भुवनेश्वर
पारंपरिक युद्धांच्या पलिकडे जाऊन आता अर्थव्यवस्थांना लक्ष्य करून युद्धे लढली जात आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केले. देशाच्या बँकिंग क्षेत्राला 'सायबर दहशतवादापासून' सुरक्षित ठेवण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भुवनेश्वर येथे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) १६९ कोटी रुपयांच्या अत्याधुनिक डेटा सेंटर आणि सायबरसुरक्षा प्रशिक्षण संस्थेच्या (Cybersecurity Training Institute) उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
ओडिशासह संपूर्ण देशातील नागरिकांना या अत्याधुनिक सुविधांचा मोठा फायदा होईल, असे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले. आमच्यासाठी विकासाचा अर्थ भारताचा समतोल विकास आणि लहान गावे व शहरांना समान संधी मिळणे असा आहे. आज भारताचे बँकिंग जगतातील जागतिक स्तरावर सर्वात कार्यक्षम प्रणालींमध्ये गणले जाते, जिथे नागरिकांना चोवीस तास बँकिंग सेवा उपलब्ध होत आहेत.
लहान उद्योजक, पारंपारिक कारागीर, पथविक्रेते आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांना पहिल्यांदाच औपचारिक बँकिंग सेवांचा लाभ मिळत आहे. काँग्रेसच्या राजवटीत बँकिंग सुविधा केवळ मोजक्या श्रीमंत आणि प्रभावी लोकांसाठीच उपलब्ध होत्या, तर गरीब, मध्यमवर्ग आणि महिलांना या सुविधांपासून वंचित ठेवले जात होते, असा घणाघात त्यांनी केला.
गेल्या दशकात बँकिंग सुविधा वंचित घटकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात आला, तर येणारे दशक बँकिंग प्रणाली अधिक कार्यक्षम आणि विश्वासार्ह बनवण्याचे असणार आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. ओडिशा भविष्यात खनिजांपासून मायक्रोचिप्सपर्यंतच्या क्षेत्रात नवा इतिहास घडवेल आणि तरुणांसाठी रोजगाराचे अनेक नवे मार्ग खुले करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.