संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक; CAPF कंपन्यांच्या तैनातीला मुदतवाढ

Story by  आवाज़ मराठी | Published by  Mrudgandha Dixit • 59 m ago
प्रातिनिधिक इमेज
प्रातिनिधिक इमेज

 

नवी दिल्ली 

संभाव्य आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने (MHA) दिल्लीत तैनात असलेल्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (CAPF) २७३ कंपन्यांच्या मुदतवाढीला ३१ ऑक्टोबरपर्यंत मंजुरी दिली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, दिल्ली पोलिसांच्या विनंतीनंतर ही मुदतवाढ देण्यात आली आहे.

संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचा कडक पहारा

शहर आणि परिसरातील संवेदनशील ठिकाणी राजकीय किंवा इतर गटांकडून अचानक आंदोलने (फ्लॅश प्रोटेस्ट्स) होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राखण्यासाठी सुरक्षा दलांची ही तैनाती अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दिल्ली पोलिसांसोबतच राष्ट्रीय राजधानीत तैनात राहणाऱ्या या २७३ कंपन्यांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (CRPF) १२५ कंपन्यांचा समावेश आहे, ज्यात महिला कर्मचाऱ्यांच्या २० युनिट्सचाही समावेश आहे. याशिवाय रॅपिड एक्शन फोर्सच्या (RAF) २०, सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) ४६, इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) ३९, सशस्त्र सीमा दलाच्या (SSB) ३१ आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (CISF) १२ कंपन्यांचा समावेश आहे