Commercial LPG Price Hike 2026: कमर्शियल गॅस सिलिंडर ९९३ रुपयांनी महागला

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 1 h ago
हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात झालेली विक्रमी ९९३ रुपयांची दरवाढ
हॉटेलमध्ये वापरल्या जाणाऱ्या कमर्शियल एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात झालेली विक्रमी ९९३ रुपयांची दरवाढ

 

नवी दिल्ली :

पश्चिम आशियातील युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत. याचा थेट परिणाम म्हणून भारतात शुक्रवारी १ मे रोजी १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल ९९३ रुपयांची ऐतिहासिक वाढ करण्यात आली. सलग तिसऱ्या महिन्यात झालेल्या या दरवाढीमुळे दिल्लीत कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत ३०७१.५ रुपयांवर पोहोचली आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंट चालकांसाठी हा महागाईचा एक खूप मोठा झटका मानला जात आहे.

Commercial LPG Price: तीन महिन्यांत १३०३ रुपयांची वाढ

याआधी कमर्शियल गॅसची किंमत २०७८.५० रुपये होती. तेल कंपन्यांनी १ एप्रिल रोजी सिलिंडरमागे १९५.५० रुपये वाढवले होते. त्यापूर्वी १ मार्चलाही ११४.५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. आता मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या विक्रमी वाढीमुळे गेल्या तीन महिन्यांत कमर्शियल एलपीजीचे दर एकूण १३०३ रुपयांनी कडाडले आहेत.

Domestic LPG Price: घरगुती गॅस आणि पेट्रोल दर स्थिर

सर्वसामान्यांच्या घरातील स्वयंपाकघरात वापरल्या जाणाऱ्या १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. या घरगुती गॅसच्या दरात शेवटची ६० रुपयांची वाढ ७ मार्च रोजी झाली होती. सध्या दिल्लीत घरगुती गॅस ९१३ रुपयांना मिळत आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दरही सध्या स्थिर आहेत. गेल्या वर्षी मार्च महिन्यात या इंधनाच्या दरात प्रति लिटर २ रुपयांची कपात करण्यात आली होती. दिल्लीत आज पेट्रोल ९४.७२ रुपये आणि डिझेल ८७.६२ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे.

जागतिक तेलाच्या किमतीत ५० टक्क्यांची वाढ

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम या सरकारी तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला जागतिक बाजारातील स्थिती आणि विनिमय दरानुसार इंधनाचे दर ठरवतात. पश्चिम आशियातील युद्धामुळे ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून जागतिक तेल बाजारात किमती तब्बल ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत.