डॉ. उज्मा खातून
मुफ्ती शमाईल नदवी आणि जावेद अख्तर यांच्यातील अलीकडील वादविवादामुळे ईश्वराच्या अस्तित्वाविषयीच्या जुन्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. हा वाद म्हणजे श्रद्धेची 'तार्किक गरज' आणि पुराव्यांची 'संशयास्पद मागणी' यांतील संघर्ष म्हणून पाहिला गेला.
परंतु, हा संवाद म्हणजे केवळ आजचा वाद नसून गेल्या हजार वर्षांपासून सुरू असलेल्या इस्लामिक बौद्धिक परंपरेचा एक भाग आहे. इस्लाममधील ईश्वराचा शोध हा कधीच केवळ आंधळ्या आज्ञापालनाचा प्रवास नव्हता. उलट, तो विचारांचा एक मोठा लढा होता, जिथे निर्मात्याला ओळखण्यासाठी 'बुद्धी' (अक्ल) हे सर्वात महत्त्वाचे साधन मानले गेले.
आधुनिक संशयवादाच्या खूप आधीपासून मुस्लिम विद्वानांनी ग्रीक, पर्शियन आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला होता. यातून हेच सिद्ध होते की, ईश्वराचा शोध हा जेवढा हृदयाचा विषय आहे, तेवढाच तो मेंदूचाही आहे.
इस्लामिक अभ्यासाची विद्यार्थिनी म्हणून मला हा आधुनिक वाद म्हणजे इस्लामने नेहमीच जोपासलेल्या 'मध्यम मार्गा'चे प्रतिबिंब वाटतो. 'इल्म अल-कलाम' (तर्कशास्त्र) चा हा प्रवास सांगतो की, इस्लाममध्ये श्रद्धा म्हणजे प्रश्नांची गळचेपी करणे नसून सत्याचा शोध घेऊन त्यांची उत्तरे देणे होय.
राजकीय संघर्ष ते तर्कवादाचा पाया
इस्लाममध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचा पद्धतशीर अभ्यास उमय्या आणि अब्बासी कालखंडातील राजकीय आणि सांस्कृतिक संघर्षातून झाला. सुरुवातीला हा वाद मानवी स्वातंत्र्य आणि ईश्वरी न्यायावर केंद्रित होता. तत्कालीन राज्यकर्ते सहसा 'जब्रिते' पंथाचे समर्थन करायचे, ज्यांच्या मते मानवाचे नशीब पूर्णपणे देवानेच ठरवलेले असते. याउलट 'काद्रिते' पंथ समोर आला, ज्याने मानवाच्या 'इच्छास्वातंत्र्याचा' (फ्री विल) पुरस्कार केला.
हा विचार कुराणमध्येही दिसून येतो. जेव्हा अल्लाहने इब्लिसला आदम (अ.स.) समोर वाकण्याची आज्ञा दिली, तेव्हा इब्लिसने ती नाकारण्याचा निर्णय घेतला. तसेच, जेव्हा आदम (अ.स.) यांना एका झाडाचे फळ खाण्यास मनाई केली गेली, तेव्हा त्यांनी आपली निवड करण्याची शक्ती वापरली.
या कथा सिद्ध करतात की, देवाने मानवाला आपल्या आज्ञेपासून दूर जाण्याची शक्ती दिली आहे, ज्यामुळे नैतिक जबाबदारी शक्य होते. या स्वातंत्र्याशिवाय ईश्वरी न्यायाच्या संकल्पनेला कोणताही अर्थ उरणार नाही.
इस्लामी साम्राज्य विस्तारले तसे ग्रीक आणि पर्शियन संस्कृतींशी त्याचा सामना झाला. मुस्लिम विद्वानांना भौतिकवाद्यांपासून आपल्या श्रद्धेचे रक्षण करावे लागले. यातून 'मुताझिला' पंथ उदयाला आला. या विचारवंतांचा असा विश्वास होता की, केवळ शुद्ध बुद्धीच्या जोरावर माणूस ईश्वराचे अस्तित्व मान्य करू शकतो. खलिफा अल-मामूनच्या काळात या विचारांनी टोक गाठले आणि 'हाऊस ऑफ विस्डम'ची स्थापना झाली. हा असा काळ होता जेव्हा विश्वाचे नियम मानवी मनाला शोधता येतात, हे प्रस्थापित झाले.
नैतिक जाणीव आणि नैसर्गिक दुःखाचा प्रश्न
या संवादाचा केंद्रबिंदू म्हणजे मानवातील उपजत 'नैतिक जाणीव' (हिस्सा-ए-अख्लाकी) होय. मानव जीवनाचे पावित्र्य ओळखतो, कारण त्याच्याकडे ती समज आहे. अनेकदा प्राण्यांच्या दुःखावरून ईश्वराच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केले जातात. इस्लाममध्ये मानव आणि इतर प्राणी यांच्यात स्पष्ट फरक केला आहे.
मानवाकडे 'इरादा-ओ-इख्तियार' (इच्छाशक्ती आणि निवड) आहे आणि तो येथे एका 'चाचणी' (अझमाइश) मधून जात आहे. प्राण्यांवर ही नैतिक जबाबदारी नाही.
निसर्गातील वेदनांच्या बाबतीत ईश्वराची काहीतरी 'गुप्त बुद्धी' (हिकमत) असते. आपण चालताना किंवा श्वास घेताना नकळत अनेक सूक्ष्म जीवांची हत्या करतो. जीवनाच्या अस्तित्वासाठी काही प्रमाणात वेदना अपरिहार्य आहेत. इस्लाम यावर 'क्रूरता न करण्या'चा तोडगा देतो.
तहानेलेल्या कुत्र्याला पाणी पाजल्यामुळे स्वर्ग मिळू शकतो, तर मांजराला त्रास दिल्यामुळे नरक मिळू शकतो. ही नैतिक चौकट सांगते की, जगातील दुःख ही मानवी दृष्टीकोनाची समस्या आहे, कारण आपल्याला ईश्वराने निर्माण केलेला व्यापक नैसर्गिक समतोल दिसत नाही.
प्राचीन पुरावे आणि आधुनिक आव्हाने
भौतिकवाद्यांना उत्तर देण्यासाठी इस्लामिक विद्वानांनी काही 'वैश्विक पुरावे' विकसित केले. त्यातील महत्त्वाचा म्हणजे 'दलील अल-हुदुथ'. अल्-गझालींसारख्या विद्वानांनी असा तर्क मांडला की, ज्या गोष्टीला सुरुवात आहे, तिला कोणीतरी निर्माण केलेले असते. हे विश्व सतत बदलत असल्याने त्याला कोणीतरी 'प्रथम निर्माता' (मुहदिथ) असणे आवश्यक आहे.
इब्न सिना यांनी 'दलील अल-इमकान'द्वारे सांगितले की, हे जग अस्तित्वात असणे किंवा नसणे ही एक 'शक्यता' आहे, त्यामुळे त्याचे अस्तित्व टिकवून ठेवणारा एखादा 'स्वयंभू' (वाजिब अल-वजूद) असणे गरजेचे आहे. फख्र अल-दिन अल-राझी यांनी गणिती तर्काने सिद्ध केले की, कारणांची साखळी अनंत काळापर्यंत मागे जाऊ शकत नाही; त्याला कुठेतरी सुरुवातीचा बिंदू म्हणजेच ईश्वर हवाच.
या विद्वानांनी बुद्धीला श्रद्धेचा शत्रू मानले नाही, तर तिला 'अंतर्गत प्रेषित' मानले. इब्न रुश्द यांनी मांडलेला 'नियोजन पुरावा' (दलील अल-इनाया) सांगतो की, मानवी डोळ्यापासून ते ताऱ्यांच्या हालचालींपर्यंत सर्व काही इतके अचूक आहे की, त्यामागे कोणीतरी बुद्धीमान 'डिझायनर' असणे अनिवार्य आहे. याशिवाय मानवी मनाचा 'अंतरात्मा' (नफ्स-अल-लव्वामा) हा एक नैतिक होकायंत्र म्हणून कार्य करतो, जो ईश्वराच्या अस्तित्वाची साक्ष देतो.
इस्लामिक विचारांचा हा वारसा आपल्याला आठवण करून देतो की, ईश्वराच्या अस्तित्वाचा वाद केवळ जिंकण्यासाठी नाही, तर या गुंतागुंतीच्या विश्वात जीवनाचा अर्थ शोधण्यासाठी आहे. आधुनिक 'नव-नास्तिक' चळवळ अनेकदा धर्माला हिंसेचे मूळ मानते, पण जागतिक युद्धांमधील कोट्यवधी मृत्यूंना कारणीभूत असलेल्या धर्मनिरपेक्ष आणि भौतिकवादी विचारसरणीकडे दुर्लक्ष करते. इतिहासात धर्माच्या नावाने झालेली बहुतांश युद्धे ही प्रत्यक्षात जमीन, सत्ता आणि वसाहतवादासाठी लढली गेली होती.
विज्ञानाने विश्वाचे 'How' स्पष्ट केले तरी 'Why' या प्रश्नाचे उत्तर केवळ ईश्वरच देऊ शकतो. इस्लामचा ईश्वर निसर्गाच्या 'मूक पुस्तकातून' (निसर्ग) आणि कुराणच्या 'बोलक्या पुस्तकातून' स्वतःला प्रगट करतो. विचार करण्याची आणि निवड करण्याची आपली क्षमता, हेच आपले सर्वात मोठे दैवी गुण आहेत.
(लेखिका अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या माजी प्राध्यापिका असून त्या स्तंभलेखिका आणि सामाजिक विचारवंत आहेत)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -