इस्रोची अंतराळात ऐतिहासिक भरारी! LVM3 रॉकेटद्वारे 'ब्लूबर्ड' उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आज जागतिक अवकाश बाजारपेठेत पुन्हा एकदा आपला डंका वाजवला आहे. इस्रोचा सर्वात शक्तिशाली रॉकेट 'एलव्हीएम-३' (LVM3) द्वारे अमेरिकेच्या 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' या अत्याधुनिक संचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. विशेष म्हणजे, एलव्हीएम-३ रॉकेटने वाहून नेलेला हा आजवरचा सर्वात जड उपग्रह (पेलोड) ठरला आहे.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून हे ऐतिहासिक उड्डाण झाले. या मोहिमेद्वारे इस्रोने व्यावसायिक प्रक्षेपण क्षेत्रात आपली क्षमता पुन्हा सिद्ध केली आहे. अमेरिकेच्या 'एएसटी स्पेसमोबाईल' (AST SpaceMobile) कंपनीचा हा उपग्रह आहे. अंतराळातून थेट मोबाईलवर ब्रॉडबँड सेवा पुरवण्याचे तंत्रज्ञान या उपग्रहात विकसित करण्यात आले आहे.

इस्रोची व्यावसायिक शाखा असलेल्या 'न्यूस्पेस इंडिया लिमिटेड' (NSIL) ने हे कंत्राट मिळवले होते. एलव्हीएम-३ रॉकेटची क्षमता आणि विश्वासार्हता यामुळे परदेशी कंपन्यांचा भारतावरील विश्वास वाढत चालला आहे. यापूर्वी या रॉकेटचा वापर चांद्रयान-३ आणि वनवेबच्या उपग्रह प्रक्षेपणासाठी करण्यात आला होता. मात्र, 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' चे वजन त्या सर्वांपेक्षा अधिक होते.

प्रक्षेपणांनंतर काही मिनिटांतच रॉकेटने उपग्रहाला नियोजित कक्षेत अचूकपणे सोडले. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी या आव्हानात्मक मोहिमेसाठी विशेष तयारी केली होती. उपग्रहाचे वजन जास्त असल्याने रॉकेटच्या इंजिन आणि उड्डाण मार्गात तांत्रिक अचूकता राखणे गरजेचे होते. या यशाबद्दल इस्रोचे अध्यक्ष आणि संपूर्ण टीमचे जगभरातून कौतुक होत आहे. भारतासाठी हे वर्ष अंतराळ संशोधनात अत्यंत फलदायी ठरले आहे.

या यशस्वी प्रक्षेपणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "भारताच्या अंतराळ क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण झेप… LVM3-M6 च्या यशस्वी प्रक्षेपणाद्वारे अमेरिकेच्या 'ब्लूबर्ड ब्लॉक-२' या उपग्रहाला त्याच्या नियोजित कक्षेत स्थापित करण्यात आले आहे. भारतीय भूमीवरून प्रक्षेपित केला गेलेला हा आजवरचा सर्वात जड उपग्रह असून, भारताच्या अंतराळ प्रवासातील हा एक अत्यंत अभिमानास्पद टप्पा आहे. यामुळे भारताची अवजड उपग्रह प्रक्षेपणाची क्षमता (Heavy-lift launch capability) अधिक बळकट झाली आहे आणि जागतिक व्यावसायिक प्रक्षेपण बाजारपेठेत भारताची वाढती भूमिका अधोरेखित झाली आहे. हे यश 'आत्मनिर्भर भारता'च्या दिशेने सुरू असलेल्या आपल्या प्रयत्नांचे प्रतिबिंब आहे. आपल्या मेहनती अंतराळ शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. अंतराळ विश्वात भारत सातत्याने उत्तुंग भरारी घेत आहे!"