बांगलादेशच्या माजी पंतप्रधान आणि 'बीएनपी' (BNP) पक्षाच्या अध्यक्षा खलिदा झिया यांच्यावर बुधवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पती आणि माजी राष्ट्राध्यक्ष झियाउर रहमान यांच्या शेजारीच त्यांना दफन करण्यात आले. यावेळी लाखो लोकांनी आपल्या लाडक्या नेत्याला साश्रू नयनांनी निरोप दिला. भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या अंत्यविधीला उपस्थित राहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेले वैयक्तिक पत्र खलिदा झिया यांचे पुत्र आणि बीएनपीचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांच्याकडे सोपवले.
पंतप्रधान मोदींचे भावनिक पत्र
पंतप्रधान मोदींनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, खलिदा झिया यांच्या निधनामुळे निर्माण झालेली पोकळी कधीही भरून न येणारी आहे, मात्र त्यांचा वारसा कायम जिवंत राहील. मोदींनी पुढे लिहिले, "मला पूर्ण विश्वास आहे की, तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली 'बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी' खलिदाजींचे आदर्श पुढे नेईल. भारतासाठी हा केवळ एक राजकीय संबंध नसून, भारत आणि बांगलादेशमधील खोलवर रुजलेल्या ऐतिहासिक भागीदारीला अधिक समृद्ध करण्यासाठी हे नवे पर्व मार्गदर्शक ठरेल."
८० वर्षांच्या खलिदा झिया यांचे मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच संपूर्ण बांगलादेशातून लोक ढाका येथे जमायला सुरुवात झाली. त्यांचे पार्थिव राष्ट्रध्वजात लपेटून एका मोठ्या ताफ्यासह अंत्यविधीच्या ठिकाणी आणण्यात आले. बांगलादेशच्या हंगामी सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस आणि तारिक रहमान यांच्यासह अनेक देशांतील नेते यावेळी उपस्थित होते.
३३ देशांचे प्रतिनिधी आणि जागतिक उपस्थिती
जातीय संसद भवन (संसद भवन) समोरील माणिक मिया अव्हेन्यू येथे ही अंत्यसंस्काराची प्रार्थना पार पडली. भारत, पाकिस्तान, नेपाळसह ३३ देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रमुख या सोहळ्याला उपस्थित होते. बैतुल मोकर्रम राष्ट्रीय मशिदीचे मुख्य मौलवी मोहम्मद अब्दुल कादर यांनी अंत्यसंस्काराची प्रार्थना (नमाज-ए-जनाजा) पडली.
भारत-बांगलादेश संबंधांत नवा अध्याय
लंडनमध्ये १७ वर्षांचा वनवास संपवून २५ डिसेंबरलाच मायदेशी परतलेले तारिक रहमान यांची एस. जयशंकर यांनी घेतलेली भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. १२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशात निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वी भारताने तारिक रहमान यांच्याशी संवाद साधून सकारात्मक संकेत दिले आहेत. बांगलादेशचे भारतातील उच्चायुक्त रियाझ हमीदुल्ला यांनीही म्हटले आहे की, "दोन्ही देश आता आपल्या संबंधांचा एक नवीन अध्याय लिहिण्यासाठी उत्सुक आहेत."
हजारो लोक आपल्या नेत्याची शेवटची झलक पाहण्यासाठी संसद परिसराबाहेर ताटकळत उभे होते. तारिक रहमान यांनी जमावाला संबोधित करताना खलिदाजींना स्वर्गात स्थान मिळावे म्हणून अल्लाहकडे प्रार्थना करण्याचे आवाहन केले.