मोफत शिक्षणाचे आमिष दाखवून दहशतवादाकडे ओढले; एनआयएचा खुलासा, ७ जणांवर आरोप निश्चित

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 10 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नवी दिल्ली

नॅशनल इन्वेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) शुक्रवारी एक मोठी कारवाई केली आहे. एजन्सीने ७ आरोपी आणि 'कोवई अरेबिक एज्युकेशनल असोसिएशन' (KAEA) या नोंदणीकृत संस्थेविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. हे प्रकरण २०२३ मधील असून, मोफत अरबी भाषेचे क्लासेस घेण्याच्या नावाखाली तरुणांना दहशतवादी कारवायांसाठी कट्टरतावादी (Radicalise) बनवल्याचा आरोप यांच्यावर आहे.

याआधी, दहशतवाद विरोधी एजन्सीने (एनआयए) मद्रास अरेबिक कॉलेजचे प्रिन्सिपल जमील बाशा यांच्यासह चार आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते. ऑक्टोबर २०२२ मध्ये कोईम्बतूर येथे झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या तपासातून हे मोठे रॅकेट उघडकीस आले होते.

बॉम्बस्फोटाशी संबंध

एनआयएने जारी केलेल्या निवेदनात एक धक्कादायक माहिती दिली आहे. कोईम्बतूर स्फोटातील १८ आरोपींपैकी १४ आरोपी हे 'कोवई अरेबिक कॉलेज'चे विद्यार्थी होते. विशेष म्हणजे हे कॉलेज 'KAEA' सोसायटी अंतर्गत चालवले जात होते.

ऑगस्ट २०२३ मध्ये एनआयएच्या चेन्नई शाखेने स्वतःहून (Suo-motu) हे प्रकरण नोंदवले होते. तपासात असे आढळले की, 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (ISIS) या दहशतवादी संघटनेने प्रेरित झालेला एक गट मोफत अरबी भाषेच्या क्लासच्या नावाखाली तरुणांना दहशतवादी कृत्यांसाठी भडकवत होता.

झूम, व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामचा वापर

एनआयएच्या तपासात उघड झाले आहे की, तंत्रज्ञानाचा वापर करून कट्टरतावादाचा प्रसार केला जात होता. झूम, व्हॉट्सॲप आणि टेलिग्रामसारख्या प्लॅटफॉर्मवरून ऑनलाइन अरबी क्लासच्या माध्यमातून कट्टरतावादी प्रवचने दिली जात होती. तसेच, नियमित वर्गांमध्ये जमील बाशा यांची Live किंवा रेकॉर्ड केलेली भाषणे दाखवली जात होती.

आरोपी कोण आहेत?

चेन्नई न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ज्या ७ आरोपींची नावे आहेत, ते सर्वजण जमीलचे विद्यार्थी होते. त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:

१. मोहम्मद हुसेन

२. इरशाद

३. अहमद अली

४. अबू हनीफा

५. जवाहर सादिक

६. शेख दाऊद

७. राजा मोहम्मद

एनआयएने सांगितले की, यापैकी मोहम्मद हुसेन आणि इरशाद यांच्यावर मूळ आरोपपत्रातही आरोप ठेवण्यात आले होते, आता या पुरवणी आरोपपत्रात त्यांच्यावर अतिरिक्त कलमे लावण्यात आली आहेत. तसेच, 'KAEA' सोसायटीला एक कायदेशीर व्यक्ती म्हणून आरोपी बनवण्यात आले आहे.

दहशतवादाचे हे जाळे नष्ट करण्यासाठी एनआयए कटिबद्ध असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.