मदरशातून शिक्षण घेऊन बनला सरकारी डॉक्टर, त्रिपुराच्या अब्दुल्लाची प्रेरणादायी कहाणी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
डॉ. अब्दुल्ला मुहम्मद जकारिया
डॉ. अब्दुल्ला मुहम्मद जकारिया

 

नुरुल हक 

"मदरशात शिकणे म्हणजे कट्टरतावादी शिक्षण घेऊन दहशतवादी किंवा आलिम-मौलाना बनून केवळ धार्मिक ज्ञान वाटणे!" - भारतातील मदरशांबद्दलच्या या रूढ गैरसमजाला छेद देत, एका मदरसा विद्यार्थ्याने सरकारी डॉक्टर बनून एक नवा आदर्श निर्माण केला आहे. इतकेच नाही, तर एका अरबी शिक्षकाने आपल्या तीन मुलांपैकी दोघांना डॉक्टर आणि एकाला इंजिनिअर बनवून दाखवले आहे. ही प्रेरणादायी घटना आहे देशाच्या ईशान्येकडील त्रिपुरा राज्याची.

गेल्या काही वर्षांपासून, त्रिपुरातील अनेक मदरसा शिक्षित विद्यार्थी आपापल्या कार्यक्षेत्रात यश मिळवून समाजासमोर येत आहेत. आता, त्रिपुरा लोकसेवा आयोगामार्फत (TPSC) घेण्यात आलेल्या 'जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर' पदाच्या परीक्षेत, एका मदरसा विद्यार्थ्याने पहिल्या ३० जणांमध्ये स्थान मिळवून सर्वांना चकित केले आहे. त्या गुणवंत विद्यार्थ्याचे नाव आहे डॉ. अब्दुल्ला मुहम्मद जकारिया.

डॉ. अब्दुल्ला मुहम्मद जकारिया हा त्रिपुराच्या सिपाहीजला जिल्ह्यातील सोनमुरा उपविभागातील दुर्लभ नारायण गावचा रहिवासी आहे. त्रिपुरा लोकसेवा आयोगाच्या आरोग्य विभागासाठीच्या परीक्षेत तो पात्र ठरला. १३ ऑगस्ट रोजी जाहीर झालेल्या २१६ जणांच्या यादीत, अब्दुल्ला मुहम्मद जकारिया पहिल्या ३० क्रमांकावर आहे. १०० गुणांच्या परीक्षेत त्याला ६८.८ गुण मिळाले.
ही यादी प्रसिद्ध झाल्यापासून, सोशल मीडियावर अब्दुल्ला मुहम्मद जकारियाची विशेष चर्चा होत आहे. कारण, जकारियाने आपले प्राथमिक ते माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण मदरशात घेतले आहे.

याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी 'आवाज बांग्ला'ने अब्दुल्ला मुहम्मद जकारियाला फोन केला असता, त्याने मदरशात शिक्षण घेतल्याचे मान्य केले. जकारिया अत्यंत अभिमानाने सांगतो की, त्याने प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण त्रिपुराच्या सिपाहीजला जिल्ह्यातील सोनमुरा येथील 'दाउदारानी सिद्दिकीया एच.एस. फाजिल मदरसा' येथून घेतले. त्रिपुरा सरकारच्या अनुदानप्राप्त मदरशांपैकी एक असलेल्या या प्राचीन आणि नामांकित मदरशात, त्याने अरबी शिक्षणासोबतच आधुनिक शिक्षणही घेतले.

डॉ. जकारियाचे वडील नुरुल इस्लाम हे याच मदरशात पदव्युत्तर अरबी शिक्षक आहेत. जकारिया पुढे सांगतो की, याच मदरशातून त्याने माध्यमिक परीक्षा दिली आणि सर्व विषयात 'लेटर मार्क्स' मिळवून तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. माध्यमिकनंतर या मदरशात विज्ञान शाखा नसल्याने, त्याने आगरतळा येथील नामांकित 'उमाकांत उच्च माध्यमिक विद्यालया'त विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आणि तिथेही सर्व विषयात 'लेटर मार्क्स' मिळवून उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण केली.

मदरशातील शिक्षणाच्या पद्धतीबद्दल बोलताना जकारिया म्हणाला, "त्रिपुरातील सर्व सरकारी मदरशांमध्ये SCERT च्या अभ्यासक्रमानुसार सामान्य विषयांचे अत्यंत उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते. सामान्य विषयांसोबतच कुराण, हदीस आणि अरबी यावर काही अतिरिक्त विषय असतात."

त्याने सांगितले की, २०१५ साली जेव्हा सामान्य शाळांमधील विद्यार्थी ७०० गुणांची माध्यमिक परीक्षा देत होते, तेव्हा मदरसा विद्यार्थ्यांना कुराण, हदीस आणि अरबीच्या अतिरिक्त विषयांसह एकूण १००० गुणांची परीक्षा द्यावी लागत होती. त्यामुळे मदरशांमध्ये केवळ धार्मिक शिक्षण दिले जाते, हा गैरसमज योग्य नाही.

२०१८ मध्ये अखिल भारतीय प्रवेश परीक्षेद्वारे त्याने आगरतळा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएससाठी प्रवेश घेतला. यावर्षी त्याने सरकारी वैद्यकीय अधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि लवकरच तो त्रिपुरा सरकार अंतर्गत डॉक्टर म्हणून काम सुरू करेल.

जकारियाच्या मोठ्या बहिणीने इंजिनिअरिंग पूर्ण केले असून ती त्रिपुरा सरकारमध्ये ज्युनियर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. तर, त्याची लहान बहीणही आगरतळा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाली आहे आणि नोकरीच्या परीक्षेची तयारी करत आहे.

देशभक्तीबद्दल विचारले असता तो म्हणतो, "हा देश माझी मातृभूमी आहे. पण देशभक्ती केवळ घोषणा देण्यापुरती किंवा घरी राष्ट्रध्वज लावण्यापुरती मर्यादित नाही. देशातील लोकांची सेवा करणे आणि समाजाच्या उन्नतीसाठी काम करणे, हीच खरी देशभक्ती आहे. आणि हीच शिकवण आम्हाला मदरशांमध्ये लहानपणापासून दिली जाते." डॉ. अब्दुल्ला मुहम्मद जकारियाला भविष्यात बालरोगतज्ज्ञ म्हणून देशातील लोकांची सेवा करायची आहे.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter