कॅथोलिक ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते आणि २६६वे पोप फ्रान्सिस यांचं सोमवारी (२१ एप्रिल) व्हॅटिकन सिटी येथे दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लॅटिन अमेरिकेतून निवडले गेलेले पहिले पोप आणि जेसुईट विचारसरणीचे पहिले पोप म्हणून त्यांनी इतिहास घडवला. त्यांच्या निधनाने जगभरात शोककळा पसरली असून, भारत सरकारने त्यांच्या स्मरणार्थ २२ आणि २३ एप्रिल तसेच अंत्यसंस्काराच्या दिवशी असे तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. या काळात देशभरात राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरलेला असेल आणि कोणतेही सरकारी मनोरंजनाचे कार्यक्रम होणार नाहीत.
प्रेम आणि करुणेचा संदेश
पोप फ्रान्सिस यांचा जन्म १७ डिसेंबर १९३६ रोजी अर्जेंटिनाच्या ब्यूनोस आयर्स शहरात झाला. इटालियन स्थलांतरित कुटुंबात जन्मलेल्या फ्रान्सिस यांनी रसायनशास्त्राची पदवी घेतल्यानंतर काही काळ प्रयोगशाळेत काम केलं. पण मनातली प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करण्याची तळमळ त्यांना जेसुईट पंथाकडे घेऊन गेली. १९६९ मध्ये ते पाद्री बनले, १९९२ मध्ये बिशप, १९९८ मध्ये ब्यूनोस आयर्सचे आर्चबिशप आणि २००१ मध्ये कार्डिनल झाले. २०१३ मध्ये पोप बेनेडिक्ट सोळावे यांनी प्रकृतीच्या कारणाने राजीनामा दिल्यानंतर फ्रान्सिस यांची २६६वे पोप म्हणून निवड झाली. त्यांनी संत फ्रान्सिस ऑफ असिसी यांच्या नावाने ‘फ्रान्सिस’ हे नाव स्वीकारलं. हे नाव त्यांच्या साधेपणा आणि गरीबांप्रती कळकळीचं प्रतीक होतं.
पोप फ्रान्सिस यांनी आपल्या १२ वर्षांच्या कारकीर्दीत कॅथोलिक चर्चमध्ये सुधारणांचा झंझावात आणला. त्यांनी परंपरावादी विचारांना छेद देत पर्यावरण, भांडवलशाही आणि सामाजिक अन्यायावर परखड भाष्य केलं. युद्धग्रस्त देशांमधील नागरिकांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला. स्थलांतरित, निर्वासित आणि उपेक्षितांच्या बाजूने उभं राहणं हा त्यांच्या कार्याचा गाभा होता. “जगाला प्रेम, करुणा आणि मानवतेची गरज आहे,” असा त्यांचा संदेश होता. कोरोना काळात त्यांनी श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी करण्यासाठी आर्थिक आणि राजकीय धोरणांवर फेरविचार करण्याचं आवाहन केलं होतं. पर्यावरण संरक्षणासाठी त्यांनी २०१५ मध्ये जाहीरनामा प्रसिद्ध करत पृथ्वीला कचराकुंडी बनवणाऱ्या व्यवस्थेवर टीका केली.
साधेपणा आणि धाडसी भूमिका
पोप फ्रान्सिस यांचा साधेपणा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा केंद्रबिंदू होता. ब्यूनोस आयर्सचे आर्चबिशप असताना त्यांनी आलिशान जीवन नाकारलं, स्वतः जेवण बनवलं आणि सार्वजनिक वाहतुकीने प्रवास केला. पोप बनल्यानंतरही त्यांनी व्हॅटिकनमधील भव्य निवासस्थानाऐवजी साध्या खोल्यांमध्ये राहणं पसंत केलं. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या पावलांवर पाऊल ठेवत तुरुंगातील कैद्यांचे आणि महिलांचे पाय धुण्याची प्रथा सुरू केली, जी कॅथोलिक परंपरेत क्रांतिकारी ठरली.
त्यांच्या धाडसी भूमिकांनी अनेकदा परंपरावाद्यांचा रोष ओढवला. तृतीयपंथीयांशी संवाद, समलिंगी व्यक्तींना आशीर्वाद आणि चर्चमधील लैंगिक अत्याचारांविरुद्ध कठोर पावलं यामुळे त्यांनी चर्चला नवं दिशादर्शन दिलं. २०१३ मध्ये एका पत्रकाराने समलिंगी व्यक्तींविषयी विचारलं असता, “निवाडा करणारा मी कोण?” असं उत्तर देत त्यांनी सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. २०१८ मध्ये चिलीतील लैंगिक अत्याचार प्रकरणात त्यांनी सुरुवातीला चुकीची बाजू घेतल्याची कबुली देत पीडितांची माफी मागितली आणि तिथल्या सर्व बिशपांचे राजीनामे घेतले.
भारताशी नातं
पोप फ्रान्सिस यांचं भारताशी विशेष नातं होतं. ते महात्मा गांधींच्या शांतता तत्त्वांचे समर्थक होते. भारतातील गरिबी आणि शिक्षणाच्या समस्यांवर चर्चने काम करावं, असं त्यांचं मत होतं. मुंबईचे कार्डिनल ऑझवेल ग्रेशियस यांच्याशी त्यांचा जवळचा संबंध होता. ग्रेशियस हे पोप निवड समितीचे सदस्य होते आणि त्यांनी फ्रान्सिस यांच्यासोबत ५० वेळा भेटी घेतल्या. भारतातील कॅथोलिक समुदायासाठी त्यांचं मार्गदर्शन मोलाचं होतं. मुंबईत १३१ कॅथोलिक चर्च आणि १६२ शाळा चालवणाऱ्या या समुदायाला पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या स्मृतीसाठी शहरातील सर्व चर्चमध्ये विशेष प्रार्थनासभा आयोजित करण्यात आल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शोक व्यक्त करत म्हटलं, “पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने तीव्र दुःख झालं आहे. करुणा, मानवतावाद आणि आध्यात्मिक धैर्य यांचा दीपस्तंभ म्हणून ते कायम स्मरणात राहतील. भारतीयांबद्दल त्यांच्या मनात विशेष प्रेम होतं.” इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही फ्रान्सिस यांना महान मार्गदर्शक संबोधत त्यांच्याशी असलेल्या मैत्रीचा उल्लेख केला. ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी त्यांच्या पर्यावरण संरक्षण आणि आंतरधर्मीय संवादाच्या कार्याचं कौतुक केलं.
आयुष्याचा प्रवास
पोप फ्रान्सिस यांचा प्रवास प्रेरणादायी होता. फुटबॉलचे चाहते असलेले फ्रान्सिस अर्जेंटिनाच्या सॅन लॉरेन्सो क्लबचे समर्थक होते. २०१३ मध्ये टाइम मासिकाने त्यांना ‘पर्सन ऑफ द इअर’ म्हणून निवडलं. इराकला भेट देणारे आणि शिया धर्मगुरूंची भेट घेणारे ते पहिले पोप होते. त्यांनी रशियन चर्चचे प्रमुख पॅट्रिआर्क किरील आणि इजिप्तच्या अल-अझर संस्थेच्या ग्रँड इमाम यांच्याशीही संवाद साधला. २०२२ मध्ये त्यांनी मूळनिवासींवर झालेल्या अत्याचारांसाठी माफी मागितली, तर २०२३ मध्ये समलिंगीपणा हा गुन्हा नसल्याचं ठामपणे सांगितलं.
मुंबईत शोक
मुंबईतील कॅथोलिक समुदायाने पोप फ्रान्सिस यांच्या निधनाने गहिवरून गेला आहे. शहरातील सहा लाख कॅथोलिक बांधवांसाठी फ्रान्सिस हे आध्यात्मिक पिता होते. डॉन बॉस्को, सेंट झेविअर्ससारख्या शाळा चालवणाऱ्या या समुदायाने त्यांच्या स्मृतीसाठी प्रार्थनासभा आयोजित केल्या आहेत. “पोप फ्रान्सिस यांनी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला आणि प्रेमाचा संदेश दिला,” असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं. मुंबईचे कार्डिनल ग्रेशियस यांनीही त्यांच्याशी असलेल्या जवळिकेच्या आठवणींना उजाळा दिला.