काश्मीर खोऱ्यात पसरली तणावपूर्ण शांतता

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
श्रीनगर विमानतळ
श्रीनगर विमानतळ

 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर खोऱ्यात कमालीची उदासीनता आणि खित्रता पसरली आहे. गुरुवारी काश्मीर खोऱ्यात सर्वत्र शांतता होती. श्रीनगर विमानतळाला संरक्षण दलांचा वेढा असून, सलग दुसऱ्या दिवशी या विमानतळावरून कोणत्याही विमानाने उड्डाण केले नाही. जम्मू, श्रीनगर, लेह विमानतळ बुधवारपासून बंद आहेत. श्रीनगर-जम्मू महामार्गही गुरुवारी बंद होता. या भागात काही ठिकाणी दरड कोसळल्याने महामार्ग बंद असल्याचे सांगण्यात आले.

भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या संघांच्या भीतीमुळे खोऱ्यात असलेल्या पर्यटकांनी त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमध्येच राहणे पसंत केले. काश्मीर सोडण्यासाठी हवाई सेवा पूर्ववत होण्याची वाट पाहत आहेत, असे काही पर्यटकांनी सांगितले. परिस्थिती पूर्ववत झाल्यास शनिवारी (ता. १०) काश्मीरमधून बाहेर पडता येईल, असे पर्यटकांनी म्हटले आहे. "आम्हाला येथून बाहेर पडायचे आहे. मात्र, बाहेरील वातावरण कमालीचे तणावपूर्ण आहे," असे एका पर्यटकाने सांगतितले. नियंत्रण रेषेजवळ असलेल्या रुग्णालयांच्या छतांवर रेड क्रॉस संघटनेचा सिम्बॉल रंगविण्यात आला आहे. या भागात पाकिस्तानच्या हल्ल्यामुळे भीतीचे वातावरण असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

सध्याची परिस्थिती पाहता जम्मू-काश्मीरच्या विविध जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. काश्मीरचे विभागीय आयुक्त विजय कुमार विधुरी यांनी सांगितले की, श्रौनगर विमानतळ आणि कुपवाडा, बारामुल्ला आणि गुरेझ या सीमावर्ती जिल्ह्यांच्या आसपासच्या सर्व शैक्षणिक संस्था गुरुवारी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूँच येथील शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. सुरक्षा आणि सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित कोणतीही माहिती प्रकाशित करण्यापूर्वी अधिकृत खोतांसह तथ्यांची पडताळणी करण्याचा सल्ला माध्यमांना देण्यात आला आहे. 

परीक्षा पुढे ढकलल्या 
काश्मीरमधील अस्थिर वातावरणाच्या पार्श्वभूमीवर काश्मीर विद्यापीठाची दहा मे रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाच्या प्रशासन विभागाने गुरुवारी याबाबत माहिती दिली. श्रीनगर येथील क्लस्टर विद्यापीठाची परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान ओमर अब्दुल्ला यांनी सीमावर्ती जिल्ह्यांच्या उपायुक्तांसोचत आणखी एक बैठक घेतली. पाकिस्तानकडून उखळी तोफांचा मारा झालेल्या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.