संयुक्त राष्ट्र
संयुक्त राष्ट्र महासभेत भारताने पाकिस्तानवर जोरदार निशाणा साधला आहे. पाकिस्तानचे 'फॉर्म ४७ सरकार' देशाच्या खऱ्या शासकांच्या, म्हणजेच पाकिस्तानी लष्कराच्या निर्देशांशिवाय एकही पाऊल उचलू शकत नाही, असे खडे बोल भारताने सुनावले आहेत. देशांतर्गत अपयशावरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान खोटा प्रचार करत असल्याचे भारतानेम् स्पष्ट केले.
संयुक्त राष्ट्र महासभेच्या तिसऱ्या समितीच्या बैठकीत अल्पसंख्याक मुद्द्यांवरील विशेष सहसंवर्धकांशी संवाद साधताना भारताने पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराचा समाचार घेतला. भारताचे संयुक्त राष्ट्रमधील स्थायी मिशनचे प्रथम सचिव राघू पुरी यांनी सांगितले की, देशांतर्गत आर्थिक संकट, कायदा-सुव्यवस्थेचा अभाव आणि मानवाधिकार उल्लंघनावरून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान भारताची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहे.
पाकिस्तान स्वतःच्या देशातील अल्पसंख्याकांच्या हक्कांचे रक्षण करण्यात अपयशी ठरला असून स्वातंत्र्यापासून तिथली अल्पसंख्याक लोकसंख्या झपाट्याने घटली आहे, असे पुरी यांनी अधोरेखित केले. जम्मू-काश्मीर हा भारताचा अभिन्न भाग आहे आणि राहिले आहे, असे स्पष्ट करत भारताने पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय मंचावर खोटा प्रचार करण्याऐवजी आधी स्वतःच्या नागरिकांच्या हितावर व सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला