तारिक रहमान यांनी स्वीकारली पंतप्रधानपदाची धुरा;पंतप्रधान मोदींकडून भारत भेटीचे निमंत्रण

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान

 

१२ फेब्रुवारी रोजी बांगलादेशमध्ये झालेल्या संसदीय निवडणुकीत बीएनपीने मिळवलेल्या दणदणीत विजयामुळे मोहम्मद युनूस यांची मुख्य सल्लागार म्हणून असलेली भूमिका संपुष्टात आली आहे. ढाका येथे आयोजित तारिक रहमान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रित केले होते. मात्र, मुंबईत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत आधीच ठरलेली द्विपक्षीय बैठक असल्यामुळे पंतप्रधान मोदी या सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाहीत. 

"तुमचा हा विजय बांगलादेशातील जनतेने तुमच्या नेतृत्वावर टाकलेला विश्वास आणि देशाला शांतता, स्थैर्य अन् समृद्धीच्या मार्गावर नेण्याच्या तुमच्या दूरदृष्टीला दिलेला कौल आहे," अशा शब्दांत मोदींनी त्यांचे अभिनंदन केले. पंतप्रधान मोदींनी नवीन पंतप्रधानांसह त्यांच्या पत्नी झुबैदा रहमान आणि कन्या झैमा यांना सोयीनुसार भारत भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले असून भारतात तुमचे मनापासून स्वागत असेल, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

दोन जवळचे शेजारी म्हणून भारत आणि बांगलादेश यांच्यात सामायिक इतिहास, सांस्कृतिक संबंध आणि शांतता व समृद्धीसाठी असलेल्या लोक आकांक्षांवर आधारित घट्ट मैत्री आहे, असे मोदी म्हणाले. आपल्या विकास प्राधान्यांमधील साम्य हेच भविष्यातील सहकार्याचे मार्गदर्शक तत्त्व असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ६० वर्षीय तारिक रहमान हे गेल्या ३५ वर्षांतील बांगलादेशचे पहिले पुरुष पंतप्रधान ठरले आहेत. 

अनेक परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत बांगलादेशची संसद असलेल्या 'जातीय संसद' मध्ये राष्ट्राध्यक्ष मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांना पदाची शपथ दिली. राष्ट्राध्यक्षांचे निवासस्थान असलेल्या 'बंगाभवन' ऐवजी संसदेत शपथविधी पार पडणे ही प्रदीर्घ परंपरेपेक्षा वेगळी बाब ठरली. या सोहळ्याला लोकसभेचे सभापती ओम बिर्ला आणि परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी उपस्थित होते.

तारिक रहमान यांना फोन करून अभिनंदन करणारे मोदी हे पहिले जागतिक नेते होते. त्यांनी आपल्या पत्रात लिहिले की, "आपल्यातील बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि कनेक्टिव्हिटी, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, कौशल्य विकास, ऊर्जा, आरोग्य सेवा तसेच सांस्कृतिक आणि जनसंपर्क अशा विविध क्षेत्रांत समान उद्दिष्टे गाठण्यासाठी मी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे. 

दोन वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्था आणि महत्त्वाकांक्षी समाज म्हणून भारत आणि बांगलादेश एकमेकांच्या शाश्वत विकासासाठी उत्प्रेरक बनू शकतात, एकमेकांच्या सुरक्षेसाठी काम करू शकतात आणि परस्पर समृद्धी साध्य करू शकतात." शपथविधीनंतर सभापती ओम बिर्ला यांनी तारिक रहमान यांची भेट घेतली. "एक लोकशाहीवादी, पुरोगामी आणि सर्वसमावेशक राष्ट्र उभारण्याच्या बांगलादेशच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी भारत सदैव तयार आहे," असे बिर्ला यांनी 'एक्स'वर नमूद केले.

बांगलादेशच्या पंतप्रधानांनी पंतप्रधान मोदी आणि सभापती बिर्ला यांचे आभार मानले. "दोन्ही नेत्यांनी बांगलादेश आणि भारतातील जनतेच्या कल्याणासाठी लोककेंद्रित सहकार्यावर भर देत एकत्र काम करण्याचा उत्साह व्यक्त केला," अशी माहिती भारतातील बांगलादेशचे उच्चायुक्त रियाझ हमीदुल्लाह यांनी दिली.