तेलंगणातील वंचित आणि दुर्गम भागांतील मुलांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित करणारे महान परोपकारी आणि उद्योजक गियासुद्दीन बाबूखान यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण दक्षिण राज्यात आणि विशेषतः हैदराबाद शहरात शोककळा पसरली आहे.
AIMIM प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या निधनावर दुःख व्यक्त केले. ते म्हणाले, "बाबूखान साहेबांचे निधन हे शहरासाठी मोठे नुकसान आहे. गरीब आणि वंचितांना शिक्षण देण्यासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ते नेहमीच स्मरणात राहतील."
गियासुद्दीन बाबूखान यशस्वी रिअल इस्टेट व्यावसायिक होते. त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने 'बाबू खान एंटरप्रायझेस', 'मुघल बिल्डर्स अँड प्लॅनर्स' आणि 'बाबू खान प्रॉपर्टीज' यांसारख्या कंपन्या स्थापन केल्या. या कंपन्यांनी हैदराबादमध्ये आधुनिक इमारती आणि व्यावसायिक संकुले उभारली. ही संकुले त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेसाठी ओळखली जातात.
मात्र, जेवढे ते आपल्या व्यावसायिक कौशल्यासाठी ओळखले जात होते, तेवढेच ते आपल्या सामाजिक कार्यासाठी आणि समाजाला बदलण्याच्या त्यांच्या तळमळीसाठीही ओळखले जात. बाबूखान यांची खरी ओळख त्यांच्या समाजसेवेतून होती. त्यांनी 'हैदराबाद जकात अँड चॅरिटेबल ट्रस्ट' (HZCT) आणि 'फाउंडेशन फॉर इकॉनॉमिक अँड एज्युकेशनल डेव्हलपमेंट' (FEED) यांसारख्या संस्थांना मजबूत केले.
१९९२ मध्ये, जेव्हा HZCT ची सुरुवात केवळ ११ लाख रुपयांच्या जकातने झाली होती, तेव्हा कोणी कल्पनाही केली नसेल की हीच संस्था एक दिवस १०६ शाळांमध्ये २४,००० हून अधिक मुलांना शिक्षण देईल. यातील बहुतेक मुले तेलंगणाच्या दुर्गम भागांतील आहेत. हे यश बाबूखान साहेबांची दूरदृष्टी, कठोर परिश्रम आणि शिक्षणावरील दुर्दम्य विश्वासाचेच प्रतीक आहे. याच विचाराने, त्यांनी 'हैदराबाद इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स'ची स्थापना केली, जिथे गरजू पण आर्थिकदृष्ट्या दुर्बळ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देऊन त्यांना स्वयंपूर्ण बनवले जाते.
'जमात-ए-इस्लामी हिंद'नेही 'X' वर बाबूखान यांना श्रद्धांजली वाहिली.
२०१४ मध्ये, तेलंगणा सरकारने मुस्लिमांच्या शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना 'मौलाना अबुल कलाम आझाद राष्ट्रीय पुरस्कारा'ने सन्मानित केले.
बाबूखान हे दानशूरतेचे जिवंत उदाहरण होते. ‘खरी मदत तीच, जी माणसाला आत्मनिर्भर बनवते आणि त्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे धैर्य देते.’ हे त्यांच्या सेवाकार्यामागचे तत्त्व होते. याच विचाराने त्यांना सामान्य व्यावसायिकांपेक्षा वेगळे आणि समाजाचा नेता बनवले.
सोमवारी रात्री बंजारा हिल्समधील मस्जिद-ए-बाकी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी शहरातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि सामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाबूखान हे केवळ एक व्यावसायिक नव्हते, तर ते या शहराची आत्म्या होते, जणू हेच उसळलेला जनसमुदाय सांगत होता.
बाबूखान यांच्या निधनाने केवळ त्यांच्या कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण हैदराबाद शहरासाठी कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. संपत्ती आणि प्रसिद्धीचा खरा उद्देश तेव्हाच पूर्ण होतो, जेव्हा ती समाजाच्या भल्यासाठी आणि मानवतेच्या सेवेसाठी वापरली जाते, हाच संदेश बाबूखान यांनी आपल्या जीवनातून दिला.