इंडिगो प्रवाशांना देणार ५०० कोटींची नुकसानभरपाई

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 10 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

नवी दिल्ली

इंडिगो एअरलाईन्सने शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे. उड्डाणाच्या २४ तास आधी विमाने रद्द झाल्यामुळे किंवा विमानतळावर अडकून पडल्यामुळे ज्या प्रवाशांचे हाल झाले, त्यांना कंपनी तब्बल ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसानभरपाई देणार आहे.

'एक्स' (X) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कंपनीने एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे, "ही 'रिफंड' प्रक्रिया तुमच्यासाठी पारदर्शक, सोपी आणि त्रासमुक्त करणे हे आमचे ध्येय आहे. ज्या प्रवाशांची विमाने उड्डाणाच्या २४ तास आधी रद्द झाली किंवा जे प्रवासी विमानतळांवर वाईट रितीने अडकून पडले होते, त्यांना आम्ही नुकसानभरपाई देऊ. आमच्या अंदाजानुसार ही रक्कम ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल."

जानेवारीमध्ये साधणार संपर्क

३, ४ आणि ५ डिसेंबरला कोणती विमाने रद्द झाली आणि कोणत्या प्रवाशांना विमानतळावर ताटकळत राहावे लागले, याची माहिती घेण्याचे काम सध्या सुरू आहे. जानेवारी महिन्यात कंपनी अशा सर्व प्रवाशांशी स्वतः संपर्क साधेल, जेणेकरून नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरळीत पार पडेल.

इंडिगोने प्रवाशांचे पैसे वेळेत परत करण्याचे वचन पुन्हा दिले आहे. "डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत बाधित प्रवाशांचे सर्व पैसे (Refunds) वेगाने आणि तातडीने परत करणे, यावर आमचा भर आहे. बहुतांश प्रवाशांचे पैसे परत करण्यात आले आहेत आणि उरलेले पैसे लवकरच त्यांच्या खात्यात जमा होतील," असे कंपनीने स्पष्ट केले.

सेवा पूर्ववत

आजच्या स्थितीबद्दल माहिती देताना कंपनीने सांगितले की, देशभरात आज २,००० हून अधिक विमाने उड्डाण करणार आहेत. गेल्या आठवड्यापेक्षा दैनंदिन कामगिरीत सुधारणा झाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सेवा पूर्ववत होत असून वेळापत्रकात स्थिरता आली आहे. इंडिगोच्या मानकांनुसार विमाने वेळेवर धावत आहेत.

काल कंपनीने १,९५० हून अधिक विमानांचे उड्डाण केले. खराब हवामानामुळे केवळ चार विमाने रद्द करावी लागली आणि त्याची माहिती प्रवाशांना वेळेत देण्यात आली होती, जेणेकरून त्यांची गैरसोय होणार नाही.

तज्ज्ञांची समिती नेमली

दरम्यान, या गोंधळाचे मूळ कारण शोधण्यासाठी इंडिगोने 'चीफ एव्हिएशन ॲडव्हायझर्स एलएलसी'ची नेमणूक केली आहे. कॅप्टन जॉन इल्सन यांच्या नेतृत्वाखालील ही तज्ज्ञांची समिती या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करेल. यामुळे देशभरातील हजारो प्रवाशांना फटका बसला होता.

डीजीसीएची कडक पावले

दुसरीकडे, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांना आज बोलावून घेतले होते. गेल्या आठवड्यात मोठ्या प्रमाणात विमाने रद्द झाल्याबद्दल त्यांना जाब विचारण्यात आला. विमानांच्या उशिरानंतर आणि रद्दीकरणानंतर डीजीसीएने इंडिगोवर आपली नजर करडी केली असून सेवा सुरळीत करण्यासाठी अनेक कठोर पावले उचलली आहेत.