ईशान्य भारताचा नाताळ : निसर्गाच्या कुशीत भरतो संस्कृतीचा मेळा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
ईशान्य भारतातील नाताळ
ईशान्य भारतातील नाताळ

 

मुन्नी बेगम, गुवाहाटी

भारतात नाताळ म्हटलं की डोळ्यांसमोर गोवा किंवा केरळची रोषणाईने उजळलेली चर्च येतात. पण भारताच्या ईशान्य भागात हा सण पांढऱ्या धुक्याने वेढलेल्या दऱ्या आणि डोंगररांगांमध्ये एका अतिशय सुंदर आणि सात्विक पद्धतीने साजरा केला जातो. देशातील नाताळच्या या विलक्षण पण फारशा कोणाला माहीत नसलेल्या कथा खरोखरच थक्क करणाऱ्या आहेत.

ईशान्येत नाताळ हा केवळ एक सण नाही, तर तो तिथली ओळख, समुदाय, संगीत आणि आठवणींचा संगम आहे. नागालँड, मिझोराम, मेघालय, मणिपूर, अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांत मोठी ख्रिस्ती लोकसंख्या राहते. तिथल्या लोकांसाठी ख्रिस्ती धर्म केवळ एक धर्म म्हणून आला नाही, तर त्यासोबत सामाजिक बदल, शिक्षण आणि सांस्कृतिक प्रगतीही आली. म्हणूनच इथे नाताळ खूप मनापासून आणि आध्यात्मिक उत्साहात साजरा होतो.

स्वच्छतेतून आणि संगीतातून मिळणारा आनंद

ईशान्येतील गावांमध्ये नाताळची तयारी काही आठवडे आधीच सुरू होते. चर्चमधील सामूहिक प्रार्थनेसाठी दररोज संध्याकाळी गाण्यांचा सराव केला जातो. संगीत हा तर ईशान्येतील नाताळचा श्वास आहे. या काळात संगीत जणू तिथल्या हवेतच विरघळलेले असते. तरुणांचे गट वृद्ध आणि आजारी माणसांच्या भेटी घेतात. संपूर्ण परिसर स्वच्छ करून सजवला जातो. महत्त्वाचे म्हणजे, इथला नाताळ हा व्यापारी हेतूने प्रेरित नसून तो लोकांसाठी लोकांकडून साजरा केला जाणारा सण आहे.

नागालँडमधील डोंगरदऱ्यांमध्ये थंडीच्या रात्री गिटारचा आवाज आणि कॅरल्सचे (भजन) सूर घुमू लागतात. चर्चमधील तरुणांचे गट घरोघरी जाऊन गाणी गातात. मेघालयाची राजधानी शिलाँगला तर भारताची 'संगीत राजधानी' म्हटले जाते. तिथे नाताळच्या वेळी जणू एखादा मोठा मैफलच सुरू असते. तिथल्या चर्चमध्ये पाश्चात्य शास्त्रीय संगीताची परंपरा जपली जाते, ज्यात व्हायोलिन आणि कीबोर्डच्या साथीने गायली जाणारी गाणी मन प्रसन्न करतात. मिझोराममध्ये तर हजारो लोक एकत्र येऊन अशा पद्धतीने गाणी गातात की तो आवाज एखाद्या धडधडणाऱ्या हृदयासारखा भासतो.

पारंपारिक मेजवानी आणि आपुलकी

ईशान्येत नाताळचा आहार म्हणजे केवळ रेस्टॉरंटमधील मेनू नसून, ती पिढ्यानपिढ्या चालत आलेली एक आदिवासी परंपरा आहे. नागालँडमध्ये बांबू शूट आणि सोयाबीन वापरून बनवलेले डुकराचे मांस, तांदळाचे पदार्थ आणि ताज्या औषधी वनस्पतींनी बनवलेली मेजवानी संपूर्ण गाव एकत्र येऊन घेते. मिझोराममध्ये नाताळच्या वेळी घरोघरी दरवाजे उघडे असतात. पाहुण्यांचे स्वागत ताजे सूप, भाज्या आणि 'बाई' नावाचा तांदळाचा पारंपारिक पदार्थ देऊन केले जाते. मेघालयात 'जाडोह' हा पुलावचा एक प्रकार आणि तांदळाच्या पिठाचे केक खास बनवले जातात. अन्नाचे हे वाटप केवळ जेवण देण्यापुरते नाही, तर ते समता आणि प्रेम दर्शवणारी एक संस्कृती आहे.

नैसर्गिक सजावट आणि मध्यरात्रीची प्रार्थना

मोठ्या शहरांप्रमाणे इथे प्लास्टिकची सजावट नसते. जंगलातून आणलेली पाईनची झाडे, बांबूपासून बनवलेले तारे, काचेच्या बरण्यांमध्ये लावलेल्या मेणबत्त्या आणि मुलांनी स्वतः तयार केलेल्या हस्तकलांनी चर्च सजवले जातात. नाताळच्या मध्यरात्री होणारी प्रार्थना अत्यंत महत्त्वाची असते. इथे चर्चमध्ये होणारे सांस्कृतिक कार्यक्रम, नाटके आणि पथसंचलन हे एखाद्या मोठ्या उत्सवासारखे वाटते. स्थानिक आदिवासी भाषेत होणारी प्रवचने, शाल ओढून आलेल्या आजी-आजोबांची उपस्थिती आणि पारंपारिक पोशाखातील मुला-मुलींचा उत्साह हे सर्व पाहण्यासारखे असते.

देण्याची वृत्ती आणि माणुसकी

इथली श्रद्धा ही केवळ नियमात अडकलेली नाही, तर ती आनंददायी आहे. नाताळ म्हणजे केवळ शॉपिंग नाही, तर तो एकमेकांना काहीतरी 'देण्याचा' सण आहे. तरुणांचे गट अनाथाश्रमांना भेटी देतात, चर्चतर्फे ब्लँकेट आणि अन्नाचे वाटप केले जाते. शेजारी एकमेकांना घरी बनवलेली मिठाई देतात. नाताळ म्हणजे एखाद्या ब्रँडचा दिखावा नसून तो एकमेकांप्रती असलेल्या आपुलकीचा सण आहे.

बर्फ नसला तरी ईशान्येतील नाताळ एखाद्या परीकथेसारखा वाटतो. थंड हवा, पाईनच्या झाडांवर उतरलेलं धुकं, चमकणारे तारे आणि दूरवरून ऐकू येणारा गाण्यांचा आवाज... तिथे मिळणारी शांतता मनाला सुखावून जाते. ईशान्येचा नाताळ आपल्याला शिकवतो की सण म्हणजे समुदाय, साधेपणा, दयाळूपणा आणि एकत्र येणे. ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली गायलेलं प्रत्येक गाणं आणि ताटातील प्रत्येक घास आपल्याला आठवण करून देतो की नाताळच्या गाभ्यामध्ये केवळ आणि केवळ माणुसकी वसलेली आहे.

एकूणच, ईशान्येतील नाताळ हा असा सण आहे जिथे श्रद्धा संस्कृतीला आणि परंपरा प्रेमाला आलिंगन देते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter