हमीदा बानो : भारताची पहिली महिला कुस्तीपटू

Story by  आवाज़ मराठी | Published by  Sameer Shaikh • 1 Months ago
महिला कुस्तीपटू हमीदा बानोचे दुर्मिळ चित्र
महिला कुस्तीपटू हमीदा बानोचे दुर्मिळ चित्र

 

कुस्ती हा भारताचा पारंपारिक आणि आवडता खेळ. मात्र या कुस्तीवर नेहमीच पुरुषांचे वर्चस्व राहिले आहे. स्त्रिया शारीरिकदृष्ट्या कमकुवत असतात, त्यामुळे त्या मैदानी खेळ खेळूच शकत नाहीत, कुस्ती हा पुरुषांचा खेळ आहे असे समज आपल्या समाजात अगदी कालपरवापर्यंत होते. पण अलिगढच्या एका मुस्लीम महिलेने १९४०च्या दशकात या समजाला छेद देत भारतातील पहिली महिला कुस्तीपटू होण्याचा मान मिळवला होता. तिने कुस्तीमध्ये पुरुषांना पराभूत करत एकेकाळी खळबळ माजवली होती. हमीदा बानूच्या कारकि‍र्दीच्या स्मरणार्थ गुगलने तिचे गुगल डूडल बनवले, त्यामुळे विस्मृतीत गेलेले हे नाव पुन्हा चर्चेत आले. 

हमीदा बानोने १९४०-५०च्या दशकांमध्ये कुस्तीमध्ये पुरुषांना आव्हान दिले होते. 'जो कोणी मला कुस्तीमध्ये पराभूत करेल त्याच्याशीच मी लग्न करेल' अशी शपथ तिने घेतली होती. १९३७मध्ये लाहोरच्या फिरोज खानशी झालेल्या कुस्ती सामन्याने हमीदाला खरी ओळख मिळवून दिली. या सामन्यात तिने फिरोजचा पराभव केला. त्यानंतर लोक तिला 'अलिगढचा ॲमेझॉन' म्हणू लागले. 

हमीदाचा जन्म १९००मध्ये अलिगढ, उत्तर प्रदेश येथे पैलवानांच्या कुटुंबात झाला. त्याकाळी महिलांचा खेळातील सहभाग स्वप्नातीतच होता. कुस्तीची तर बातच वेगळी. त्यावर तर पूर्णपणे पुरुषी वर्चस्व होते. हमीदाने या वर्चस्वाला आव्हान देण्याचे ठरवले आणि ती कुस्तीच्या मैदानात उतरली. यासाठी तिला मोठा संघर्ष करावा लागला, मात्र तिच्या 'जुनून'ने रूढी- परंपरांवर मात केली. लवकरच ती विक्रम करणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरली. या घटनेने मोठी क्रांतीच घडली. महिलांचा कुस्तीत येण्याचा मार्ग प्रशस्त झाला. 

अलिगढच्या मिर्झापूर येथे जन्मलेली हमीदा पुढे सलाम नावाच्या कुस्तीपटूकडे कुस्ती प्रशिक्षणासाठी आली. येथूनच तिच्या व्यावसायिक कुस्ती कारकि‍र्दीला सुरुवात झाली. तिला आव्हान देऊ शकणारी एकही महिला कुस्तीपटू नव्हती. त्यामुळे हमिदाने पुरुष पैलवानांना आव्हान देण्यास सुरुवात केली.

हमीदा बानोची उंची ५ फूट ३ इंच होती आणि तिचे वजन १०७ किलो होते. तिचा दिवसभराचा खुराक पाहून भल्याभल्यांना घाम फुटायचा. ती दररोज ६ लिटर दूध, ३.५० किलो सूप आणि २.२५ लिटर फळांचा रस प्यायची. यासोबत ती एक चिकन, एक किलो मटण, ४५० ग्रॅम बटर, ६ अंडी, सुमारे एक किलो बदाम, २ मोठ्या रोट्या आणि २ प्लेट बिर्याणी खात असे. २४ तासांपैकी ती ९ तास झोपायची आणि ६ तास व्यायाम करायची. उरलेला वेळ जेवणातच जायचा.

त्याकाळी पुरुष हमीदासारख्या महिला कुस्तीपटूला कमी लेखत. त्यामुळे अनेक पैलवानांनी तिच्याशी लढण्यासही नकार दिला होता. छोटे गामा नावाच्या कुस्तीपटूनेही शेवटच्या क्षणी तिच्याशी लढण्यास नकार दिला होता. कोल्हापुरातील एका सामन्यात तिने शोभा सिंग पंजाबी या पुरुष कुस्तीपटूला चित केले. सामना मनोरंजक व्हावा यासाठी मुद्दाम डमी पैलवान आणले गेले, असे त्यावेळी लोकांना वाटले. त्यामुळे काही जणांनी शिवीगाळ करत हमीदावर दगडफेक केली. परिस्थिती इतकी चिघळली की पोलिसांना पाचारण करावे लागले.

भारताची वाघीण हमीदा बानोने १९५४मध्ये मुंबईत रशियाच्या मादी अस्वल म्हणवल्या जाणाऱ्या वीरा चेस्टेलिनचा एका मिनिटापेक्षा कमी वेळेत आस्मान दाखवले. त्यावेळी युरोपमध्ये जाऊन युरोपियन कुस्तीपटूंसोबत कुस्ती खेळण्याचे तिने जाहीर केले. हमीदाने युरोपला जाऊन कुस्ती खेळण्याचा निर्णय घेतला खरा, मात्र इथूनच तिच्या कारकि‍र्दीला उतरती कळा लागली. हमीदा बानोचे ट्रेनर सलाम पहेलवान यांना तिने युरोपला जावे असे वाटत नव्हते. रागाच्या भरात सलामने हमीदाला जबर मारहाण केली. इतकी की तिचे हात-पाय अधू करून टाकले. 

या हल्ल्यातून हमीदा सावरुच शकली नाही. ती कुस्तीच्या मैदानातून गायब झाली ती कायमचीच. पुढे हलाकीच्या परिस्थितीमुळे ती दूध विकून गुजराण करत असे. जगासाठी कुतूहलाचा आणि भारतासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या हमीदाने ३००हून अधिक कुस्तीसामने जिंकले. त्यापैकी बहुतेक सामने पुरुषांसोबतचे होते. मात्र दुर्दैवाने कारकि‍र्द ऐन भरात असतानाच तिला मैदान सोडावे लागले आणि भारतच नव्हे तर जग एका महान कुस्तीपटूला मुकला. 

- ओनिका माहेश्वरी  

 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter