बदलते युद्धतंत्र आंतरराष्ट्रीय संबंधांत, राजकीय संघर्षांच्या स्वरूपात आमूलाग्र बदल घडवून आणेल काय, अशी चर्चा सुरू असतानाच भारताने अचूक लक्ष्यभेद करणाऱ्या क्षेपणास्त्रवाहू ड्रोनची यशस्वी चाचणी केली, ही निश्चितच उल्लेखनीय अशी घटना. तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारत आता स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, हे आश्वासक आहे.
लक्ष्य ठरविणे आणि नेमक्या ठिकाणी मारा करणे हा अत्याधुनिक युद्धतंत्रज्ञानाचा भाग बनला आहे आणि भारत या तंत्रज्ञानाच्या बाबतीत आगेकूच करीत आहे, हेच आंध्र प्रदेशातील कर्नूल येथे यशस्वीरीत्या झालेल्या चाचणीने सिद्ध केले आहे. अर्थात संशोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे आणि भारताला याबाबतीत सतत जागरूक राहावे लागणार आहे, यात शंका नाही.
परंतु यानिमित्ताने हे नवे युद्धतंत्र काय बदल घडवू शकते, याची चर्चा व्हायला हवी. यातील ‘अचूक लक्ष्यभेद’ ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्येही भारताने ती यशस्वीरीत्या साध्य केली. भारताने पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या केंद्रांना लक्ष्य केले आणि नागरी वस्तीत जीवितहानी होणार नाही, याची काळजी घेतली. भारताने एकाचवेळी अनेक आघाड्यांवर हा संघर्ष लढला. यात सायबर युद्धतंत्र निर्णायक ठरले.
प्रत्यक्ष लष्करी कारवाईच्या आधी आर्थिक पातळीवर पाकिस्तानची नाकेबंदी केली गेली. धडक कारवाईनंतर तिचा संदेश जगभर पोचविण्यासाठी विविध देशांत शिष्टमंडळे पाठविण्यात आली. भारताच्या मुत्सद्देगिरीने पाकिस्तानचे नाक कापले गेले. ‘ऑपरेशन सिंदूर’ने एका अर्थाने लष्करी संघर्षाची व्याख्याच बदलून टाकली.
आताही ड्रोनद्वारे घेण्यात आलेली क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी हा आधुनिकीकरणाच्या वाटचालीतील महत्त्वपूर्ण टप्पा देशाने गाठला आहे. देशाच्या ‘संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे’ने (डीआरडीओ) ही शस्त्रप्रणाली विकसित केली. त्याद्वारे हवेतून जमिनीवर अचूक मारा करता येतो.
‘इमेजिंग इन्फ्रारेड स्पीकरसह पॅसिव्ह होमिंग’मुळे दिवसा आणि रात्री लक्ष्याचा अचूक वेध घेणे शक्य झाले आहे. या क्षेपणास्त्राची मारकक्षमता ही कमाल चार किलोमीटरपर्यंत असली तरीसुद्धा भविष्यामध्ये ड्रोनची क्षमता वाढल्यानंतर ती आणखी विस्तारू शकते. दुर्गम भागात शत्रूला टिपण्यासाठी त्याचा प्रभावी वापर करता येईल.
संरक्षणसज्जतेमधील भारतीय लष्कराची ही आत्मनिर्भरता भूषणावह म्हणावी लागेल. ‘मेक इन इंडिया’सारख्या उपक्रमाचा त्याला मोठा हातभार लागला; पण या वाटचालीतील हा एक स्वल्पविराम आहे, हेदेखील आपल्याला विसरता येणार नाही, कारण शेजारील चीनसारख्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी बरोबरी करण्यासाठी आपल्याला आणखी बरीच वाट चालायची आहे. भविष्यातील युद्ध हे जेव्हा दोन देशांमध्ये लढले जाईल, तेव्हा त्यात तांत्रिक पातळीवरील मानवी हस्तक्षेप कमी असेल.
इथे मानवी बुद्धिमत्तेची जागा ही कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) घेईल. त्यामुळे ज्याचे युद्धतंत्र प्रगत तो वरचढ ठरेल. प्रगत ड्रोन तंत्रज्ञान हे युद्धशास्त्राचा भविष्यकाळ बनू पाहत आहे.
सध्या अन्य देशांप्रमाणेच भारतीय लष्कराकडून देखील हेरगिरी, टेहळणी आणि शत्रूराष्ट्रांच्या हालचालींचे तार्किक विश्लेषण करण्यासाठी ‘एआय ॲप्लिकेशन’चा वापर केला जाऊ लागला आहे. मानवविरहीत शस्त्राप्रणालींचे नियंत्रण तर हे पूर्णपणे एआयने आपल्या ताब्यात घेतले आहे. सायबर सुरक्षाकवच हे पारंपरिक शस्त्रांइतकेच प्रभावी बनले आहे.
खरेतर अशा स्थितीमध्ये युद्धात कधी माघार घ्यायची अन् थांबायचे हा मुद्दा विजयाइतका किंबहुना त्याहीपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण ठरेल. शांततेसाठी युद्धाची तयारी अनिवार्य असली तरीसुद्धा दीर्घकाळ चालणारी युद्धे कुणाच्याच फायद्याची नसतात, हे देखील तितकेच खरे.
त्यामुळेच युद्धखोर प्रवृत्तींना प्रत्यक्ष कृतीआधीच रोखणे तितकेच महत्त्वाचे ठरेल. भविष्यातील जगाला प्रगत युद्धतंत्राप्रमाणेच शांततेचे तंत्रही विकसित करणे गरजेचे आहे. ताजा इस्राईल- पॅलेस्टाईन संघर्ष असो; अथवा रशिया- युक्रेन युद्ध; यात सर्वसामान्य माणसांची फार होरपळ झाली. अद्यापही ती थांबलेली नाही. त्यामुळेच प्रगत युद्धतंत्राला जोड द्यायला हवी, ती ‘धर्मयुद्धा’च्या धोरणाची. याचे कारण तंत्र विकसित झाले तरी सर्वसामान्य जनतेची जीवितहानी टाळण्याची इच्छाशक्ती हवी.
नागरी वस्ती आणि लष्करी केंद्रे यांच्यात फरक करून फक्त लष्करी केंद्रांना लक्ष्य करणे हे आता तंत्रज्ञानाने शक्य केले असताना युद्ध पसरू देणे कितपत योग्य? अलीकडच्या काळात जगाच्या पाठीवर झालेल्या अनेक युद्धांमध्ये अपरिमित हानी झाली.
निरपराध नागरिकांची अक्षरशः ससेहोलपट झाली. जीवितहानी आणि वित्तहानी किती, याची गणती करणे अवघड व्हावे, असा संहार होताना दिसतो. ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये मात्र भारताने हो सगळे टाळले, हे नोंद घ्यावी असे. त्यासाठीची इच्छाशक्ती दाखवली. त्यामुळेच तंत्राच्या जोडीनेच प्रगल्भ धोरण विकसित करणे हेही तितकेच महत्त्वाचे. माणसाच्या नैतिक विकासाशीही हा प्रश्न जोडलेला आहे, एवढे लक्षात घेतले तरी आशावादाला जागा राहील.