हरियाणातील मेवात हा तसा मागासलेला भाग मानला जातो. पण इथल्या मुला-मुलींनी आपल्या कर्तृत्वाने या भागाचे नाव उंचावले आहे. आज मेवात चर्चेत आहे ते या तरुणांमुळेच. याचे श्रेय जसे इथल्या यशस्वी तरुणांना जाते, तसेच त्यांच्या आई-वडिलांनाही जाते. त्यांनी स्वतः हाल सोसले, पण मुलांना चांगले भविष्य दिले. अशीच एक यशस्वी लेक म्हणजे नूह जिल्ह्यातील सुनारी गावची रुखसाना. ती आता गुरुग्राममध्ये मॅजिस्ट्रेट (दंडाधिकारी) म्हणून कार्यरत आहे.
शिक्षणाचा प्रवास
रुखसानाचे दहावीपर्यंतचे शिक्षण तावडूच्या 'मेवात मॉडेल स्कूल'मध्ये झाले. बारावीची परीक्षा तिने अलिगड मुस्लिम विद्यापीठातून (AMU) पास केली. तिथेच तिने बीए आणि एलएलबीची पदवी मिळवली. पुढे दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून तिने एलएलएम पूर्ण केले. इथूनच तिच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.
स्वप्न झाले साकार
रुखसानाला न्यायाधीश व्हायचे होते. यासाठी ती दिवसरात्र झटत होती. २०२१-२२ मध्ये तिने हरियाणा ज्युडिशियल सर्व्हिसची परीक्षा दिली, पण तिला यश आले नाही. त्यानंतर तिने उत्तर प्रदेशची परीक्षा दिली, तिथे मुलाखतीत अपयश आले. दोनदा नापास होऊनही ती खचली नाही. तिने जिद्द सोडली नाही.
तिने पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगाची न्यायिक सेवेची परीक्षा दिली आणि त्यात तिला यश मिळाले. या परीक्षेत तिने राज्यात तिसरा क्रमांक पटकावला आणि ती मॅजिस्ट्रेट बनली. तिचे स्वप्न पूर्ण झाले. तिच्या या यशाने केवळ तिच्या घरातच आनंद आणला नाही, तर इतर मुलींनाही बळ दिले. ज्यांना वाटते की मुलींचे जग फक्त चूल आणि मूल इतकेच मर्यादित आहे, त्यांच्यासाठी रुखसाना एक आदर्श ठरली आहे.
वडिलांचा खंबीर पाठिंबा
निवडीनंतर आनंद व्यक्त करताना रुखसाना म्हणाली, "माझ्या यशाचे श्रेय माझ्या कुटुंबाला जाते. यात माझ्या वडिलांचा वाटा खूप मोठा आहे. मी सातवीत असतानाच ठरवले होते की मला जज व्हायचे आहे. मी हे वडिलांना सांगितले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. त्यांनी प्रत्येक पाऊलावर मला साथ दिली. चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवून देणे असो वा परीक्षेची तयारी, त्यांनी माझ्यासोबत खूप कष्ट घेतले आहेत."
शिक्षणाचे महत्त्व
रुखसाना सांगते, "मुलींनी स्वावलंबी व्हायला हवे आणि त्यासाठी शिक्षण गरजेचे आहे. हे यशाचे पहिले पाऊल आहे. शिक्षणासोबतच हातात एखादे कौशल्यही हवे. शिकलेली आणि हुशार माणसे कधीच मागे पडत नाहीत. स्वावलंबी माणूस कोणावर ओझे न बनता इतरांचा आधार बनतो."
पालकांना आवाहन करताना ती म्हणते, "आपल्या मुलींना उच्च शिक्षण द्या. त्यांना जास्तीत जास्त मदत करा." तसेच, "देशाला प्रामाणिक न्यायव्यवस्थेची गरज आहे आणि मी पूर्ण प्रामाणिकपणे देशसेवा करेन," असेही तिने सांगितले.
वडिलांचा अभिमान
तिचे वडील मोहम्मद इलियास हे 'सर्व हरियाणा ग्रामीण बँके'त वरिष्ठ व्यवस्थापक होते. आता ते निवृत्त झाले आहेत. ते म्हणतात, "मला माझ्या लेकीचा अभिमान आहे. तिने सिद्ध केले की एका छोट्या गावातली मुलगीही उत्तुंग भरारी घेऊ शकते. एका मुस्लिम मुलीने न्यायिक सेवेत येणे हे इतरांसाठी उदाहरण बनले आहे."
ते एक आठवण सांगतात, "बारावीनंतर माझ्या पत्नीला मुलीचे लग्न लावून द्यायचे होते. पण रुखसानाला शिकायचे होते. मी मुलीची बाजू घेतली आणि पत्नीला समजावले. रुखसानाला अभ्यासाची खूप आवड आहे."
बहीणही त्याच वाटेवर
रुखसानाची १५ ऑक्टोबर २०२४ रोजी हरियाणात न्यायाधीश म्हणून निवड झाली. १० फेब्रुवारी २०२५ पासून ती गुरुग्राम जिल्ह्यात सेवा देत आहे. तिच्यापासून प्रेरणा घेऊन तिची लहान बहीण दिलशाना ही देखील त्याच वाटेवर आहे. तिनेही एएमयू आणि जामियामधून शिक्षण घेतले आहे. नुकतीच तिने हिमाचल प्रदेश न्यायिक सेवेची मुलाखत दिली, पण नशिबाने साथ दिली नाही आणि ती प्रतीक्षा यादीत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही बहिणी विद्यापीठ आणि जिल्हा पातळीवरील अव्वल धावपटू आहेत.
पालकांना संदेश
वडील सांगतात, "मुलीचे स्वप्न पूर्ण झाले. नूहमध्ये आल्यावर जिल्हा बार असोसिएशनने रुखसाना आणि आमचे जंगी स्वागत केले, तेव्हा माझा ऊर अभिमानाने भरून आला. तो क्षण मी शब्दात सांगू शकत नाही."
ते पुढे म्हणतात, "मला पालकांना सांगायचे आहे की मुलांना त्यांच्या आवडीचे करिअर निवडू द्या. मुलींच्या लग्नासाठी पैसे साठवण्यापेक्षा त्यांच्या शिक्षणावर खर्च करा. कारण शिक्षणावर केलेला खर्च ही सर्वात मोठी गुंतवणूक आहे."
(लेखिका शायरा, कथाकार आणि पत्रकार आहेत)