युद्धग्रस्त इराणमधून भारतीय विद्यार्थ्यांची सुटका; दुसरे विमान दिल्लीत दाखल

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

युद्धग्रस्त इराणमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन दुसरे विमान सोमवारी उशिरा नवी दिल्लीत दाखल झाले. अनेक भारतीयांना घेऊन निघालेले हे विमान आर्मेनियाची राजधानी येरेवान येथून दुबईला थांबले आणि त्यानंतर नवी दिल्लीकडे झेपावले.

"जोपर्यंत मी काश्मीरमध्ये माझ्या कुटुंबाला पाहत नाही, तोपर्यंत मी घरी परतलोय असे मला वाटणार नाही," असे २३ वर्षांचा लबीब कादरी म्हणाला. डझनावारी इतर विद्यार्थ्यांसह तो इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचला. येरेवान आणि दुबई दरम्यानचा प्रवासाचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर दुबई नागरी उड्डाण प्राधिकरणाने उड्डाणे तात्पुरती स्थगित केली होती. त्यामुळे हे विमान तब्बल १२ तास उशिराने आले. 

२८ फेब्रुवारी रोजी युद्ध सुरू झाल्यापासून इराणची हवाई हद्द बंद आहे. त्यामुळे या गटाने इराणमधील विद्यापीठांतून बसने इराण-आर्मेनिया सीमेपर्यंत प्रवास केला. तिथून आर्मेनियात प्रवेश करून येरेवानहून दुबई गाठले आणि नंतर दिल्लीसाठी विमान पकडले.

इराणच्या उर्मिया विद्यापीठातून एमबीबीएस करत असलेला कादरी गेल्या पाच दिवसांपासून प्रवास करत आहे. दोन आठवडे मृत्यूच्या सावटाखाली घालवल्यानंतर आपण सुरक्षित परतलो आहोत यावर त्याचा अजूनही विश्वास बसत नाहीये. "आम्ही इराणमध्ये असताना सतत बॉम्बफेक सुरू होती. सीमा ओलांडल्यानंतर आम्हाला वाटले की आम्ही सुरक्षित आहोत. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात दुबईत असताना तिथे विमानतळावर अनेक ड्रोन हल्ले झाले. आम्ही आधी इराणमध्ये आणि नंतर दुबईत अडकलो होतो. त्यामुळे आपण भारतात पोहोचलो आहोत हे मला अजूनही उमजत नाहीये. आम्ही संपूर्ण टाळेबंदीत होतो. पुढचा बॉम्ब आमच्याच हॉस्टेलवर पडेल की काय या भीतीने आम्ही सतत ग्रासलेले असायचो," असे कादरीने सांगितले.

माझ्या विद्यापीठातील इतर सर्व विद्यार्थी जे इराणच्या शेजारील देशांतील होते ते आधीच मायदेशी परतले होते. तिथे फक्त आम्ही भारतीय विद्यार्थीच उरलो होतो. "इराक, तुर्की आणि पाकिस्तानचे सर्व विद्यार्थी गेले होते. आम्ही फक्त ४५ भारतीय विद्यार्थी मागे उरलो होतो. आम्ही जवळपास दोन आठवडे तळघरात राहिलो आणि क्वचितच बाहेर पडायचो. खूपच आवश्यक खरेदी करायची असल्यास आम्ही गटाने बाहेर जायचो," असे सांगताना २३ वर्षांच्या या तरुणाने आपला भयानक अनुभव आठवला.

तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेसमधून एमबीबीएसच्या पाचव्या वर्षात शिकणारी आणि श्रीनगरची रहिवासी असलेली आणखी एक विद्यार्थिनी म्हणाली की, स्थलांतरामुळे तात्पुरता दिलासा मिळाला होता. मात्र भारतात पोहोचल्यावरच खऱ्या अर्थाने सुटकेचा निश्वास टाकता आला. तिची आई शेजारी उभी राहून अश्रू पुसत होती आणि ही मुलगी युद्धाचे भयानक दृश्य सांगत होती. "ते खूपच भयंकर होते. भारतीय दूतावासाने आम्हाला तेहरानहून एका सुरक्षित ठिकाणच्या हॉटेलमध्ये हलवले. आम्ही तिथे ३-४ दिवस राहिलो, पण नंतर युद्ध अधिकच उग्र झाले," असे ती विद्यार्थिनी म्हणाली.

तसेच, चौथी वर्षात शिकणारी विद्यार्थिनी अधफर खान हिची आई रिहाना खान दिल्ली विमानतळाच्या टी३ आगमन विभागाच्या गेट क्रमांक ४ बाहेर उभ्या होत्या. विमान जमिनीवर उतरल्यापासून त्यांचे डोळे केवळ दरवाजा आणि मुलीचे लोकेशन ट्रॅक करणाऱ्या फोनवरच होते. "युद्ध सुरू होण्यापूर्वी ३-४ दिवस आधी तिने काही पैसे मागवले होते. नशिबाने आम्ही ते पाठवले, कारण युद्ध सुरू झाल्यावर आम्हाला तिच्याबद्दल काहीच माहिती मिळत नव्हती," असे रिहाना खान म्हणाल्या. त्यांची मुलगी १३ फेब्रुवारी रोजी इराणला परतली होती. "आम्ही अनेक पालक सतत संपर्कात होतो. जेव्हा आम्ही तिचे विमान बुक केले आणि ती दुबईला पोहोचली तेव्हा आम्हाला हायसे वाटले, पण नंतर विमानाला उशीर झाल्याने आमची चिंता पुन्हा वाढली," असे त्यांनी पुढे सांगितले.

अडकलेल्या भारतीयांना घेऊन दिल्ली विमानतळावर पोहोचलेले हे दुसरे विमान आहे. रविवारी सकाळी पहिले विमान विद्यार्थी आणि यात्रेकरूंसह ८० लोकांना घेऊन वेळेवर आले होते. मात्र हे विमान जवळपास १२ तास उशिराने आले. दुबई नागरी उड्डाण प्राधिकरणाने खबरदारीचा उपाय म्हणून काही तासांसाठी विमान सेवा स्थगित केली होती आणि संध्याकाळी ती पुन्हा सुरू केली. "सर्व प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील विमान उड्डाणे तात्पुरती स्थगित करत असल्याचे डीसीएएने १६ मार्च रोजी 'एक्स'वर स्पष्ट केले होते."