अज्ञानातून दिलेली 'काफिर'ची हाक म्हणजे प्रेषितांच्या महान आचरणाशी केलेली प्रतारणा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 6 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

डॉ. उज्मा खातून

आजच्या जागतिक परिस्थितीत 'काफिर' या शब्दातील धार्मिक खोली पूर्णपणे उथळ करण्यात आली आहे. राजकीय फायद्यासाठी आणि सोशल मीडियावरील द्वेषासाठी या शब्दाचा वापर एखाद्या शस्त्रासारखा केला जात आहे.

टीकाकार वारंवार असे भासवतात की, इस्लाम जगाची विभागणी 'श्रद्धावान' आणि 'शत्रू' अशा दोन भागांत करतो. टीव्हीवरील वादविवाद आणि चुकीच्या माहितीमुळे मुस्लिमांकडे असहिष्णू म्हणून पाहिले जाते.

दुसरीकडे, कट्टरपंथी गटांनीही या शब्दाचा विपर्यास करून हिंसाचाराचे समर्थन केले आहे. या शब्दाच्या चुकीच्या वापराचा फटका जगभरातील सामान्य मुस्लिमांना बसत आहे. वास्तविक, कुराणमध्ये या शब्दाचा वापर अत्यंत विशिष्ट आणि नैतिक मर्यादेत राहून केला गेला आहे.

हा शब्दाचा विपर्यास समजून घेण्यासाठी त्याच्या मुळाकडे जाणे आवश्यक आहे. अरबी भाषेत 'क-फ-र' या शब्दाचा शब्दशः अर्थ 'झाकणे' किंवा 'लपवणे' असा होतो.

ऐतिहासिकदृष्ट्या, शेतकरी जेव्हा मातीत बियाणे पेरून ते झाकून टाकत असे, तेव्हा या शब्दाचा वापर व्हायचा. कुराणच्या संदर्भात याचा अर्थ माहीत असलेले सत्य जाणीवपूर्वक नाकारणे किंवा लपवणे असा होतो.

हे एखाद्याच्या कृतीचे वर्णन आहे, ती कोणाची कायमस्वरूपी ओळख नाही. विशेष म्हणजे, कुराणमध्ये हाच शब्द देवासाठी सुद्धा वापरला गेला आहे, जिथे देव माणसांची पापे 'झाकून टाकतो' म्हणजेच माफ करतो.

यावरून स्पष्ट होते की, हा शब्द माणसाच्या जन्माशी किंवा जातीशी निगडित नसून सत्याप्रती असलेल्या त्याच्या मानसिक प्रतिसादाशी संबंधित आहे.

कुणाचेही मत तपासण्याचे अधिकार माणसाला नाहीत

अनेकांचा असा समज आहे की, प्रत्येक मुस्लिमेतर व्यक्ती ही आपोआज 'काफिर' ठरते. मात्र, अभ्यासू विद्वानांच्या मते हे पूर्णपणे चुकीचे आहे.

विद्वान जावेद अहमद घामिदी यांच्या मते, कुणीतरी सत्याला केवळ नाकारले म्हणून तो काफिर ठरत नाही. जेव्हा एखाद्या समोर सत्य पूर्णपणे स्पष्ट झाले असते आणि तरीही तो हट्टीपणामुळे ते नाकारतो, तेव्हाच त्याला 'कुफ्र' म्हटले जाते.

प्रेषितांच्या काळात अशा प्रकारची खात्री पटवणे शक्य होते. आजच्या काळात कोणताही माणूस दुसऱ्याच्या मनात काय चालले आहे हे ओळखू शकत नाही.

त्यामुळे एखाद्याला 'काफिर' जाहीर करणे म्हणजे स्वतःला देवाच्या बरोबरीचे समजण्यासारखे आहे, जे इस्लाममध्ये मान्य नाही.

भारतासारख्या बहुधर्मीय देशात हा फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. कायद्याच्या भाषेत वर्गीकरण असू शकते, पण त्याचा वापर कुणाचा अपमान करण्यासाठी करणे हे इस्लामच्या विरोधात आहे.

कुराण सांगते की, अंतिम निवाडा करण्याचा अधिकार केवळ निर्मात्याला आहे. प्रेषित मुसा (अ.स.) आणि फिरऊनची गोष्ट याचे उत्तम उदाहरण आहे.

फिरऊन अत्यंत क्रूर हुकूमशहा होता, तरीही देवाने मुसा यांना त्याच्याशी नम्रपणे बोलण्याची आज्ञा दिली होती. जर फिरऊनसारख्या माणसाशी नम्रपणे बोलायचे असेल, तर आज कोणालाही दुसऱ्याचा अपमान करण्याचा हक्क नाही.

प्रेषित मोहम्मद (स.) यांनी आपल्या वर्तनातून हेच सिद्ध केले. जेव्हा त्यांना विरोधकांना शाप देण्यास सांगितले गेले, तेव्हा ते म्हणाले, "मी शाप देण्यासाठी नाही, तर दया आणि प्रेम वाटण्यासाठी आलो आहे."

त्यांच्या मते, खरा श्रद्धावान तोच आहे जो कधीही कुणाचा अपमान करत नाही किंवा असभ्य भाषा वापरत नाही. त्यामुळे 'काफिर' शब्दाचा वापर शिवीसारखा करणे हा प्रेषितांच्या आचरणाचा अपमान आहे.

कायदेशीर नीतिमत्ता आणि सामाजिक परिणाम

इस्लामी कायद्यातही दुसऱ्याला इजा पोहोचवणाऱ्या बोलण्यावर कडक निर्बंध आहेत. हनफी आणि हनबली विचारवंतांनी स्पष्ट म्हटले आहे की, मुस्लिमेतर व्यक्तीचा अपमान करणे हे मोठे पाप आहे.

विद्वान इब्न नुजैम म्हणतात की, एखाद्याला "तू काफिर आहेस" असे म्हणणे देखील निषिद्ध आहे, कारण यामुळे त्या व्यक्तीला मानसिक त्रास होतो.

कुराणची सक्त आज्ञा आहे की, "एकमेकांना अपमानजनक टोपणनावांनी हाक मारू नका." तसेच, इतर लोक ज्यांची पूजा करतात त्यांचा अपमान करू नका, अशीही ताकीद कुराणने दिली आहे.

आजच्या जगात, जिथे मुस्लिम अल्पसंख्याक आहेत, तिथे अशा शब्दांचा बेजबाबदार वापर करणे धोकादायक आहे. आयएसआयएस (ISIS) किंवा तालिबानसारख्या संघटनांनी या शब्दाचे राजकीय शस्त्र बनवले आहे.

त्यांनी इतरांना 'धर्माबाहेर' ठरवून हिंसाचार माजवला, ज्यामुळे मुस्लिमांचेच नुकसान झाले. हा गैरवापर म्हणजे प्रत्यक्ष कुराणच्या शिकवणीवर केलेला हल्लाच आहे.

काही लोक असा युक्तिवाद करतात की, कुराणमध्ये हा शब्द आहे तर आपण तो का वापरू नये? पण देवाचे वर्णन आणि माणसाची शिवी यात मोठा फरक असतो.

कुराण वास्तव मांडते, ते द्वेष पसरवण्याचे साधन नाही. संयम पाळणे ही कमजोरी नसून ती आध्यात्मिक शिस्त आहे. प्रेषितांनी सावध केले होते की, आपण ज्याचा अपमान करतो, तो अपमान उलट आपल्यावरच येतो.

प्रेषितांच्या मते, मुस्लिम तोच आहे ज्याच्या बोलण्यापासून आणि हातापासून इतर सर्व लोक सुरक्षित आहेत. यात शाब्दिक हिंसाचाराला अजिबात जागा नाही.

त्यामुळे 'काफिर' या शब्दाचा मूळ कुराणमधील अर्थ पुन्हा प्रस्थापित करणे म्हणजे इस्लामी नीतिमत्तेचे रक्षण करणे होय. अडचण कुराणच्या शब्दांत नाही, तर राजकारणी आणि बेजबाबदार लोकांनी केलेल्या त्याच्या गैरवापरात आहे.

कुराण आपल्याला अन्यायाविरुद्ध बोलतानाही 'शहाणपण आणि चांगल्या उपदेशाने' संवाद साधण्याचे आवाहन करते. विभागलेल्या समाजात मुस्लिमांनीच पुढाकार घेऊन आपल्या धार्मिक शब्दांचा गैरवापर थांबवला पाहिजे.

मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करणे हे कुराणने दिलेले कर्तव्य आहे. जेव्हा आपण या तत्त्वांचे पालन करतो, तेव्हा आपण धर्माचा सन्मानच करत असतो.

(लेखिका अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका असून त्या सामाजिक विचारवंत आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter