जन्मापासून बोलण्याची आणि ऐकण्याची शक्ती नसतानाही, ५८ वर्षीय मोहम्मद युसूफ मुरान सकाळपासून संध्याकाळपर्यंत लाकडी कोरीव कामाच्या उत्कृष्ट कलाकृती घडवण्यात व्यस्त असतात. मुरान हे काश्मीरमधील डाउनटाउनमधील श्रीनगरचे आहेत. जन्मजात मुकबधीर असूनही, या अपंग काश्मिरी कलाकाराने लाकडी कोरीव कामाची कला आपल्या मोठ्या भावाकडून शिकली आहे. त्यांचे मोठे भाऊ स्वतः मुकबधीर आहेत, पण लाकडी कोरीव कामात पारंगत आहेत. ते चार वर्षांचे असल्यापासून या कलेत गुंतलेले आहेत. आपल्या अप्रतिम प्रतिभा आणि कौशल्याने ते आपल्या पूर्वजांचे पारंपरिक काम पुढे नेत आहेत.

मुरान यांनी श्रीनगरमधील प्रसिद्ध जामिया मशिदीची एक प्रतिकृतीही बनवली आहे. आपली प्रतिभा दाखवताना हे काम पूर्ण करायला त्यांना तीन महिने लागले. या कलाकृतीमुळे त्यांना जगभरातून प्रशंसा मिळाली आहे. मुरान यांनी टाकाऊ लाकडापासून अनेक वस्तू बनवल्या आहेत. यात घोड्यावर स्वार इंग्लंडचा राजा जॉर्ज, इराकचे माजी राष्ट्राध्यक्ष सद्दाम हुसेन यांचा पुतळा, महात्मा गांधी, हजरतबल दर्गा, काश्मिरी समोवर, अग्निपात्र कांगडी, मेंढपाळ, तसेच श्रीनगर-मुझफ्फराबाद रस्ते जोडणीच्या उद्घाटनावेळी बनवलेले वन्यजीव आणि शांती स्मारक यांचा समावेश आहे. यात एक पाकिस्तानी आणि एक काश्मिरी एकमेकांना मिठी मारताना दाखवले आहेत.
या सर्व वस्तू टाकाऊ लाकडापासून बनवल्या आहेत. लाकडी कोरीव काम हे गेल्या २००वर्षांपासून मुरान यांचा पारंपरिक व्यवसाय आहे. फाळणीपूर्वी, त्यांच्या पणजोबांचे कराचीमध्ये एक शोरूम होते आणि ते प्राचीन रेशीम मार्गाने मध्य आशियात व्यापार करत होते.
मुरान यांच्यासमोर कोणताही फोटो किंवा स्मारक ठेवा, ते टाकाऊ लाकडावर तेच तयार करतील. फोटो आणि लाकडी कामात फरक करणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे कोणालाही कठीण जाईल. मुरान यांची सुंदर लाकडी कोरीव उत्पादने आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो रुपयांना विकली जाऊ शकतात. "आधी माझे वडील या सर्व वस्तू बनवत असत आणि ते एक महान कलाकार होते, पण दुर्दैवाने काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. आता माझे काका मोहम्मद युसूफ या कलेत गुंतलेले आहेत," असे मोहम्मद युसूफ मुरान यांचा पुतण्या मुदासिर मुरान याने सांगितले. "इतर लोकही या वस्तू बनवतात, पण ते माझ्या काकांसारख्या कौशल्याने बनवत नाहीत. तुम्ही मुरान यांच्यासमोर कोणतेही चित्र किंवा स्मारक ठेवले तर ते ते सुक्या लाकडावर बनवतील. कोणालाही चित्र आणि लाकडी कामात फरक करणे किंवा त्यावर विश्वास ठेवणे कठीण होईल," मुदासिर मुरान म्हणाले.
.jpeg)
"मला वाटते की, इथे सरकारची भूमिका खूप महत्त्वाची आहे. आम्ही त्यांना सक्षम आणि तज्ञ लोकांना मदत करताना पाहत नाही. सरकारने या क्षेत्राच्या विकासासाठी काहीतरी केले पाहिजे. आम्हाला हेही माहीत आहे की, हस्तकला क्षेत्रावर काही मोठ्या व्यापाऱ्यांची मक्तेदारी आहे. कलाकारांना त्यांच्या कामासाठी पुरस्कृत केले पाहिजे. मी आव्हान देऊ शकतो की, संपूर्ण खोऱ्यात माझ्या काकांपेक्षा चांगला कारागीर कोणी नाही. फक्त ते मुकबधीर असल्यामुळे त्यांना दुर्लक्षित केले जात आहे. अन्यथा, त्यांना सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले असते. याशिवाय, मी ही कला नष्ट होण्यापासून वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. मी सरकारच्या मदतीशिवाय काश्मीरमध्ये एक सर्वोत्तम दुकान सुरू केले आहे, जे खूप कठीण होते," मुदासिर यांनी खेद व्यक्त केला.
डाउनटाउनने प्रत्येक प्रकारच्या हस्तकलेशी संबंधित उत्कृष्ट कलाकार घडवले आहेत, मग ते पेपर-माचे असो, लाकडी कोरीव काम असो किंवा दुसरे काही. "पण मुद्दा असा आहे की, आमचे शोषण होत आहे आणि आम्हाला कमी लेखले जात आहे," मुदासिर पुढे म्हणाले. "जेव्हा लोकांना कोणत्याही गोष्टीबद्दल कमी माहिती असते, तेव्हा ते मत बनवू लागतात. लोकांना वाटते की आमच्या वस्तूंची किंमत खूप जास्त आहे.
मुदासिर शेवटी म्हणतात, "आजकाल आपण एका सामान्य मजुरालाही पाहिले, तर त्याचा एक दिवसाचा खर्च खूप जास्त असतो, मग एखाद्या कलाकाराच्या कामाला महागडे कसे म्हणता येईल? आमची हस्तकला रोजगार देऊन अनेक लोकांना फायदा पोहोचवत आहे. मी उच्च अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. मी विमानतळाच्या नूतनीकरणाची कल्पनाही मांडली होती, ज्यात लाकडी काम, गालिचे, क्रूएलवर्क, पश्मिना शाल, पेपर-माचे आणि काश्मीरमधील इतर हस्तकलांशी संबंधित दुकाने सुरू केली जातील. पर्यटक विमानतळाद्वारे काश्मीरमध्ये येत असल्यामुळे यामुळे काश्मीरमधील कलात्मक कामांची सर्वांना माहिती होईल. आपोआपच, यामुळे हस्तकला क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल."
(लेखिकेने अलिगढ मुस्लिम विद्यापीठाच्या इस्लामिक स्टडीज विभागात अध्यापन केले आहे.)