या वास्तवाची कल्पना येईल.
मानवता आणि धर्माचा अपमान
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ओवेस अहमद कासमी या तरुणाने या घटनेचा निषेध करताना म्हटले आहे की, "अशा घटना इस्लामच्या विरोधात असून मुस्लिमांचेच नुकसान करणाऱ्या आहेत. त्या व्यक्तीवर ईशनिंदेचा आरोप होता, पण म्हणून जमावाने त्याला मारून टाकावे, हा कोणता न्याय? भारतात जेव्हा मुस्लिमांवर असे हल्ले होतात तेव्हा आपल्याला किती दुःख होते? मग दुसऱ्या देशातील अल्पसंख्याकांबाबत असे घडत असेल, तर ते कसे काय चालवून घेता येईल?"
कासमी पुढे म्हणतात की, "जर खरोखरच त्या व्यक्तीने प्रेषितांचा अपमान केला असेल, तर कारवाई करण्यासाठी तिथले सरकार आणि कायदा आहे. जमावाने स्वतः न्यायाधीश बनणे चुकीचे आहे. जे लोक अशी कृत्ये करतात, ते आपली क्रूरता दाखवून देतात."
कायद्याची पायमल्ली
अफसर रझा नावाच्या एका तरुणानेही आपला संताप व्यक्त केला आहे. तो म्हणतो, "धर्माच्या पलीकडे जाऊन जर माणुसकीच्या नजरेतून पाहिले, तर प्रत्येक जण म्हणेल की तिथे जे घडले ते चुकीचेच होते. माणसाकडून चूक झाली असेलही, पण त्याला शिक्षा देणारे तुम्ही कोण? जर प्रत्येक माणूस स्वतःच निर्णय घेऊ लागला, तर तो देश देश उरेल का? तिथल्या सरकारने व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला अटक करून फासावर लटकवावे."
सध्या सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये भारतीय मुस्लिम, विद्वान आणि सामान्य नागरिक बांगलादेशातील या रानटी कृत्याचा निषेध करत आहेत.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -