पेंच व्‍याघ्र प्रकल्पामधील पर्यटनाचा आलेख उंचावला

Story by  पुणे | Published by  Saurabh Chandanshive • 11 d ago
पेंच व्‍याघ्र प्रकल्प
पेंच व्‍याघ्र प्रकल्प

 

कोरोनात सर्वत्र संचारबंदी असल्याने त्याचा सर्वाधिक फटका पर्यटन उद्योगाला बसला होता. मात्र, आता पर्यटन उद्योगाला पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत. कोरोनानंतर पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या संख्येत दुप्पटीने वाढ झालेली आहे.

२०१९-२० या वर्षात ५३ हजार पर्यटकांनी भेट दिली होती. यंदा एक लाख सात हजारांपेक्षा अधिक पर्यटकांनी पेंचला भेट दिली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात आता सिल्लारी आणि खुर्सापार प्रवेशद्वारातून येणाऱ्यांना हमखास वाघ दिसत असल्याने

पेंच व्‍याघ्र प्रकल्पामधील पर्यटनाचा आलेख उंचावला
पर्यटकांमध्ये चांगलाच उत्साह आहे. वाघाशिवाय या प्रकल्पात विविध पक्षी, फुलपाखरू निसर्ग सौंदर्याचा खजाना आहे. पेंचमध्ये सिल्लारी, खुर्सापार, चोरबाहुली, कोलितमारा, सुरेवानी आणि खुबळा हे सहा पर्यटन प्रवेशद्वार आहेत. हा प्रकल्प ७४१ चौरस किमीच्या परिसरात विस्तारलेला आहे. क्युआर आधारित फीडबॅक यंत्रणा, महिला निसर्ग मार्गदर्शक आणि महिला जिप्सी चालक, शोभिवंत वस्तूंचे विक्री केंद्राचे अद्यावतीकरण करणे आणि विद्युत वाहन चार्जिंग सुविधा सुरू करण्यात आली.

तसेच ‘दिव्यांगांसाठी’ त्यांच्या आवश्यकतेनुसार एक खास वाहन तयार करण्यात आलेले आहे. दिव्यांगांसाठी पर्यटन गेटवर व्हील-चेअर उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ‘प्लास्टिक मुक्त पेंच’ कार्यक्रम सुरू केला आहे. पेंच प्रकल्पातील पाणस्थळे टॅंकरमुक्त आहेत. पेंच व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन परिसर सौरऊर्जा चलित करण्यात आला आहे.

कोलितमारा येथे नुकतेच पॅरा-मोटरिंग आणि हॉट एअर बलुनसारखे साहसी उपक्रम सुरू केले आहेत. आंतरराष्ट्रीय डार्क स्काय ऑर्गनायझेशनने पेंच व्याघ्र प्रकल्पाला भारतातील पहिले ‘डार्क स्काय अभयारण्य’ म्हणून घोषित केले आहे. गडद आकाश निसर्गप्रेमींना आणि खगोलशास्त्रात रस असणाऱ्यांना हे ठिकाण आकर्षित करणारे आहे. पेंच नदीत कोलितमारा ते नवेगाव खैरी ही बोट सफारी सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमांमुळे पेंच हे महाराष्ट्रातील प्रमुख आकर्षण स्थळ बनले आहे.

वर्ष एकूण पर्यटकांची संख्या :
२०१९ - २०२० - ५३ हजार

२०२० - २१ - ४१ हजार

२०२१ - २२ - ४१ हजार

२०२२ - २३ - ७७ हजार

२०२३ - २४ - १ लाख ७ हजार

प्रकल्पात असलेले प्राणी व पक्षी :
वाघ - ४०

सस्तर प्राणी - ७१ प्रकार

पक्षी - ३६७ प्रकार

सरपटणारे प्राणी - ५३ प्रकार

फुलपाखरू - १७० प्रकार