भक्ती चाळक
मुंबईतील मालवणी हा मुस्लिमबहुल परिसर अनेकदा राजकीय वादाच्या केंद्रस्थानी असतो. या भागाला अनेकवेळा बांगलादेशी किंवा रोहिंग्यांचा अड्डा म्हणून हिणवले जाते. मात्र अशा नकारात्मक आरोपांना इथल्या सामान्य हिंदू-मुस्लिमांनी आपल्या कृतीतून चपराक दिली आहे. गेल्या सात वर्षांपासून मालवणीत एक आगळावेगळा इफ्तार आयोजित केला जातो. या भागातील हिंदू महिला आपल्या मुस्लिम शेजाऱ्यांसाठी आवर्जून इफ्तारीचे जेवण बनवतात.
या खास इफ्तारचे आयोजन राष्ट्र सेवा दलाचे सदस्य असलेले ५८ वर्षीय निसार अली आणि त्यांच्या ४९ वर्षीय पत्नी वैशाली महाडिक या दाम्पत्याने केले होते. हे दोघे २००८ पासून 'सफल विकास वेलफेअर ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून स्थानिकांना मोठी मदत करत आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही हा कार्यक्रम एका जैन व्यक्तीच्या गारमेंट वर्कशॉपमध्ये पार पडला. या शाकाहारी भोजनात कारखान्यातील हिंदू-मुस्लिम कामगारांसह दोन स्थानिक चर्चमधील भाविकही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

१५ वर्षांच्या प्रवासातून बदलाची नांदी
निसार अली आणि वैशाली महाडिक यांनी २००८ मध्ये सफल विकास वेलफेअर ट्रस्टची स्थापना केली. सुरुवातीला त्यांनी वैयक्तिक स्तरावर मदतकार्य सुरू केले. निसार अली सांगतात, "राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून आम्ही जे शिकलो, तेच आपल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवण्याचे आम्ही ठरवले. समाजात जातीय सलोख्याचा विषय कठीण होत असताना आम्ही त्यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा विचार केला. हे काम आम्ही मागील १५ वर्षांपासून करत आहोत."
निसार यांचा हा उपक्रम सुरुवातीला मोजक्या लोकांसाठी होता, पण आज तो मालवणीचा एक अविभाज्य भाग बनला आहे. याविषयी ते सांगता, "आमच्या या कार्याची सुरुवात इफ्तारपासून करण्याचा विचार माझी पत्नी वैशालीचा होता. आम्ही ५-१० लोकांपासून सुरुवात केली आणि काही वर्षे हा आकडा २५ पर्यंत होता. परंतु नंतर त्यांचे रुपांतर मोठ्या स्तरावर झाले."
ते पुढे म्हणतात, "मालवणीमध्ये अनेकदा जातीय संघर्ष आणि सणासुदीच्या काळात धर्मावरून होणारे वाद आम्ही अनुभवले आहेत. लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी आम्ही हे उपक्रम थेट वस्तीत आणि लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले. सुरुवातीला आमचे मित्र-मैत्रीण येत होते, पण हळूहळू वस्तीतील इतर लोकांनाही आम्ही यात सहभागी करून घेतले. ४-५ वर्षांपूर्वी काही हिंदू महिला आमच्याशी जोडल्या गेल्या. त्यांना इफ्तारबद्दल माहिती नव्हती आणि त्यांनी तो कधी अनुभवला नव्हता. त्यांना आम्ही इफ्तारमध्ये सहभागी करून घेतले आणि त्यांना तो अनुभव मनापासून आवडला. त्यानंतर या महिलांनी स्वतःहून काहीतरी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली."
महिलांचा वाढता सहभाग
या उपक्रमात महिलांच्या वाढत्या सहभागाबद्दल बोलताना निसार सांगतात, "सुरुवातीला महिला फळे घेऊन येऊ लागल्या. आता गेल्या ५-६ वर्षांपासून त्या स्वतः घरून पदार्थ बनवून आणतात. यावर्षी रंजना कनोजिया यांनी उपवासाचे साबुदाणे वडे बनवले. अनिता कनोजिया यांनी गुजराती पद्धतीचे खमण आणले. सोमा डे यांनी चणा चाट तर विरांगणा यांनी आलू चाट बनवली होती. सिद्धेश्वरी शर्मा यांनी गुळाची करंजी तर चक्क ७१ वर्षीय रेखा कोटक यांनी नारळ वड्या बनवल्या होत्या. यासोबतच कुसुम उघडे यांनी पालक भजी, शारदा खताडे आणि नुरी शेख यांनी खजूर तर कृष्णा वाघमारे यांनी रुह अफ्झा दिले. अशा प्रकारे सर्वांच्या सहभागातून इफ्तारीची उत्तम व्यवस्था झाली."

जैन मित्राच्या कारखान्यात इफ्तार
हा कार्यक्रम केवळ सामाजिक उपक्रम नाही, तर या माध्यमातून सर्वधर्मसमभाव देखील जपला जात आहेर. निसार सांगतात की, "आम्ही हा कार्यक्रम हॉलमध्ये न करता कारखान्यात करतो. अमित विकुल गेहलाणी यांनी त्यांच्या कारखान्यातील मशिनरी बाजूला करून आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. त्यांचे हिंदू-मुस्लिम कर्मचारीही आमच्यासोबत इफ्तारीला लागले होते. या कार्यक्रमात आम्ही एक पथ्य आवर्जून पाळतो, ते म्हणजे आम्ही मांसाहार जेवण कधीच ठेवत नाही."
ते पुढे म्हणतात की, "या कार्यक्रमात सर्वधर्मीय लोक सहभागी होतात. त्यामुळे सर्वांच्या भावना जपण्यासाठी, इथे मांसाहार न करण्याचा निर्णय आम्ही स्वतःहून घेतला आहे. यामुळे सर्वजण खुल्या मनाने भोजनाचा आस्वाद घेतात. इफ्तारीच्या वेळी लोक एकमेकांना समजून घेतात आणि चर्चा करतात. इफ्तार हा केवळ एक इव्हेंट न राहता तो थेट वस्तीत व्हायला हवा, अशी आमची इच्छा आहे. हा कार्यक्रम पाहणाऱ्या किंवा प्रत्यक्षात उपस्थित राहिलेल्या लोकांवर आणि लहान मुलांवर याचा सकारात्मक परिणाम होतो. या उपक्रमाच्या माध्यमातून समाजात सौहार्द निर्माण करण्याचा आमचा महत्वाचा उद्देश आहे."

संस्थेच्या विविध उपक्रमांविषयी...
संस्थेच्या कार्याबद्दल निसार अली पुढे सांगतात की, "आम्ही एकल महिलांना मार्गदर्शन करणे, त्यांना नोकऱ्या शोधून देणे आणि त्यांच्या घरगुती अडचणी सोडवण्यासाठी प्रबोधन करतो. ज्या महिलांना पतीची साथ नाही आणि त्या घराची जबाबदारी एकट्या सांभाळतात, त्यांच्यासाठी आम्ही विविध उपक्रम राबवतो. २०१६-१७ पासून आम्ही १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे या महिलांसोबत साजरा करतो. पहिल्या वेळी १८ ते ७० वयोगटातील ७३ महिला यात सहभागी झाल्या होत्या. या दिवशी त्या मनमोकळेपणाने गाणी गातात, डान्स करतात आणि खेळ खेळतात."
ते पुढे म्हणतात, "या उपक्रमाच्या माध्यमातून एकदा या महिलांना आम्ही रिसॉर्टवर सहलीला नेले होते. तिथे त्यांनी आनंद घेतला. एकमेकींशी कधीही न बोलणाऱ्या महिला या सहलीमुळे जोडल्या गेल्या. तसेच या महिलांच्या मुलांसाठी आम्ही शिष्यवृत्तीचे मिळवून देतो. तरुणांसाठी व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा घेतो. सफल लर्निंग सेंटरच्या माध्यमातून पहिली ते आठवीच्या मुलांसाठी दररोज दुपारी ४ ते ८ या वेळेत मोफत शिकवणी वर्ग देखील चालवतो."

संस्थेच्या इतर उपक्रमांविषयी ते सांगतात की, "२०१५ पासून आम्ही बकरी ईदच्या कुर्बानीच्या रकमेतील काही पैसे वंचितांच्या शिक्षणासाठी देण्याचे आवाहन करत आहोत. सातारा येथील दुष्काळग्रस्त भागात झाडे लावण्यासाठी सयाजी शिंदे यांना ४१,००० रुपये जमा करून दिले. तसेच कोल्हापूर, चिपळूण आणि केरळ येथील पूरग्रस्तांनाही मदत पाठवली. लॉकडाऊनच्या काळात आम्ही रेशन वाटप केले आणि ६ महिने दररोज ८०० अन्नाची पाकिटे गरजूंपर्यंत पोहोचवली. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर आम्ही दोन रक्तदान शिबिरे घेऊन १०४ रक्त बाटल्यांचे संकलन केले. संस्थेच्या माध्यमातून आरोग्य शिबिरे आणि दर शनिवारी विनामूल्य नेत्र तपासणी शिबीर आजही सातत्याने सुरू आहे."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -