जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे दहशतवादी आणि जवानांमध्ये सोमवारी चकमक झाली. यामध्ये दोन जवान हुतात्मा झाले. या कारवाईमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. खातमा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही, मात्र ते पाकिस्तानातून आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे जम्मू-काश्मीर पोलिस, लष्कर आणि सीआरपीएफ यांच्या संयुक्त विद्यमाने जवानांनी कुलगाम येथील गुडर जंगलामध्ये शोधमोहिम राबवली असता, या मोहिमेदरम्यान, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार केला. त्याच्या प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारात हे दहशतवादी ठार झाले. या कारवाई दरम्यान, सुभेदार प्रभात गौर आणि लान्स नायक नरेंद्र सिंदू आणि एक अधिकारी जखमी झाले होते. उपचारादरम्यान सुभेदार प्रभात गौर आणि लान्स नायक नरेंद्र सिंदू यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, राष्ट्रीय तपास संस्थेकडून सोमवारी जम्मू-काश्मीरसह पाच राज्यांत २२ ठिकाणी छापे घालण्यात आले. दहशतवादी हल्ल्याच्या कटासंदर्भात मिळालेल्या माहितीच्या आधारे हे छापे घालण्यात आले.
पाक घुसखोरास अटक
आर. एस. पुरा सेक्टर येथे आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करणाऱ्या एका पाकिस्तानी नागरिकाला अटक करण्यात आल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाच्यावतीने (बीएसएफ) सोमवारी देण्यात आली.
सिराज खान असे या घुसखोराचे नाव असून, तो पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील भलवाल तालुक्यातील रहिवासी आहे. सिराज हा रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास आंतरराष्ट्रीय सीमेवरून घुसखोरी करू पाहत होता, त्याचप्रमाणे तेथे असलेले तारेचे कुंपण आक्रमकपणे ओलांडण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्याकडून पाकिस्तानी चलनी नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. याबाबत पाकिस्तानकडे निषेध नोंदविण्यात आल्याचेही बीएसएफच्या वतीने सांगण्यात आले.