देशाची राजधानी दिल्लीतून एका संशयित पाकिस्तानी हेराला अटक करण्यात आली असून, तो 'विदेशी अणुशास्त्रज्ञ' असल्याचे भासवून हेरगिरी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्याच्या अटकेमुळे देशाच्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, मोठा घातपाताचा कट उधळला गेल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेला व्यक्ती गेल्या काही काळापासून दिल्लीत वास्तव्य करत होता आणि स्वतःला एका परदेशी देशाचा अणुशास्त्रज्ञ असल्याचे सांगत होता. तो भारताच्या अणुकार्यक्रमाशी संबंधित तसेच इतर संवेदनशील माहिती गोळा करून ती पाकिस्तानला पुरवत असल्याचा संशय आहे.
तपासात असेही समोर आले आहे की, या व्यक्तीने अनेकदा पाकिस्तानचा दौरा केला होता. तो दिल्लीतील कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींच्या संपर्कात होता आणि त्याने आतापर्यंत कोणती माहिती पाकिस्तानला दिली आहे, याचा तपास सध्या सुरू आहे.
सुरक्षा यंत्रणांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई केली असून, आरोपीची कसून चौकशी केली जात आहे. त्याच्याकडून आणखी काही महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. या अटकेमुळे दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे.