अर्धा महाराष्ट्र 'यलो अलर्ट'वर

Story by  पुणे | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
महाराष्ट्र 'यलो अलर्ट'वर
महाराष्ट्र 'यलो अलर्ट'वर

 

पुण्यासह अर्ध्या महाराष्ट्रात बुधवारी वादळीवारे, ढगांच्या गडगडटासाह पावसाच्या सरी पडतील, असा 'यलो अलर्ट' हवामान खात्याने मंगळवारी दिला. मुंबईसह कोकण किनारपट्टीवर बुधवार उष्ण दिवस ठरेल, असा इशाराही खात्याने दिला आहे.

राज्याच्या बहुतांश भागात उन्हाचा चटका वाढला होता. राज्यात पुणे जिल्ह्यातील तळेगाव ढमढेरे येथे सर्वाधिक म्हणजे ४२.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. त्याखालोखाल मालेगाव येथे ४१.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सकाळपासून वाढलेला उन्हाचा चटका आणि दुपारनंतर वादळी पाऊस असे विषम हवामान राज्याच्या काही भागांत अनुभवायला मिळत आहे. 

ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान कमी- जास्त होत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वारे, विजांसह बुधवारी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. वादळी पावसाच्या शक्यतेचे कारण दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण छत्तीसगडपासून मध्य महाराष्ट्र, कर्नाटक ते दक्षिण केरळपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. 

पुण्यात पाच दिवसांमधील उच्चांकी तापमान
पुण्यात शनिवारी पडलेल्या पावसानंतर उन्हाचा चटका काही अंश कमी झाला होता; मात्र मंगळवारी कमाल तापमानाचा पारा पाच दिवसांनंतर पुन्हा चाळिशीच्या दिशेने उसळला. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. २४) ढगांचा गडगडाट आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान खात्याने सोमवारी वर्तविली. शहरात गुरुवारी (ता. १८) यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी म्हणजे ४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले होते. 

त्यानंतर ढगाळ वातावरणामुळे कमाल तापमानाचा पारा सातत्याने कमी होत गेला. शनिवारी सायंकाळी पडलेल्या पावसामुळे रविवारी कमाल तापमान सरासरीपेक्षाही खाली घसरले; मात्र त्याचा पावसाचा प्रभाव ओसरल्याने आता उन्हाचा चटका शहरात पुन्हा वाढू लागला आहे. शहरात सर्वाधिक तापमान कोरेगाव पार्क येथे ४१.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले, तर वडगाव शेरी येथे ४१.३, मगरपट्टा ४०.३, हडपसर ३९.८ आणि शिवाजीनगर येथे ३९.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.

उष्ण व दमट हवामान
■ ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

वादळी पावसाचा इशारा
■ नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, यवतमाळ, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली.