अनिसा नबी : तरुणाईला व्यसनाच्या विळख्यातून सोडवणारी 'वंडरस वुमेन' अधिकारी

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
 अनिसा नबी
अनिसा नबी

 

एहसान फाजिली

जम्मू-काश्मीरमधील प्रशासकीय अधिकारी अनिसा नबी यांनी स्वतःच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे रोवले आहेत. त्यांनी प्रशासकीय कारकीर्द आणि फिटनेसची आवड यांची अत्यंत उत्तम सांगड घातली आहे. त्या स्वतः एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. महिला आणि तरुणांमध्ये फिटनेसचा प्रसार करण्याचे काम त्या अतिशय हिरिरीने करत आहेत.

जम्मू-काश्मीर प्रशासकीय सेवा परीक्षेत त्यांनी संपूर्ण राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. २०१२ मध्ये त्या प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या. प्रशासनात अनेक महत्त्वाची पदे भूषवल्यानंतर सध्या त्या 'जम्मू-काश्मीर क्रीडा परिषदे'त 'मुख्य क्रीडा अधिकारी' म्हणून कार्यरत आहेत. हे पद युवा सेवा आणि क्रीडा विभागांतर्गत येते.

"माझी प्रशासकीय कारकीर्द आणि फिटनेसची आवड एकत्र जपण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे. एक खेळाडू म्हणून मी राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील शर्यतींमध्ये भाग घेतला. १०० मीटर, २०० मीटर आणि ८०० मीटर शर्यतींमध्ये मी पदके जिंकली आहेत", असे अनिसा नबी यांनी 'आवाज-द व्हॉईस'ला सांगितले. त्यांनी वेदांता दिल्ली हाफ मॅरेथॉन, टाटा मुंबई मॅरेथॉन आणि दुबई मॅरेथॉनसारख्या मोठ्या स्पर्धा पूर्ण केल्या आहेत.

अनिसा यांनी 'वंडरस वुमेन' या उपक्रमाची स्थापना केली आहे. महिलांना फिटनेस, आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्यासाठी प्रेरित करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना फिटनेस आणि खेळांकडे यशस्वीपणे वळवले आहे.

त्या 'फिट इंडिया मूव्हमेंट'च्या सदिच्छा दूत म्हणूनही काम पाहत आहेत. जम्मू-काश्मीर आणि त्याबाहेरही त्या तंदुरुस्तीचा प्रसार करतात. राज्यात पिकल बॉल आणि पॅडेल टेनिससारख्या रॅकेट खेळांना प्रोत्साहन देण्याचे कामही त्या करत आहेत.

"विशेषतः महिलांनी हे खेळ शिकावेत यासाठी मी स्वतः त्यांच्यासोबत खेळते आणि त्यांना मार्गदर्शन करते", असे अनिसा यांनी स्पष्ट केले. आपल्या प्रशासकीय अनुभवाबद्दल बोलताना अनिसा यांनी अनेक गोष्टी उलगडल्या.

"जीएसटी अधिकारी म्हणून नवीन कर सुधारणांबद्दल जनतेत जागरूकता निर्माण करण्यात मी महत्त्वाची भूमिका बजावली. विशेषतः करदाते आणि कर सल्लागार यांच्यात प्रबोधन करून कर महसूल वाढवण्यात मोठे योगदान दिले", असे त्या म्हणाल्या. विभागात नव्याने रुजू झालेल्या निरीक्षकांना आणि अधिकाऱ्यांना करप्रणालीचे धडे देण्याचे कामही त्यांनी पार पाडले.

तळागाळातील समाजासाठी, विशेषतः महिलांसाठी त्यांनी खूप काम केले आहे. 'जम्मू-काश्मीर ग्रामीण उपजीविका अभियाना'त राज्य प्रकल्प व्यवस्थापक म्हणून त्यांनी महिलांचे सक्षमीकरण केले. महिलांच्या कौशल्यात वाढ करून त्यांना बाजारपेठ आणि रोजगाराच्या उत्तम संधी उपलब्ध करून दिल्या.

तरुणांना व्यसनाधीनता आणि नकारात्मक गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी अनिसा सतत प्रयत्नशील असतात. मुख्य क्रीडा अधिकारी म्हणून त्या तरुणांना खेळांचे महत्त्व पटवून देतात. तरुणांचा सहभाग वाढवण्यासाठी केंद्रशासित प्रदेश, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाते. 'खेलो इंडिया' कार्यक्रमाच्या नोडल अधिकारी म्हणून त्या राज्यातील 'खेलो इंडिया' केंद्रांचे कामकाज पाहतात.

२०१२ मध्ये प्रशासकीय सेवेत रुजू झाल्यापासून अनिसा यांनी अनेक पदे भूषवली आहेत. नागरी सचिवालय, महसूल, राज्य कर, ग्रामविकास विभाग आणि ग्रामीण उपजीविका अभियान यांसारख्या विविध विभागांत त्यांनी अत्यंत धडाडीने काम केले आहे.

"माझे वडील हेच माझ्यासाठी नागरी सेवेचे सर्वांत मोठे प्रेरणास्थान आहेत. त्यांना लोकांची सेवा करताना पाहून मला या सेवेची ओढ लागली", असे अनिसा यांनी 'आवाज-द व्हॉईस'ला सांगितले. त्यांचे वडील गुलाम नबी सोफी हे देखील वरिष्ठ अधिकारी होते. त्यांनीही आपल्या कारकिर्दीत अनेक पदे भूषवली. २०१० मध्ये ते सहकार निबंधक म्हणून निवृत्त झाले.

"तंदुरुस्त आणि सक्रिय जीवन जगण्याची खरी प्रेरणा मला माझ्या पतीकडूनच मिळाली. ते स्वतः एक मॅरेथॉन धावपटू आहेत", असे अनिसा पुढे म्हणाल्या. त्यांचे पती मुदस्सीर नबी शेख हे व्यावसायिक असून उत्तम धावपटू आहेत. आई झाल्यानंतर अनिसा यांनी आपली खासगी नोकरी सोडली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर अनेक आव्हाने उभी होती.

"त्या कठीण काळात माझ्या पतीने मला प्रशासकीय सेवेची तयारी करण्यासाठी खूप प्रोत्साहन दिले. मी ही परीक्षा नक्की पास होईन, असा ठाम विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवला", असे अनिसा सांगतात.

"निरोगी जीवन जगण्यासाठी त्यांनी मला नेहमीच प्रेरणा दिली. महिलांसाठी एखादा फिटनेस प्लॅटफॉर्म सुरू करण्यासाठी त्यांनीच मला प्रोत्साहन दिले. त्यातूनच २०२१ मध्ये 'वंडरस वुमेन'ची सुरुवात झाली. साधारणपणे ज्या टप्प्यावर महिला हार मानतात, तिथे त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे मला हे यश मिळवता आले", असे त्या म्हणाल्या.

" 'वंडरस वुमेन'च्या माध्यमातून मी अनेक महिलांना सक्रिय जीवन जगण्यासाठी प्रेरित करू शकले. धावणे, योग, ट्रेकिंग अशा अनेक गोष्टी यात समाविष्ट आहेत. वेगवेगळ्या ठिकाणच्या महिला या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. आम्ही सर्वजण एकमेकींना प्रचंड प्रोत्साहन देतो", असे अनिसा सांगतात.

"या उपक्रमामुळे अनेक महिला विविध खेळांमध्ये हिरिरीने भाग घेत आहेत. शारीरिक आणि मानसिक ताकद वाढवून महिलांचे सक्षमीकरण करण्यात या उपक्रमाने खरोखरच मोठे योगदान दिले आहे", असे त्या पुढे म्हणाल्या.

"क्रीडा आणि फिटनेसची सदिच्छा दूत म्हणून मी तरुणांना निरोगी आयुष्यासाठी प्रेरित करते. त्यांनी व्यसनांपासून दूर राहावे यासाठी माझे सतत प्रयत्न असतात", असे त्या म्हणाल्या. यासाठी त्या शाळा आणि महाविद्यालयांमधील तरुणांशी नेहमी संवाद साधतात. सोशल मीडिया आणि पॉडकास्टच्या माध्यमातून त्या तरुणांना प्रशासकीय सेवा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शनही करतात. तरुण पिढी त्यांच्याकडे एक आदर्श आणि मार्गदर्शक म्हणून पाहते. याबद्दल त्यांना खूप मोठे समाधान वाटते.

एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना अनिसा महिला आणि तरुणांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवत आहेत.

"मला समाजाकडूनही भरपूर पाठिंबा आणि प्रोत्साहन मिळत आहे", अशी भावना त्यांनी व्यक्त केली. आजकाल तरुण मुले व्यसनाधीनतेकडे आणि चुकीच्या मार्गाला लागत आहेत. दुसरीकडे एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडताना महिलांना ताणतणाव आणि नैराश्याला सामोरे जावे लागत आहे. अशा कठीण काळात आपण समाजात चांगला बदल घडवू शकलो, हे त्या स्वतःचे सर्वांत मोठे यश मानतात.

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २००८ मध्ये त्यांचे लग्न झाले. त्यानंतर त्यांच्या आयुष्याला एक नवीन कलाटणी मिळाली. पुढची पाच वर्षे त्यांनी पूर्णपणे कुटुंबाला दिली. याच काळात त्यांनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर २०१० मध्ये त्यांनी पुन्हा एकदा कंबर कसली आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला. पतीच्या भक्कम साथीमुळे त्यांनी खेळांमध्येही सहभाग नोंदवला. २००९-२०१० च्या बॅचमध्ये त्यांनी परीक्षा उत्तीर्ण केली आणि २०१२ मध्ये त्या अधिकृतपणे सेवेत रुजू झाल्या.

अनिसा यांचा जन्म आणि बालपण श्रीनगरमध्ये गेले. प्रेझेंटेशन कॉन्व्हेंट आणि मॉलिन्सन गर्ल्स स्कूलमधून त्यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. जम्मू विद्यापीठातून त्यांनी माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयात बी.टेक. पदवी घेतली. २००७ मध्ये कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठातून त्यांनी 'एचआर' आणि 'मार्केटिंग'मध्ये एमबीए पूर्ण केले.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter